Sunday, July 26, 2020

श्रावण मासी हर्ष मानसी

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे

देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

– बालकवी

लाखो इथले गुरू...!

लाखो इथले गुरू...!

बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू!
बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील
फिरते फुलपाखरू...
बिन भिंतीची उघडी शाळा
*लाखो इथले गुरू!*
सुग्रण बांधी उलटा वाडा,
पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे
बेडकिचे लेकरू...
बिन भिंतीची उघडी शाळा
*लाखो इथले गुरू!*
कसा जोंधळा रानी रुजतो,
उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा
*लाखो इथले गुरू!*
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा
*लाखो इथले गुरू!*

– ग. दि. माडगूळकर

जीवन त्यांना कळले हो

जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे हो‍उनि जीवन
स्‍नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो

सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन्‌ दीनांवर
घन हो‍उनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो

दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित हो‍ऊन जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन्‌ परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो

आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव
ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
उरींच ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळले हो...

- बा. भ. बोरकर 

शिवाजी पार्क


शिवाजी पार्क

शिवाजी पार्क आणि माझे नाते अगदी माझ्या लहानपणापासूनचे म्हणजे साधारण १९९० सालापासून. जेव्हा मी शाळेत जायला लागलो अगदी तेव्हापासून कारण माझी शाळा शिवाजी पार्कच्या अगदी हाकेच्या अंतरावर.मी बालमोहन विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी असल्याने आम्हा सर्व बालमोहनकराना शिवाजी पार्क म्हणजे हक्काचे ठिकाण.अगदी माहेर असल्यासारखे आमच्या शाळेला स्वतःचे असे खेळण्यासाठी क्रीडांगण नव्हते त्यामुळे शारिरीक शिक्षणाच्या तासाला शिवाजी पार्कवरच खेळायला नेत असत . बहुदा हेच कारण असावे आम्हा बालमोहनकरांचे आणि शिवाजी पार्कचे नाते घट्ट होण्यामागे. आमच्या शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव व आमच्या सर्वांचा आवडता बालदिनसुद्धा आम्ही शिवाजी पार्कवरच साजरा करत असू आणि अजूनही तीच प्रथा चालू आहे.दर शनिवारी आम्हाला सामूहीक कवायतीसाठी शिवाजी पार्कवरच नेले जायचे.शनिवारची सकाळची शाळा आटपून आम्ही कित्येकदा शिवाजी पार्कवर क्रिकेटची मँच खेळायला गेल्याचे आठवते.आयुष्यातील ते सोनेरी दिवस होते ते.

शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर (पश्चिम) या भागामध्ये आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. शिवाजी पार्क इ.स. १९२५मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर एका बाजूला (शिवाजी महाराजांचा) पुतळा इ.स. १९६६मध्ये उभारण्यात आला.आणि तेंव्हापासून शिवाजी पार्क असे नामांतर झाले. हा शिवाजी महारांजाचा अश्वारूढ पुतळा फारच देखणा व रुबाबदार आहे .

शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.आबाल-वृद्धांना सर्वाना सामावून घेणारे असे हे शिवाजी पार्क.नियमितपणे शिवाजी पार्कला चालायला, धावायला,व्यायाम करायला, योगा करायला, क्रिकेट खेळायला येणारांची संख्या खूप आहे.

शिवाजी पार्कमध्ये एक गणपतीचे मंदिर आहे जे उद्यान गणेश मंदिर म्हणून ओळखले जाते.माझे फार आवडते मंदिर आहे कारण शनिवारी आई शाळेत घ्यायला यायची तेव्हा आवर्जून घेऊन जायची ह्या मंदिरात.तेव्हापासून ह्या मंदिरात जाण्याची आवड निर्माण झाली आहे ती आजतागायत कायम आहे.ते शिवाजी पार्कमधील लहान मुलांचे उद्यान जेथे आम्ही लहानपणी खेळत असू ते आजही आठवते.शिवाजी पार्कमधील नवरात्री उत्सवातील बंगाल्याची देवी फारच सुप्रसिद्ध आहे. शिवाजी पार्कमधील समर्थ व्यायाम मंदिराची ख्याती तर सर्वश्रुत आहे.मल्लखांब, जिम्नॅस्टिकस,कब्बडी, खोखो हया खेळासाठी हे समर्थ व्यायाम मंदिर खूपच प्रसिद्ध आहे आणि ह्या समर्थ व्यायाम मंदिराने अनेक खेळाडू ह्याच शिवाजी पार्कवर घडवले.

क्रिकेट आणि शिवाजी पार्क हे समीकरण तर जगजाहीर आहे. शिवाजी पार्क म्हणजे मुंबईतील लॉर्ड्स आहे.जणू क्रिकेटची पंढरी. आणि ह्या क्रिकेटच्या पंढरीने सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटचा देव तयार केला किंवा घडवला असे आपण ठामपणे सांगू शकतो. सचिन तेंडुलकर , विनोद कांबळी, सुनील गावसकर  संदीप पाटील ,अजित आगरकर,दिलीप वेंगसरकर ,अजित वाडेकर असे अनेक दिग्गज खेळाडू घडले ह्या शिवाजी पार्कवर.

ह्या शिवाजी पार्कवर अनेक राजकीय आणि बिगर राजकीय सभा झाल्या आणि अनेक लोकांनी त्या सभा गाजवल्यासुद्धा.ह्याच शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी आपल्या पक्षाचा पहिला दसरा मेळावा आयोजित केला होता जो आजही चालू आहे.ह्याच शिवाजी पार्कने बाळासाहेबांचे पहिले भाषण ते त्यांचा इहलोकीचा प्रवास अनुभवला.बाळासाहेब ह्या शिवाजी पार्कचा उल्लेख शिवतीर्थ असा करत.अनेक राजकीय कार्यक्रम, सभा, निवडणुकीच्या आधीचे मेळावे,प्रचारसभा सर्व काही ह्या शिवाजी पार्कने अनुभवले.ह्या शिवाजी पार्कने अनेक राजकीय व बड्या दिग्गज नेत्यांची भाषणे ऐकली.काही वर्षांपूर्वी शिवाजी पार्क सायलेंट झोन म्हणून घोषित झाले आणि ही सर्व रेलचेल थांबली.

शिवाजी पार्कचा कट्टा म्हणजे आमच्यासाठी स्वर्गसुख.शाळेत असताना व आत्ता शाळा सोडून एवढ्या वर्षानंतरसुद्धा अनेकदा आम्ही शालेय मित्र ह्याच शिवाजी पार्कच्या कट्टयावर गप्पा मारायला भेटत असू.आणि भेटण्याचे ठिकाण ही एकदी ठरलेले मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याजवळ. शिवाजी पार्क आणि तिथे मिळणारा बर्फाचा गोळा हे माझ्यासाठी अतूट नाते असल्यासारखे.आजही कधी मी शिवाजी पार्कला गेलो की आवर्जून बर्फाचा गोळा खातो.आणि ह्याच शिवाजी पार्कवर मिळणारी भजीची चव म्हणजे एक नंबर.ह्याच शिवाजी पार्कवर मी अनेक संगीत मैफली ऐकल्या आहेत..अगदी दिवाळी पहाट ह्यासारखे कार्यक्रमसुद्धा  एवढेच कशाला जाणता राजाचा प्रयोग प्रथम मी ह्याच शिवाजी पार्कवर अनुभवला ते ही अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमवेत.माझ्या आयुष्यातील पहिले साहित्य संमेलन मी ह्याच शिवाजी पार्कवर अनुभवले.नो युअर आर्मी हे भारतीय सैन्यदलाचे अफलातून प्रदर्शनं व त्यांच्या चित्तथरारक कसरती ह्याच शिवाजी पार्कवर बघितले.दरवर्षी होणारी २६ जानेवारी व १ मेची परेड ह्याच शिवाजी पार्कवर बघितली.

कित्येकदा कॉलेजला बुट्टी मारून आम्ही शिवाजी पार्कच्या कट्टयावर तासनतास सर्व मित्र गप्पा मारत असू ,कधी तरी जर्नल किंवा असायमेंटसुद्धा पूर्ण केले ह्याच शिवाजी पार्कच्या कट्टयावर बसून.मित्रांसोबत आपल्या भवितव्याविषयीच्या चर्चासुध्दा ह्याच कट्टयावर बसून केल्याचे आठवते.

आज जरी काळानुरूप शिवाजी पार्कचे रुपडे बदललेले असले तरी त्याविषयी वाटणारी भावना तसूभरही कमी झाली नाही ती आजही तशीच आहे आणि पुढेसुद्धा मनामध्ये तशीच कायम राहणार ह्यात काही तिळमात्र शंका नाही.मी तर असे म्हणेन की मला घडवण्यात कुठेतरी छोटा का होईना पण शिवाजी पार्कचा हातभार आहे हे नक्की!

- सुयश गावड



Thursday, July 23, 2020

मामाची वाडी

मामाची वाडी

झुकझुक झुकझुक आगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाच्या गावाला जाऊया

ह्या ग.दि.माडगूळकराच्या बालगीताप्रमाणे आम्हीसुद्धा उन्हाळाच्या सुट्टीत मामाच्या गावी जात असू. सुदैवाने आमचे गाव व मामाचे गाव एकच होते.त्यामुळे सुट्टीत मामाच्या गावाला जायला जास्त कष्ट होत नसे.

साधारण आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी आम्ही मामाच्या वाडीत जात असू. सकाळची नित्यकर्मे उरकून आम्ही मामाच्या वाडीत जायला सज्ज होत असे.माझ्या मामांच्या वाड्या एका सरळ रेषेत आहेत.(आधी सुहास मामाची मग नितीन मामाची व नंतर परेश मामाची)आम्ही परेश मामाच्या वाडीत म्हणजेच माणिक आजोबा व केसरी आजीच्या वाडीत जात असू. सकाळी
साधारण दहा वाजेपर्यंत आम्ही सर्व भावंडे तिथे पोहचत असू.मग त्यांच्या विहिरीपाशी एक पाण्याची टाकी होती त्या टाकीत आम्ही मनसोक्त डुंबत असू. संपूर्ण वाडीतील आमच्या सर्वांची ती आवडती जागा होती.आणि तिथेच आम्ही विविध झाडाची पाने व फुले एकत्र करून  त्याचे दगडाने ठेचून सरबत बनवत असू व ते काचेच्या बाटलीत भरून ठेवत असू.(आमचा एक बालिश खेळ म्हणू ह्याला).त्या रंगबेरंगी बाटल्या बघायला खूप मज्जा येत असे.

मामाचा बंगला खूप मोठा होता. त्याला अनेक खोल्या व अनेक दरवाजे होते. पकडा-पकडी,लपाछुपी खेळायला खूप धमाल यायची.दुपारी साधारण बारा वाजता समुद्राला भरती आल्यावर आम्ही सर्व भावंडे समुद्रात पोहायला जात असू.तिथे पोहता पोहता एकमेकांच्या अंगावर माती उडवत असू. रोज कोणाला तरी आम्ही लक्ष्य केलेले असायचे आणि त्याला मग आम्ही खूप त्रास देत असू.पोहण्यामुळे खूप सणकून भूक लागलेली असायची.मग मामीच्या हातचे लज्जतदार जेवण जेवत असू.आम्ही सर्व भावंडे त्यांच्या बंगल्याच्या गॅलरीमध्ये जेवायला बसत असू.सर्वांची जेवायला बसायची जागा ठरलेली असायची.त्यावेळी आम्ही दोघं दोघ मिळून एकाच ताटात जेवत असू जेणेकरून मामीला भांडी घासायचा त्रास कमी म्हणून.

दुपारी जेवून मग संपूर्ण वाडीची रपेट असे आवळे ,आंबे, चिकू जाम,पेरू,जांभळ खायला जात असू. ते रसभरीत जाम त्या झाडावर बसून खाण्यात एक न्यारी गंमत होती. आम्हा भावंडाना तर एवढा माज होता की आम्ही अर्धे जाम खाऊन टाकून देत असू.चिकू तर चक्क पिकण्यासाठी आम्ही जमिनीत एक खड्डा करून त्यात लपवून ठेवत असू जेणेकरून ते लवकर पिकतील (ही कला आम्हाला कशी अवगत झाली ठावूक नाही ) एवढेच कशाला कच्या फणसाला पण आम्ही खायच्या पानात जो चुना वापरतो तो लावून ठेवत असू म्हणजे तो फणस लवकर पिकेल आणि आम्ही लवकर त्याचा फडश्या पाडू शकू.

मग दुपारी मामाने आमराईमध्ये बांधून दिलेल्या जाळीच्या पाळण्यावर मज्जा करत असू.आम्ही सात आठ भावंडे एकाचवेळी त्या पाळण्यामध्ये बसत असू तो पाळणा किती भक्कम आहे ते पडताळून पाहण्यासाठी कोणीतरी एकाने झोका दयायचा.प्रत्येकाने आळीपाळीने झोका दयायचा हा नियम होता.त्यावरून आम्हा भावडांमध्ये खूप भांडणे होत असत पण ती तेवढ्यापुरता असत.झोका देणाऱ्याने झोका जलदगतीने द्यावा म्हणून केलेला आरडा-ओरड,तो गलका आजही आठवला की नकळत चेहऱ्यावर हसू येते. "फुकी फुस्स कायुस नय" हे आमचे घोषवाक्य होते.(म्हणजे आमच्या मांगेली बोलीभाषेमध्ये फुस्स हे काहीच नाही अजून जोरात झोका दे असा त्याचा अर्थ होता)

काही उन्हाळाच्या सुट्टीत आमच्या मावशींची एक विदेशी मैत्रिण "मे" आलेली असायची.स्विझेर्लंडवरून ती येत असे.तिचे नाव मे होते म्हणूनच की काय ती मे महिन्यामध्ये येत असे अशी माझी बालभावना होती त्यावेळेस. ती येताना आमच्यासाठी खूप चॉकलेट्स घेऊन यायची.पण मला तिने आणलेल्या हत्तीच्या गोळ्या(मेश मेलो) खूप आवडायचे.दुपारी तीपण आमच्यासोबत समुद्रात पोहायला येत असे.तिला हापूस आंबा खूप आवडायचा. तिला विशेषकरून चित्रांची आवड होती.कारण ती आम्हाला चित्रे काढण्यासाठी कागद व रंग दोन्ही देत असे आणि आमच्याकडून चित्रे काढून ती बहुतेक घेऊन जात होती.(माझी चित्रे म्हणजे पांढऱ्या कागदावर काही तरी रंगवलेले)आम्ही सर्व भावंडे मराठी माध्यमात शिकत असल्याने आम्हाला त्यावेळेस इंग्रजी येत नसे. मग तिच्याबरोबर सवांद साधताना साग्रसंगीत अभिनय करावा लागत असे तेव्हा कुठे जाऊन तिला समजत असे की आम्ही काय बोलत आहोत ते.

मग संध्याकाळी साधारण पाच वाजता चहापाणी करून आम्ही आमच्या घरी जायला निघत असू.बाजूचीच वाडी बाळू नानांची होती.लांबूनच त्यांचे घर दिसले की आम्ही सर्व भावंडे नाना नाना असे ओरडायला सुरवात करत असून जेणेकरून नानांना वर्दी की आमची वानरसेना आली आहे.मग नाना सर्वांना पैसे दयायचे.नाना बाकीच्यांना एक किंवा दोन रुपये देत असत पण मला व ताईला पाच रुपये देत असत कारण आम्ही मुंबईहून आलेलो असायचो म्हणून की काय देव जाणो.असो,पण नानांनी दिलेल्या पैश्याने आमच्या संध्याकाळच्या वडा-समोसा व भज्यांची सोय झालेली असायची.

हळूहळू मोठे झाल्यावर मामाच्या वाडीत जाणे थोडे कमी झाले. परंतु आजही त्या मामाच्या घरात गेले की आठवते ती आमच्या लहानपणी केलेली दंगा-मस्ती आणि मन आपोआप फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पोहचते(feeling nostalgic) आणि आता असेच म्हणावेसे वाटते, ते दिवस आता कुठे!कुठे कधी हरवले ते दिवस कसे कोण जाणे!

- सुयश गावड

Friday, July 17, 2020

ओटा

ओटा

ओटा म्हणजे आमच्या गावच्या बोलीभाषेत घराची ओसरी.गावी आमच्या घरासमोरच टांगेवाल्या राजू काकांचे घर होते.सुट्टीत गावी गेल्यावर आम्ही त्यांच्याच ओट्यावर पडीक असू . आमच्यासाठी हा ओटा कट्टा होता.जिथे आम्ही सर्वजण भेटत असू,गप्पा मारत असू,खेळत असू.जणू आमच्यासाठी सार्वजनिक मैदान.आमच्या काकींचे नाव शमा आहे म्हणून आम्ही "शमाचा ओटा" असे त्याचे नामांतर केले होते.

आई आम्हाला सांगायची आम्ही लहान असताना ती ह्याच ओट्यावर आम्हाला ठेवून खेळवायची.एकंदरीत काय आम्ही लहानाचे मोठे ह्याच ओट्यावर झालो असे बोलणे काही वावगे ठरणार नाही.सुट्टीत ह्याच ओट्यावर बसून आम्ही सर्व भावंडे जेवत असू.म्हणजे आम्ही सर्व भावंडे आपापली जेवणाची ताटे घेऊन ह्याच ओट्यावर येत.ओट्यावर कोण कुठे बसून जेवणार हे ठरलेले होते म्हणजे सर्वांची जागा ठरलेली होती.मी तर त्या ओटीच्या पायरीवर बसून जेवायचो.

ह्याच ओट्यावर बसून आम्ही मेंढीकोट,पाच-तीन-दोन , गुलामचोर,चँलेंज ह्यासारखे पत्त्यांचे खेळ खेळत असू.एवढेच काय तर तीन पत्येसुद्धा आम्ही इथेच खेळत असू(गोट्या आणि पंगाराच्या बिया लावून).ह्याच ओट्यावर बसून आम्ही आंबे,पेरू,आवळे,करवंदे, कच्च्या कैरीच्या फोडी,कच्च्या पपईच्या फोडी,कच्च्या चिंचेची चटणी ह्या सर्व पदार्थाचा आस्वाद घेतला आहे.रोज संध्याकाळी आणले जाणारे वडेपाव व भजी ह्यांची लज्जतसुद्धा ह्याच ओट्यावर बसून घेतली आहे.

वीज गेल्यावर आम्ही भूताच्या केलेल्या गोष्टी ह्या ओट्याने ऐकल्या आहेत.आम्ही गायलेली अंताक्षरीमधली बेसूर गाणी व आम्ही केलेले नृत्य हे सर्व ह्या ओट्याने अनुभवले आहे.त्या गर्मीच्या दिवसांमध्ये शितलतेची शांत झोप आम्ही ह्याच ओट्यावर अनुभवली.

आमच्या ताईचा(अस्मि) साखरपुडा सोहळा,तिच्या हळदीचा सोहळा ह्या ओट्याने जवळून अनुभवले आहे.तिच्या पाठवणीच्या वेळेस आम्ही सर्व भावंडे तिला बिलगून खूप रडलो होतो कारण ती आमच्या ह्या ओटा गॅंगमधली मेंबर होती,त्यावेळेस हा निर्जीव ओटासुद्धा आमच्याबरोबर रडला असणार हे नक्की.

मराठीमध्ये एक म्हण आहे"भटाला दिली ओसरी(ओटा) भट हात पाय पसरी" ही म्हण आमच्याबाबतीत तंतोतंत लागू होते कारण फक्त खेळण्यासाठी दिलेला हा ओटा आम्ही सर्व इतर गोष्टींसाठी वापरत असू. असा हा ओटा आमच्या सुख दुःखाचा साक्षीदार व कायम लक्ष्यात राहणारा...

- सुयश गावड

Thursday, July 16, 2020

शाईचं पेन


शाईचं पेन...

हल्ली बरेचदा असे जाणवते की काही गोष्टी नाहीशा होऊ लागल्या आहेत , पण या नाहीशा होऊ घातलेल्या गोष्टी अथवा विस्मृतीत जाणाऱ्या गोष्टी आठवल्या की मन थोड़सं हळवं होतं आणि आठवणीत रमतं . उदा. शाईचे पेन. स्मार्टफोन / टॅब / कॉम्पुटर/लॅपटॉपच्या जमान्यात कागदावर लिहायला तसं कोणी जातं नाही ,वेळ आलीच तर बॉलपेन असते.पण त्या महिन्या महिन्याला बदलणाऱ्या किंवा रिफील न होणाऱ्या पेनात काही आपलेपणा वाटतं नाही ,जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाई पेनामध्ये होता.

माझी शालेय जीवनाची सुरुवात पाटी आणि पेन्सिलीने झाली . पहिलीत गेल्यावर शिसपेन्सिल हातात आल्याचे आठवते.मी पहिलीत होतो तेव्हा माझी ताई चौथीला होती. त्यामुळे ती शाईचे पेन वापरायची. आमच्या शाळेमध्ये चौथीपासून शाईचे पेन बंधनकारक होते.त्यामुळे त्या शाईच्या पेनचे मला तेव्हापासूनच अप्रूप होते व आपण कधी एकदा मोठे होणार आणि शाई पेन वापरायला लागणार असा प्रश्न पडायचा.मी मग चौथीत गेल्यानंतर काळ्या रंग्याचे कॅम्लिनचे जाड मोठे निब असलेले पेन वापरू लागलो,ह्या पेनने लिहिणे म्हणजे कसरतच असायची.त्याच्या पोटापाशी पारदर्शी काच होती.यातून त्याच्या पोटातली शाई दिसायची. अजून किती काळ ती पुरेल याचा अंदाज यायचा. निब तुटले की ते आणून पुन्हा बसवणे हेही अवघड काम. त्यात हात खराब होणे ठरलेलं. मग एखादा शाईने माखलेला हात चुकून गणवेशाला(पांढऱ्या शर्टला) लागला तर झालंच. शिवाय शाई पेनाच्या टोकापर्यंत येण्यासाठी कितीतरी वेळा झटकावा लागायचा. असेच अनेकदा पेन झटकून शेजारच्या मुला-मुलींच्या अंगावर शाई उडाली आहे. निबच्या आजूबाजूला कधी घाण अडकत असे, (कदाचित कागदाची असावी, माहित नाही), तर ती काढण्यासाठी वडिलांच्या दाढीच्या ब्लेडचा वापर सर्रास व्हायचा. त्यात शाई भरणं एक सोहळा असायचा.त्या पेनात शाई हाताने भरणे , त्यात अर्धी पेनात , पाव हातावर व पाव जमिनीवर असे सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडले जायचे. सरळ शाईच्या बाटलीच्या झाकणातून पेनात शाई भरायचो.गुलाबजामूनमधनं पाक गळावा , तसे पेनाच्या बाॅडीवर शाईचे ओघळ यायचे.पेनाचं पोट भरल्याचं त्या खिडकीतून दिसायचं.मग ते ओघळ पुसायला, माझ्याकडं एक इतिहासकालीन फडकं होतं.मग ड्रॉपरचा उगम झाला आणि बरीचशी शाई पेनात जाऊ लागली.

प्रथम शाईचे पेन वापरताना त्रास होत असे. लिहिण्याचा वेग कमी होतोय असे वाटे पण हळूहळू सवय झाली , मग अक्षरही चांगले वाटू लागले. आमच्या शाळेत बाई सांगायच्या,शाईचा पेनच वापरायचा.त्यानं अक्षराला चांगलं वळण लागतं.माझ्या अक्षराच्या वळणाबाबत आनंदच होता.पण शाईचं पेन आवडलं.कागदावर लिहीताना ठळक वाटायचं.बखर लिहल्यासारखा आनंद व्हायचा.उगाचच आपल्या शब्दांना वजन आल्यासारखं वाटायचं.ते काळं शाईचे पेन फार आवडायचं मला.

पुढे ते कॅम्लिनच्या मोठ्या निबच्या पेनाच्या जागी एकदम फक्त टोक दिसणारे, बाहेरून छान चकचकीत असलेले हिरोचे शाईपेन आले.आम्ही सर्व मुले त्याला चायना पेन म्हणत असू.मग पुढे चायना पेनचीच क्रेझ आली.सोनेरी टोपण असायचं त्याला...मला तर ते सोन्याचंच वाटायचं.चकचकीत , गुळगुळीत.खालची बाॅडी डार्क मरून ,नाहीतर काळ्या रंगाची,नाहीतर हिरव्या रंगाची. ईनबिल्ट ड्राॅपर असायचा त्याला.नीबपण आत लपलेली.पण एकंदरीत लॅव्हिश काम होतं.बाकीची शाईची पेनं आठ दहा रूपयात मिळायची .पण हे तीस रूपयांना मिळायचे त्यावेळेस त्यात शाई भरणेही सोपं होतं. पेनाच्या आतली नळी फक्त शाईच्या बाटलीत घालून ड्रॉपरसारखी वापरायची.शाई भरायचे जिकरीचे काम ह्या पेनाने फारच सोपे केले.मराठीच्या पेपरला तर मी न चुकता हेच शाईपेन वापरत असे.

दररोज शाळेतून आल्यावर शाईने बरबटलेले हात, कपड्यांवर उडालेले शाईचे शिंतोडे बघून आईचा ओरडाही मिळायचा; पण शाईपेन वापरण्यात खूप मजा होती हे नक्की. शाळेत वर्गांच्या भिंतीवर नक्षी म्हणून शाईपेनान शिंतोडे उडवत असू. अर्थातच, अशा पराक्रमांसाठी शाळेत शिक्षाही व्हायची. दोरा शाईत बुडवून वहीच्या मागच्या पानांवर सुद्धा नक्षीकाम चाले.किंवा कागदावर  हाताच्या अंगाठाने,बोटाने शाईचे उमटलेले ठसे व त्याचे चित्र. अश्या असंख्य गोष्टी आम्ही शाई पेनाने करत असू.

शाई पेनाबरोबरच आपण बऱ्याच गोष्टी विसरून गेलो आहोत, याची जाणीव झाली.आता मागे बघताना वाटतं ते पाटी पेन्सिल , दुहेरी ओळींची वही , शिसपेन्सिल , पाढे लिहायची चौकटीची वही ,शाईचे पेन ह्या सर्वच वस्तू आपण विसरत चाललो आहोत .शाईच्या पेनाची शाई आता कधीच वाळलीय मनातून... आत्ता असेच म्हणावे लागेल.आणि आपण शालेय जीवनातील एक मौल्यवान वस्तू हरवून बसलो ह्याची हूरहूर  कायम मनाला लागून राहिली.


- सुयश गावड






Wednesday, July 15, 2020

गोधडी

गोधडी

गोधडी....मायेची ऊब. आईच्या किंवा आजीच्या साडीची, लुगड्याची हाताने शिवलेली गोधडी.त्यांच्या मायेसारखीच मऊसूत व तलम.आपल्या महाराष्ट्राच्या मातीच्या मायेचे वैभव.माझ्याकडे पण एक गोधडी आहे जी घेऊन मी झोपतो.माझी गोधडी तर माझ्या पणजीच्या लुगड्यापासून बनवली आहे.म्हणून ती माझ्यासाठी खास आहे.मी शाळेत आठवीत असेंन तेव्हा माझी पणजी गेली.त्यावेळेस फक्त तिची आठवण म्हणून मी तिच्या लुगड्याची गोधडी शिवून घेतली.त्या गोधडीमध्ये आजही माझी पणजी तिच्या मऊ मऊ हाताने मला गोंजारते आहे असा भास होतो.तिचा स्पर्श मला त्या गोधडीमध्ये होतो.मध्यंतरी माझी ती गोधडी फार जीर्ण झाल्याने फाटू लागली होती तर मी ती गोधडी तशीच ठेवून त्यावर माझ्या आजीची सुती साडी घालून परत शिवून घेतली.आत्ता तर माझ्यासाठी त्या गोधडीचा फायदा दुप्पट झाला आहे कारण आत्ता पणजी व आजी दोघींची माया त्या गोधडीतून मला अनुभवता येते तेही एकाचवेळी.

वस्तूंचा वापर कमी करणे(Reduce),त्यांचा पुनर्वापर करणे(Reuse)आणि पुनर्यप्रक्रिया करणे(Recycle). महाराष्ट्रामध्ये जतन करण्यात आलेली गोधडी ही या त्रिसूत्रीचे उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते.जुने ते सोने ह्या उपक्रमाचे ही गोधडी उत्तम उदाहरण आहे.तिला बनविण्यासाठी पण खर्च फार कमी असतो.

मूळ फक्त साड्यांपासून,लुगड्यांपासून तयार होणारी गोधडी आत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या कापड्यापासून शिवली जाते.त्यावर विविध भरतकाम ,विणकाम केले जाते.शोभेसाठी काचा , शिंपल्या,विविध कपड्यांचे तुकडे(patch work)त्यावर बसविले जातात.उबेसाठी आत कृत्रिम कापूस भरला जातो. त्यातून तिचे स्वरूप अजून बदलून ती रजई,दुलईच्या रुपात येते.आत्ता तर गोधडीची ख्याती जागतिक पातळीवर पसरली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गोधडीला खूप मागणी आहे.तिला इंग्रजीमध्ये क्लिट(Quilt) म्हणतात.गोधडी शिवण्याचे तंत्र शिकून घेण्यासाठी गावाकडच्या बायकाना प्रचंड मागणी आहे.गोधडी शिवणे ही एक कला आहे.

गोधडी हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक प्रकार आहे.आजही गावाकडे स्त्रिया आपली दैनंदिन कामे झाली की गोधडी शिवतात.सोलापूरमध्ये तर गोधडी शिवताना स्त्रिया ओव्या गातात. अलीकडे तर गोधडी शिलाई मशीनवर पण शिवता येते.
पण जो आपलेपणा,मायेची उब आपल्या या पारंपरिक
गोधडीमध्ये आहे तो त्या आधुनिक रजई,दुलाईमध्ये नाही असे मला स्पष्ट वाटते.

मला ही गोधडी आपल्यावर माया करणाऱ्या आई, आजी ह्यांचे प्रतीक वाटते.त्या सुती साडीच्या,लुगडाच्या स्पर्शातून या जेष्ठांची माया आपल्या अंगात झिरपत राहते अशी माझी ठाम भावना आहे.गोधडी वरचे मोठे मोठे टाके घरातील माणसांची मन जोडणारी असतात,अगदी कायमची.कारण ते टाके मायेच्या धाग्याने एकमेकात गुंफलेले असतात.सुती साड्या व लुगड्यांपासून केलेली गोधडी म्हणजे साध्या व सात्विक सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण वाटते.गोधडीबद्दल कवी डॉ.कैलास दौंड ह्यांच्या शब्दात सांगायचे तर..

गोधडी म्हणजेच
नसतो फक्त चिंध्यांचा बोचका
गोधडी म्हणजेच गोधडी असते.
मायेलाही मिळणारी ऊब असते.

माझ्यासाठी गोधडी हा जिव्हाळाचा विषय आहे कारण त्यात माझ्या पणजीची व आजीची माया दडली आहे.रोज रात्री झोपताना ती गोधडी अंगावर घेतली की माझी पणजी व आजी मला अंगाई गाऊन थोपटत आहे असाच भास होतो आणि शांत झोप लागते.

- सुयश गावड

   माझी गोधडी

Tuesday, July 14, 2020

चूक


चूक

क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात.
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात.
कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते,
चुक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायची नसते
एक कृती, एक शब्द
एकच निमिष हुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!

- सुधीर मोघे

सागर

सागर

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

– कुसुमाग्रज

देणार्‍याने देत जावे

देणार्‍याने देत जावे

देणार्‍याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे.

- वि. दा. करंदीकर

चहा


चहा

चहा...नुसत्या नावाच्या उच्चारानेच आपल्याला तरतरीत करणारं पेय. भारतीयांचीच नव्हे तर जगभरातील अनेकांची सकाळ चहाच्या वाफाळत्या पेल्याशिवाय अशक्य आहे. चहाशिवाय सकाळ म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशीच भावावस्था. या महात्म्यामुळेच पाण्याच्या खालोखाल लोकप्रिय ठरलेले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पेय आहे.

अशा या अमृततुल्य पेयाचे ‘टी’ हे इंग्रजी नाव आणि चहा वा चाय हे देशी नाव यांचा अर्थाअर्थी काय संबंध असावा असा प्रश्न राहून राहून मनात येतोच. याचं उत्तर फक्त चिनी मंडळीच देऊ शकतात. कारण चहाचं मूळ तिथे चीनमध्ये आहे. या चिनी भाषेत ‘ते’ किंवा ‘टे’ हा उच्चार कडू वनस्पतींकरता केला जायचा. त्याच ‘टे’चं ‘टी’ झालं, तर जपानी व कोरियन भाषेत ‘चा’ हा शब्द असल्याने त्याचा वापर करत भारतीय भाषेत चहा, चाय असं रूपांतर झालं. दोन्ही शब्दांचं मूळ चिनी भाषेतच आहे. चहा जसा जगभर पसरत गेला तसंतशी विविध नावं त्याने धारण केली.

आज जगभरात जवळपास सगळीकडे चहाचे सेवन होते. जवळपास हजाराहून अधिक चहाचे प्रकार जगभरात नावाजले जातात. पण चहाचं मूळ ज्या देशात आहे त्या चिनी मंडळींच्या मते चहा कोणताही असो, त्यासाठी वापरलं जाणारं पाणी महत्त्वाचं असतं. खास चहा बनवण्यासाठी चीनमध्ये विशिष्ट तलाव अथवा नदीचं पाणीच आणलं जाई. त्या पार्श्वभूमीवर विचार करता आपल्याकडे टपरीवर मिळणाऱ्या चहासाठी कुठलं पाणी वापरलंय याच्या फंदात आपण पडत नाही आणि हा विचार करू लागलो तर चहा पिणं कठीण होईल. तरीही अनेक टपऱ्यांवरचा चहा हा उत्तम टीशॉप्सना मागे टाकेल इतका ए वन असतो, हा भाग वेगळा.

आजच्या घडीला कॉफी हाऊसेसप्रमाणेच टी हाऊसेस उदयाला येत आहेत. चहाचे वेगवेगळे प्रकार आपण अजमावून पाहात आहोत. पण कॉफीसाठी जी एक तरंगती वातावरणनिर्मिती या कॉफी हाऊसेसमधून निर्माण होते ती चहासाठी होणं जरा कठीण वाटतं. चहा हा अगदी जन्मापासून ओपन फॉर ऑल कॅटेगरीतला राहिलेला आहे. त्याला हा तामझाम, पंचतारांकित तयारी, गूढ वातावरण कधी लागलंच नाही. गप्पांची मैफल जमावी, मग ती कॅन्टीनपासून घरापर्यंत, गच्चीपासून कट्टय़ापर्यंत कुठेही. आपल्या गप्पा समेवर कधी येणार याची अचूक नस ओळखणारा चहावाला वा चहावाली असावी. गप्पा रंगात आलेल्या असताना तुटक्या कानाच्या कपापासून ते काचेच्या गिलासापर्यंत कश्शाकश्शातही ओतून हे वाफाळणारं जीवनामृत समोर यावं. मित्र-आप्तेष्ट यांच्या सोबत सुरेल तार जुळत असताना तो चहाचा घोट घशातून हृदयात आत आत जाताना चहात विरघळलेल्या साखरेप्रमाणे आणि मिळून आलेल्या चहा पत्तीप्रमाणे आपणही विरघळतो त्या वातावरणात आणि आपल्या आप्तजनांत. मला वाटतं चहाची इतिकर्तव्यता याच कार्यात आहे.

कधी कोणी विचारलं की जीवनात आनंद कशाला म्हणतात तर चाय प्रेमी हमखास एकच उत्तर देतील चहा पिण्यात जो आनंद आहे तो जगात कोणत्याही गोष्टीत नाही, चहा वर काय भारी भारी डायलॉग बनलेले आहेत अजबच!

“दोन चहा एक खारी आपली मैत्री लय भारी!”

“खड्यात गेली दुनियादारी चहा आमचा जगात भारी”

"चहाला वेळ नसते .... पण वेळेला चहाच लागतो"

अश्याच प्रकारचे बरेच डायलॉग आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतील.

कारण भारतात लोकांच्या शरीरात रक्त कमी आणि चहा जास्त वाहतो, मस्करी होती बर का! पण खरंच भारत देश जगात चहाचे उत्पादन करण्यातसुध्दा अग्रेसर आहे आणि पिण्यातसुध्दा.ज्याप्रमाणे बाकीचे जागतिक दिन साजरे केले जातात.त्याचप्रमाणे २२ मेला जागतिक चहा दिवस म्हणून साजरे केला जातो. खरंच! किती गर्वाची गोष्ट आहे.आपल्यासारख्या चहाच्या शौकीन लोकांसाठी. आता तर चहा वेगवेगळ्या चवीमध्ये मिळतो.उदा.ब्लॅक टी,ग्रीन टी,हर्बल टी,लेमन टी,पीच टी

मी लहान असताना दिवसातून दोनदाच चहा पीत असे परंतु मी कॉलेजला जायला लागल्यापासून हेप्रमाण वाढले त्याचे कारण म्हणजे माझा मित्रपरिवार त्यांच्याबरोबर मी चहाच्या टपरीवर जायचो ते सिगारेटी फुंकयांचे आणि मी चहा ढोसायचो.मग रात्री जागून अभ्यास करताना चहा प्यायचो.कारण असे म्हणतात की चहा हे निद्रानाशक पेय आहे.आत्ता तर दिवसाच्या कोणत्याही प्रहरी मी चहा पियू शकतो.सुट्टीमध्ये गावी जायचो ना तेव्हा आमची काकी चहा बनवून स्टीलच्या तांब्यामध्ये भरून ठेवत असे.त्या चहाची चव आजही जिभेवर रेंगाळते.मला आले ठेचून चहात टाकलेले खूप आवडते(अद्रकवली चाय).

खूप पाऊस पडत असेल तर गरम गरम चहा आणि गरम गरम भजी अजूनच चार चांद लावून जातात त्या वातावरणाला.अनेक लग्न जुळवताना तर चहाने खूपच हातभार लावला आहे.चहा पानाचा कार्यक्रम झाल्याशिवाय पूर्वी लग्नसमारंभ होत नसे.चाय पे चर्चा हा तर आपल्या देशातील खूप महत्त्वाचा कार्यक्रम.मग ती चर्चा क्रिकेट मँचची असो किंवा देशातील राजकारण असो किंवा सिनेमाविषयी असो किंवा गल्लीतील अथवा कॉलेज मधील पोरींविषयी असो.जशी चहाची नशा चढत जाते तशी चर्चेची नशा पण रंगत जाते.कितीतरी कॉलेजमधील कॅन्टीन तर चहा घेऊन ग्रुप ग्रुपने बसलेली मुले पाहून कॅन्टीनमध्ये गर्दी असल्याचे आपल्याला वाटते.

माझ्यासाठी चहाची टपरीच एक पंचतारांकित हॉटेल आहे कारण माझे स्वतःचे असे स्पष्ट मत आहे की चहाच्या टपरीवर जसा फक्कड चहा मिळतो तसा चहा एकाद्या पंचतारांकित हॉटेलमध्येसुद्धा मिळत नाही. आणि चहा जर चुलीवरचा असेल तर त्याची चव आणखीनच भारी. चुलीवरचा वाफाळता चहा पिणे म्हणजे खरं स्वर्गसुख.चहाला अमृततुल्य म्हणतात ते उगाच नाही.

आणि इराणी हॉटेलमध्ये शुद्ध दुधाचा चहा पिणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल.आणि त्या चहाबरोबर बन म्हस्का म्हणजे पर्वणी.त्या पांढऱ्या शुभ्र कप बशीमध्ये चहाची लज्जत तर आणखीनच भारी.कॉलेज संपल्यानंतर आम्ही सर्व मित्र नाहूरला फोर्टटीस रुग्णालयासमोर एक टपरी आहे ,मद्रासी माणसाची,तिथे भेटत असू.तर तेथील चहा व वडापाव /भजी ह्यांची चव अप्रतिम.आजही कधी तिथे गेले की तो अणा कटिंग देऊ का म्हणून विचारतो.आजही कधी आम्हा सर्व कॉलेज मित्रांना भेटायचे असेल तर ती चहाची टपरीच आमचा असेम्ब्ली पॉईंट असतो.त्या चहा पिताना एकमेकांसोबत मारलेल्या सुख दुःखाच्या गप्पा आजही स्मरणात आहेत.

असा हा चहा माझ्या सुखदुःखातील सोबती तर आहेच पण माझ्या जीवनाच्या अत्यावश्यक गोष्टीतील एक अविभाज्य घटक आहे...

- सुयश गावड


Monday, July 13, 2020

फ्रेशर्स...सतरंगी फ्रेशर्सची अतरंगी यारी....

फ्रेशर्स...सतरंगी फ्रेशर्सची अतरंगी यारी....

२०१६ मध्ये झी युवा ही खास तरुणांसाठी चैनल प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले. कॉलेज लाईफवर बेतलेली एक खास मालिका या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि ही मालिका म्हणजे फ्रेशर्स. फ्रेशर्स मालिकेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईमध्ये आलेल्या ७ तरुणांच्या स्वप्नांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. खूप कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील कलाकार ओंकार राऊत, मिताली मयेकर, रसिका वेंगुर्लेकर, रश्मी अनपट, अमृता देशमुख, सिद्धार्थ खिरीड आणि शुभंकर तावडे यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. ‘फ्रेशर्स’ ही मालिका आपल्यातील प्रत्येकाच्या कॉलेजच्या दिवसांना उजाळा देण्यात यशस्वी ठरली आहे.डिग्री कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांवर मालिका होती. कॉलेज लाईफ धमाल-मस्ती दाखवणाऱ्या ह्या मालिकेला तरुण मंडळीने खूप उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आणि अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली.

सतरंगी फ्रेशर्सची अतरंगी यारी....

१.सम्राट पाटील(शुभांकर तावडे)

मूळचा कोल्हापूरच्या शेतकरी घरात जन्मलेला,रांगडा गडी, कब्बडची विशेष आवड असणारा,खादाड,मनाने साधा व निर्मळ असणारा.

२.सायली बनकर (मिताली मयेकर)

मूळची नाशिकची असणारी डॅशिंग,स्पष्ट बोलणारी,खूपच फोकस असणारी आणि आपल्या कुटुंबाचा भार पेलणारी(पार्ट टाइम नौकरी करून),हीला भविष्यात चॅनेल हेड व्ह्यायचे आहे.

३.परी देशमुख (अमृता देशमुख)

मूळची लातूरची असणारी परी एका श्रीमंत राजकारणी घरात जन्माला आलेली,अत्यंत लाडावलेली,मनाने स्वच्छ परंतु सतत नाकावर तोरा मिरवणारी,खूप सुंदर कविता करणारी.

४.रेणुका भिलारे (रसिका वेंगुर्लेकर)

मूळची रायगडची असणारी बाबाची लाडली,मनाने साधी व भोळी असणारी,खाण्याची विशेष आवड असणारी मँगो बर्फी,पत्रकार होण्याची इच्छा असणारी.

५.मनवा राजे (रश्मी अनपट)

मूळची मुंबईतील वाळकेश्वर येथील करोडपती उद्योगपतीची एकुलती एक मुलगी,परंतु साधी सरळ सर्वांना सांभाळून घेणारी,वाचनाची विशेष आवड असणारी हुशार मुलगी,सारखी सेल्फी क्लीक करणारी शांत मुलगी.

६.धवल मिठबावकर (ओंकार राऊत)

मूळचा मुंबईचा असून लालबागची शान असणारा,सतत भंकस करणारा,जुगाडचा बादशाह,आपल्या आजीवर जिवापाड प्रेम करणारा.

७.नीरव देसाई(सिध्दार्थ खिरीड)

मूळचा धनिक डॉक्टर कुटुंबामध्ये जन्मलेला,स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांशी भांडून आलेला हुशार,स्मार्ट,विचारी,सर्वांची समजूत घालणारा,सर्वाना समजून घेणारा, फिल्म मेकर बनण्याची आकांशा बाळगणारा.


मालिकेचे शीर्षकगीत

सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी
आकाशी घेऊया भरारी
फ्रेशर्स… फ्रेशर्स…
जगुया बिंधास्त आपली मर्जी
आपली तर स्वप्न एकदम वरची
कॉलेजच कैंपस Google यारी
Searching तो जनहित मे हे जारी
ज़िन्दगी प्रेमाची मिठाई
जिंकण्याच टॉनिक डेरिंग देई
कॅफे मे चिल मारू
यारा सेल्फी बार बार
शेयरिंग का जमाना सुन ना
वाय-फाय वाला प्यार
ऑनलाइन ऑफलाइन … फ्रेशर्स
टैग लाईक पोस्टिंग … फ्रेशर्स
ब्रेक-अप मूव्ह ऑन … फ्रेशर्स

फ्रेशर्स या मालिकेच्या शीर्षक गीताचे संगीत दिग्दर्शन लोकप्रियसंगीत दिग्दर्शक अमित राज यांनी केले आहे.वलय मुळगुंद यांनी हे गीत लिहिले असून अमित राज, आरती केळकर, हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी हे शीर्षक गीत गायले आहे.फ्रेशर्स मालिकेतील मनवा राजे (रश्मी अनपट), परी देशमुख (अमृता देशमुख),रेणुका भिलारे (रसिका वेंगुर्लेकर), सायली बनकर (मिताली मयेकर),नीरव देसाई(सिध्दार्थ खिरीड), सम्राट पाटील(शुभांकर तावडे),धवल मिठबावकर (ओंकार राउत)या सात मित्रांवर हे गाणे चित्रित केले आहे. कॉलेजची मजा – मस्ती, मैत्रीचं निखळ नातं, हळूहळू उमलत असणारे प्रेम,तरुण मनाचं – त्यांच्या स्वप्नाचं, आशा-आकांक्षा यांच चित्रण या गाण्याच्या दिग्दर्शनातून आणि शब्दामधून टिपण्याचा केलेला अचूक प्रयत्न प्रेक्षकांना खूप आवडला हे गाण्याला मिळालेल्या प्रतिसादातून कळतं. शीर्षक गीतामध्ये पहायला मिळणारी दोस्ती–यारी, कॉलेज - विश्व, कथासूत्रातील नाविन्यता, चकचकित फ्रेश-सादरीकरण, नात्यांमधला गोडवा अत्यंत सुरेख पद्धतीने या मालिकेमध्ये दाखवला गेला.मालिकेची कथा संजय जाधव आणि आशिष पाठारे ह्यांनी लिहिली होती.

ही मालिका बघताना प्रत्येकालाच आपले कॉलेज विश्व आठवते ह्या काही शंका नाही.एकूण २११ भाग ह्या मालिकेचे चित्रित झाले.त्यावेळेस ऑफिसमुळे संपूर्ण मालिका बघता आली नव्हती परंतु ह्या लोकडोऊनमध्ये यूट्यूबवर सर्वच्या सर्व म्हणजे २११ भाग बघितले.खूप मज्जा आली.सात मित्रांची मैत्री जणू इंद्रधनुष्याच्या सात रंगाप्रमाणे वाटावी अशी आहे.त्यांनी सात जणांनी केलेला एकत्र अभ्यास असो की, त्यांनी केलेली एकांकिका असो की , प्रोजेक्ट-असायमेंट असोत सर्वच खूप मस्त चित्रित केले गेले.कितीही संकटे आली तरी आपला आपल्या मैत्रीवर विश्वास असेल तर आपण त्या संकटाचा खंबिरपणे मुकाबला करू शकतो हे ह्या मालिकेच्या शेवट शेवटच्या भागांमध्ये दाखवण्यात आले.

- सुयश गावड

मित्रा आपण खरं खरं सांगतो

मित्रा आपण खरं खरं सांगतो
तुझ्यासाठी आपण दुनियेला वाऱ्यावर सोडतो
साथ सोडून नेमके पळून जातात सगळे
अचानक हरल्यासारख वाटायला लागते
तेव्हा तू एकटा गदागदा हलवून
माझीच मला ओळख करून देतो
जखमावर फुंकर घालून पुन्हा लढायला उभं करतो
म्हणून मित्रा आपण खरं खरं सांगतो
तुझ्यासाठी आपण दुनियेला वाऱ्यावर सोडतो
बंगला कार सगळं काही मिळुन जात पैश्यात
मानमरबत प्रसिद्धी कमवतात सर्व लोक लाचारीतून
थोडं तरी बईमान झालो तरी हक्काने
रट्टा हाणून तूच मला माणसात आणतो
तुझ्यासारखा मित्र लई नशिबाने मिळतो
म्हणून मित्रा आपण खरं खरं सांगतो
तुझ्यासाठी आपण दुनियेला वाऱ्यावर सोडतो

(फ्रेशर्स या मालिकेतील कविता)

जादूचा दिवा

कधी रुसले
कधी हसले
कधी हरले
तर कधी धडपले
कधी उधळले
तर कधी शहारले
कधी दुरावले
तर कधी सरावले
कधी शब्दांनी दुखावले
तर कधी मायेने सुखावले
या वाटेवर चालताना
कुशीत तुमच्या विसावले
जगण्या जराही गम्मत नसते
जेव्हा तुमची साथ नसते
प्रत्येक पावलावर जी आधार असते
ती मैत्रीचं जादूचा दिवा असते

(फ्रेशर्स या मालिकेतील कविता)

आवडेल मलाही पाऊस व्हायला


आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला …
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला …
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श् वासात तुझ्या मिसळायला …
श्वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला …

काळ्या ढगांमधून पळून यायला …
अलगद तुझ्या कुशीत शिरायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..

तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला ..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला …
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला …

आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला …
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला …

भाळशील का तू माझ्या या रूपाला
सांग ना जमेल का तुला साथ द्यायला …
तरच आवडेल मला पाऊस व्हायला …

- सुरेश भट

आई

आई

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा
धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात
गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.

- फ.मु.शिंदे

वेडं कोकरु

वेडं कोकरु

वेडं कोकरु खूप थकलं
येतांना घरी वाट चुकलं !

अंधार बघून भलतंच भ्यालं
दमून दमून झोपेला आलं !

शेवटी एकदा घर दिसलं
वेडं कोकरु गोड हसलं !

डोकं ठेवून गवताच्या उशीत
हळूच शिरलं आईच्या कुशीत!

— मंगेश पाडगांवकर

चाफ्याच्या झाडा

चाफ्याच्या झाडा ….

का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

– पद्मा गोळे

पैठणी

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा

- शांता शेळके

कणा

कणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

- कुसुमाग्रज

Sunday, July 12, 2020

बंब


बंब....

सुट्टीमध्ये आजोळी जात असू तेव्हा सकाळी अंघोळीसाठी पाणी बंबामध्ये गरम करत असत.त्यांच्याकडे तांब्याचा मोठा बंब आहे.तो बंब पाहून मला नेहमीच कुतूहल वाटे.हल्ली आंघोळीसाठी लागणार गरम  पाणी आणि त्यासाठीचा गीझर बॉयलर ,हीटर हे प्रत्येकाच्या बाथरूममधलं अत्यावश्यक उपकरण असत. बस्स फक्त बटन दाबायच, नळाला पाणी असेल तर दुसऱ्या मिनिटाला गरम पाण्याची धार / शॉवर सुरु.सगळं इतकं सोप्प झालय. पण पूर्वी अंघोळीला पाणी गरम करण्यासाठी एक तर चुलीवर तपेले ठेवून पाणी गरम करत असे नाहीतर ज्यांच्याकडे बंब आहे त्यांमध्ये पाणी गरम करत असे.

हा बंब माझ्या आजीला तिच्या वडिलांनी(माझे पणजोबा) तिच्या लग्नात कन्यादानामध्ये दिला होता.त्यामुळे अर्थातच आजीचा जास्त जीव आहे ह्या बंबावर. आजी मला नेहमी सांगते की ह्या बंबाची किंमत त्यावेळेस पाचशे रुपये होती(पासष्ट वर्षापूर्वी). आजही त्यांच्या गावच्या घरी हा बंब सांभाळून ठेवला आहे आणि अजूनही पाणी गरम करण्यासाठी वापरला जातो.

हा बंब तांब्याचा असतो. तांब्याची वस्तू लगेच गरम होते ना, म्हणून हा बंब पण तांब्याचा. यात पाणीही लगेच गरम होते. तर यात मागे एका झाकणातून कोळसा, गोवऱ्या किंवा जे काही जळण असेल ते घालतात. बंबाच्या आतमध्ये दोन भाग असतात. वरच्या भागात थंड पाणी ओततात. ते नळ्यांमधून येतं. ह्या नळ्या कोळशामुळे मस्त तापलेल्या असतात. त्यातून पाणी गेल्यावर ते लगेच गरम होतं. एकावेळी बरंच पाणी ह्या छोट्या छोट्या नळ्यांमधून आल्याने एकदम बरंच तापलेलं पाणी आपल्याला पटकन मिळतं. यातून बरीच वाफ तयार होते ती  चिमणीमधून बाहेर येते.एक अलिखित नियम मात्र सर्वांसाठी असायचा तो म्हणजे एकदा आपल गरम पाणी काढून झाल कि बंबाच्या भांड्याला वरती एक झाकण असे त्यांतून पुन्हा थंड पाणी ओतून झाकण बंद करायच त्यामुळे बंब भरलेला राही आणि नंतर आंघोळ करणाऱ्यास गरम पाणी कमी पडत नसे. सकाळी सणसणीत तापलेल्या बंबात अगदी दुपारपर्यंत पाणी  गरम रहात असे.

आम्ही भावंड मग वाडीत पडलेली सुकी पान, सुकलेल्या बारीक फांद्या, नारळाच्या शेंड्या, करवंटया अस जे जे कांही सुकलेल असेल ते आणून बंबाच्या वरच्या नळीतून आंत टाकायचो. तळाशी असलेल्या जळत्या निखाऱ्यावर हे सगळ पडलं की त्या उभ्या नळकांड्यात ते धडधडून पेटे. बंबाची रचनाच तशी केलेली असे. वायुवीजन व्यवस्थित होत असे आणि बघतां बघतां बंबाच ते उंच नळकांड आधी धूर नंतर आग ओकू लागे. सणसणीत तापलेल्या त्या तांब्याच्या नळकांड्याच्या भोवतालचं पाणी कडकडून तापलं की बादलीमध्ये बंबाचा नळ सोडायचा....... वाफाळेलेले पाणी बादलीत घेवून मग हव तितक थंड पाणी घेऊन बादलीत ओतायचं आणि मस्त आंघोळ करायची. ह्या बंबाच्या पाण्याला वाफाळलेला वास येतो हा वास खूप आवडतो मला. कधी कधी तर ह्या बंबाच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकत असू त्याने पाण्याला आणखीनच मस्त वास येत असे.

हा बंब साफ करणे हे जरा वैतागवाणे काम असते असे मला वाटते कारण बंबातील आग थंड झाल्यावर त्यातील राख बाहेर काढून तो स्वच्छ करावा लागतो. तो तांब्याचा बंब असल्याने लवकर काळा पडत असे म्हणून त्यावेळी तो चिंचेचा कोळ किंवा राखाडीने(चुलीतील राख)साफ करून त्याला चमकवावा लागत असे.पण आत्ता पितांबरीने हे काम अधिक सोपे केले आहे.धुवून स्वच्छ केलेला लख्ख बंब बघायला आणखीनच मज्जा येत असे.

काळाच्या ओघामध्ये बंब कुठे तरी लोप पावत चालला आहे.मी आमच्या आजीला सांगितले आहे हा बंब मला दे तुझी आठवण म्हणून.मी कायम जपीन त्याला जीवापाड.असा हा बंब माझ्या कायम आठवणीत राहिलेला.

- सुयश गावड

Saturday, July 11, 2020

लगोरी


लगोरी

लगोरी ... हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. मी दुसरी-तिसरीत असेन, जेव्हा उन्हाळयाच्या सुट्टीत गावी जात असू तेव्हा हा लगोरी खेळ खेळायचो.आमच्या गावच्या घराजवळच शशिकांत नानांचा वाडा(त्यांची छोटी मोकळी जागा होती)होता. तिथे उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये राष्ट्र सेवादलातर्फे रोज संध्याकाळी ४ ते ६ शाखा भरायची.आणि ह्या शाखेमध्ये अनेक विविध खेळ खेळले जायचे.आम्ही सर्व भांवड रोज न चुकता ह्या शाखेत खेळ खेळायला जात असू.उदा. कब्बडी,खो-खो लंगडी,कोंबड्यांची झुंज,लेझीम, लगोरी ,घड्याळ विषामृत,आबाधुभी इत्यादी आणि असे अनेक.माझ्या मते प्रथम लगोरी हा खेळ मी तिथेच शिकलो आणि खेळलो. आणि हा खेळ मला खूप आवडू लागला.आमचे हे सर्व खेळ आमचा पप्पू दादा (उपेंद्र मोरे) हा शिकवायचा.मला आजही स्पष्ट आठवते खूप मन लावून तो आम्हाला ते खेळ आणि त्याचे नियम समजावून सांगायचा.

या खेळात दोन संघ असतात. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगो-या एकावर एक ठेवणे. त्या चेंडूने विस्कळीत करणे (म्हणजेच फोडणे) व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगो-या रचणा-या संघास बाद करणे. असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिकवेळा लावील, तो संघ विजयी होतो.

या खेळात वापरल्या जाणा-या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. ही लगोरी पारंपरिक, विनासंयोजित खेळामध्ये फरशीच्या वा विटांच्या तुकड्यांची असे.आम्ही मात्र जवळच उपलब्ध होणारे सपाट दगड वापरायचो. मात्र आता बाजारात, एकापेक्षा एक होत लहान जाणा-या देवळाच्या शिखराप्रमाणे किंवा शंकूच्या आकारासारखा निमुळत्या होत गेलेल्या सात वर्तुळाकार, रंगीत, गोल आकारांचा लगोरी संच मिळतो. त्या फोडण्यासाठी टेनिसचा चेंडू वापरतात.लगो-या व चेंडू एवढेच साहित्य, साधे-सोपे नियम आणि छोटे मैदान यामुळे हा खेळ खेळण्यास सुलभ ठरतो.(हम दिल दे चुके सनम ह्या चित्रपटामध्ये आपण बघितले असेल हा लगोरी खेळ खेळताना ऐश्वर्या रायला)

या खेळासाठी १८.२८ मी. ते ३०.४८ मी (६० ते १०० फूट) व्यासाचे एक वर्तुळ आखून घेतात. त्याची परीघरेषा ही अंतिम मर्यादा मानतात. या मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखतात. लावताना लगोरी ही येथे रचावी लागते. सात वा अकरा खेळाडूंचे असे दोन संघ असतात. प्रत्येक संघातील एक-एक खेळाडू लगोरी फोडण्यास येतो. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडणारा लागोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी एक क्षेत्ररक्षक मागे उभा असतो. इतर १० क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणा-या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.

लगोरी फोडणारा लगोरी फोडताना बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याला जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लगोरीमागील किंवा शेजारील खेळाडूने वरचेवर झेलला, तर तो बाद होतो. लगोरी फोडणारा लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणा-या खेळाडूंपैकी एकानेच, एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, ते लगोरी लावणे. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगो-या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकाचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणा-यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी त्या संघास एक गुण मिळतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगो-या होतात, म्हणजेच अधिक गुण होतात, तो संघ विजयी घोषित केला जातो.

आणि आपली लगोरी लावून झाल्यावर आम्ही इतक्या मोठाने ओरड्यायचो लगोरी,लगोरी,लगोरी असे.खूप मज्जा यायची.जीव तोडून त्या चेंडूने ती लगोरी फोडायची आणि जीव मुठीत घेऊन धावायचे दुसऱ्या संघापासून वाचण्यासाठी.त्यावेळेस मनामध्ये एकच विचार असायचा की लवकरात लवकर आपली लगोरी लावून तयार कशी करायची.ती लगोरी फोडण्यासाठी अचूक नेमाची गरज असायची.पायाने ती दुसऱ्या संघाची लगोरी फोडण्यात एक असुरी आनंद होता.

त्यानंतर अनेकवेळेस सुट्टीमध्ये गावी गेलो असताना हा लगोरी खेळ खेळलो. पण मुंबईमध्ये किंवा शाळेमध्ये कधी हा खेळ खेळलो नाही ह्याची खंत आहे.त्यामळे लगोरी हा माझ्या आवडत्या आठवणींच्या खजिनेतला खेळ आहे.

विटी-दांडू,सुरपारंब्या,आटा-पाट्या, गोट्या, सागरगोटी लगोरी असे पारंपरिक खेळ आत्ता लोप पावत चालले आहेत.आपली जीवनसरणी बदलली आणि आपण हे खेळ खेळायचे थांबलो. फारसे काही साहित्य न लागणार्‍या अशा या खेळांमधून उत्तम व्यायाम तर होतोच पण आपल्यातले उपजत कला-कौशल्य पणाला लागते. सध्याच्या मोबाइल आणि कॉम्प्युटर 'गेम्स' च्या युगात लोकांनी एकत्र येऊन खेळायला अनन्यसाधारण महत्व आहे.तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दुसरी बाजू ही की लोकांमधील तुटत चालेला संवाद… या खेळांमुळे रोजच्या कामांमधून वेळ काढून लोक एकत्र येतात, खेळतात, करमणूक होते, संवाद वाढतो आणि मन प्रसन्न राहते. आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून आपण येत्या पिढीला हे खेळ शिकवायला हवे असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

- सुयश गावड

Friday, July 10, 2020

टांगा


टांगा

टांगा....माझ्या बालपणातील सुवर्ण क्षणांचा सोबती.गावी आमच्या घरासमोरच्या घरात राजूकाका आणि त्यांचे कुटुंब राहायचे.त्यांच्याकडे चार-पाच घोडे आणि घोडागाडी म्हणजे टांगा होता.त्यांच्या उदरनिर्वंहाचे साधन हा टांगाच होता.ह्या टांग्यातून ते पत्रे,सिमेंट,भाजीपाला ,नारळ ,शहाळी ,मासे, धान्यांच्या पोती पालघरहून गावात किंवा गावातून पालघरला असे नेत असत.व ह्या सामानाच्या ने-आण करण्याच्या बदल्यात मिळालेले टांग्याचे भाडे ही त्यांची कमाई. सुट्टीमध्ये गावी गेल्यावर त्यांचे हे काम व त्यांची मेहनत लहानपणापासून मी बघत आलो होतो.म्हणून मला त्यांचे व त्यांच्या त्या टांग्याचे भारी अप्रूप.त्यावेळेस गावात खूप टांगे होते.राजुकाकाच्या टांग्याचे नाव अश्व कृपा होते.

सुट्टीमध्ये गावी गेलो की आमच्या दिवसाची सुरुवात ह्या टांगा सफरीने व्हायची.सकाळी आंघोळ करून नाश्ता करून आम्ही सज्ज व्हायचो टांग्यात बसण्यासाठी. आम्ही सर्व भांवडे मग टांग्यात बसत असू आणि गावच्या बस स्टॉपपर्यंत जात असू. असा हा आमचा रोजचा दिनक्रम होता.ह्या दिनक्रमाची आम्हा सर्व भावंडे आणि राजू काकांसुद्धा सवय झाली होती.कधी आम्हा भावंडांपैकी कोणाला उठायला उशीर झाला किंवा आपली नित्यकर्मे उरकायला उशीर झाला की आम्ही घरातूनच ओरडून राजूकाकांना थांबायला सांगत असू.आणि राजूकाका पण सर्वांसाठी आनंदाने थांबत असत.कधी उशीर झाला की आम्ही नाश्ता न करताच जात असू टांग्यात. आम्ही भावंडे टांग्यात बसल्यावर खूप मस्ती करत असू पण राजूकाका कधी आम्हाला ओरडले नाही.टांगा चालू झाला की त्या घोड्यांच्या गळातील घुंगुरु मस्त वाजायचे. स्वतःचा तोल सांभाळून बसण्याची कसरत ह्या टांग्यामध्ये करावी लागे. मग टांग्यातून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाना हात दाखवणे,हाका मारणे असे आमचे वेडे चालू असायचे.आता आठवले की खूप हसू येते.मग आम्हाला सर्वाना बस स्टॉपवर उतरवून राजूकाका त्यांच्या कामाला पुढे जायचे.मग आम्ही घरी जाताना मध्येच घर असणाऱ्या विजूकाकाकडे जात असू. मग विजूकाका आम्हा सर्वांना प्रत्येकी १ रुपया देत असत मग त्यांच्याच घराजवळ असणाऱ्या एका दुकानात आम्ही गोळ्या किंवा चॉकलेट घेत असू व ते खात खात आम्ही घरी येत असू.हा आमचा रोजचा सुट्टीतील दिनक्रम.ह्यात कधीही खंड पडत नसे.

संध्याकाळी राजूकाका टांगा घेऊन परत येत असे त्याच्यानंतर ते घोड्यांची व टांग्याची साफसफाई करत असे त्यामध्ये आम्ही त्यांना मदत करत असू.ते घोड्यांची किंवा टांग्याची डागडुजी करताना आम्ही उगाचच त्यांच्या कामामध्ये लुडबुड करत असू.

त्याकाळी दळण-वळणाची साधने खूपच कमी होती म्हणजे आजच्यासारखी रिक्षा किंवा कोणाची गाडी नसे.तेव्हा हा टांगाच आमच्यासाठी गाडी होती. ह्याच टांग्यातून आम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये जत्रेला जात असू. जत्रेतून येताना त्या पिपाणीचा आवाज आमच्या ह्या टांग्यानेसुद्धा ऐकला होता. ह्याच टांग्यातून आम्ही कितीतरी जणांच्या लग्नाला गेलो आहोत. तेव्हा हा टांगाच आमच्या दळण-वळणाचे व आनंदाचे साधन होते.

मी तर आता आता पर्यंत म्हणजे कॉलेजला असेपर्यंत त्यांच्याबरोबर टांग्यामध्ये जात होतो. आत्ता राजूकाकाचे वय झाले म्हणून त्यांनी घोडे व टांगा दोन्ही विकून टाकले. राजूकाकाने ह्या टांग्याच्या जोरावर संपूर्ण संसाराचा डोलारा सांभाळला. त्यांनी खूप मेहनत केली त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये आणि ह्या टांग्याने खूप साथ दिली त्यांना.काळानुसार आत्ता गावामध्ये टांग्याची संख्या पण कमी झाली.

आजही कोणत्या चौपट्टीवर गेलो की घोडागाडी असतेच.त्या घोडागाडीमध्ये बसल्यावर राजूकाकाच्या टांग्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.त्यांच्या त्या टांग्याच्या आठवणी आजही आमच्या मनामध्ये ताज्या आहेत. आणि मग मनाच्या कोपर्यामध्ये डोकावतो राजूकाकांचा टांगा.

- सुयश गावड

Thursday, July 9, 2020

साहित्य फराळ - दिवाळी अंक

साहित्य फराळ - दिवाळी अंक

ह्यावर्षी मनाशी पक्के ठरवून ठेवले होते की दिवाळी अंक विकत घ्यायचा आणि वाचायचा.लहानपणी शाळेत असताना गम्मत- जम्मत,किशोर हे लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेले दिवाळी अंक वाचत होतो. झी मराठी चॅनेलवर येणारी उत्सव नात्यांचा ह्या दिवाळी अंकांची झी मराठी चॅनेलवर येणारी जाहिरात बघून तर ठरवलेच होते की ह्यावर्षी दिवाळी अंक वाचायाचा.एवढ्या वर्षानंतर आज आयडियल त्रिवेणी दुकानात जाऊन दिवाळी अंक विकत घेतले.कोणता दिवाळी अंक घेऊ आणि कोणता नको असे झाले होते.एक एक दिवाळी अंक चाळताना दिवाळीच्या एक एक फराळाची चव घेतल्यासारखे वाटत होते.लहानपणी आईबरोबर शाळेची पुस्तक घ्यायला म्हणून आयडियल बुक शॉपमध्ये जाणार मी आज दिवाळी अंक घ्यायला गेलो ह्याचे मला माझेच अप्रूप वाटते.

तिथे दिवाळी अंक चाळताना अधोरेखित ह्या दिवाळी अंकांचे कार्यकारी संपादक श्री. गीतेश शिंदे ह्याच्याशी झालेली भेट म्हणजे एक दुग्धशर्करा योग होता.ह्या अंकाचा ह्यावर्षीचा विषय आहे ' शोध सर्जनप्रेरणांचा '. ह्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे जेष्ठ कवी बा. भ. बोरकर ह्यांच्या सर्जनशीलतेचा शोध घेणारा 'अप्रकाशित बोरकर' हा साहित्य अकादमी विजेते जेष्ठ कोकणी कवी आणि अनुवादक माधव बोरकर ह्यांचा अप्रतिम लेख आणि त्यातील बोरकरांची 'नव्याने गा रे कुसुमग्रजा' ही कविता खूपच सुंदर आहे. तसेच आरती प्रभू ह्यांच्यावरील लेख ही खूप सुंदर आहे.रत्नाकर मतकरी ह्यांचा नाट्यप्रवास व  लिखाणप्रवास खूप सुंदररित्या उलगडला आहे.आणि असे असंख्य लेख आणि कविता ह्यांची मेजवानी ह्या दिवाळी अंकात आहे. नावाप्रमाणेच अश्या असंख्य गोष्टी ह्या अंकाने "अधोरेखित" केल्या आहेत.

खरोखरच हे दिवाळी अंक वाचून समृद्ध झाल्यासारखे वाटते.ह्या मोबाईल आणि digitalization च्या जगात आजही ११० वर्षाची दिवाळी अंकाची असलेली परंपरा आज तितक्याच भक्कमपणे टिकून आहे आणि आज ही वाचकवर्ग त्याचा आस्वाद घेत आहे हे बघून खूप कृतार्थ झाल्यासारखे वाटते.

खूप खूप धन्यवाद सर्व दिवाळी अंकासाठी कारण ह्यावर्षीची माझी दिवाळी समृद्ध केल्याबद्दल 

  - सुयश गावड

जाणीव

जाणीव

काल मी आणि आई दादरला समर्थ व्यापारी पेठेत गेलो होतो .बसने आम्ही शिवजी मंदिरच्या समोर बस स्टॉपवर उतरलो आणि आम्ही गप्पा मारत रस्ता क्रॉस करत होतो मी आलो पुढे आणि dividerवर उभा राहिलो आणि बघतो तर आई मागेच होती तिने रस्ता क्रॉस केलाच नव्हता . मी त्या divider वर उभा राहून आईकडे बघत होतो आणि मला जाणीव झाली की अरे ती पण माझ्याबरोबर होती तिला घेऊन मला रस्ता क्रॉस करायला हवा होता. आणि त्या 2 मिनीटामध्ये मी भूतकाळात गेलो जेव्हा आई मला शाळेमध्ये घ्यायला यायची तेव्हा रस्ता क्रॉस करताना माझा हात घट्ट पकडायची आणि तिच्यासोबत मला घेऊन रस्ता क्रॉस करायची.आत्ता मी मोठा झालो आणि तिचा हात सोडला आणि म्हणून ती मागे राह्यली आणि मी पुढे निघून गेलो.ही जाणीव फार काही शिकवून जाते माणसाला .आता खरी गरज आहे मी तिचा हात पकडण्याची ..आणि काल नवरात्रीचा पहिला दिवस. ह्याच दिवशी आपण सर्व मोठ्या आईची स्थापना करतो .त्या आईने आपला हात घट्ट पकडला आहेच पण आपण तो सोडून ह्या मोहमायेच्या जत्रेत भटकत असतो.म्हणून आपण तिचा हात घट्ट पकडला पाहिजे तरच आपण ह्या विश्वातील कोणताही रस्ता आरामात क्रॉस करू शकतो तिच्यासोबत.
108% ती आपल्या सोबत असतेच.

-सुयश गावड 

🎂आईचा ६१ वा वाढदिवस🎂

🎂आईचा ६१ वा वाढदिवस🎂

आई.....

पहिल्यादा तुझ्याबद्दल लिहिणार .मध्ये एवढी वर्षे गेली तुझ्याबद्दल लिहायला.आज तुझ्या ६१ व्या वाढदिवसाबद्दलचे औचित्य साधून लिहायला घेतलें. कोठून लिहायला सुरुवात करू तेच कळत नाही. आणि माझे लिखाण जास्त मनाला लावून घेऊ नकोस.परंतु तुझ्या स्वभावधर्मानुसार तू ते लावून घेणार हे  नक्की.आई.....तू आईपेक्षा मैत्रीण जास्त आहेस....
My bestest friend म्हणून आयुष्यात चांगल्या मैत्रिणीची कधी गरज भासली नाही.

मला भरपूर लोक सांगतात की तू तुझ्या आईसारखा दिसतोस.मातृमुखी आहेस तू ,असे सांगितल्यावर मला खूप छान वाटते.मी तुझ्यासारखा दिसत नाही तर तुझ्यासारखे गुण पण माझ्यात आहेत .तुझ्यासारखे खूप बोलणे म्हणजे गप्पीस्ट स्वभाव.खाणे हा आपला आवडता छंद. हो छंदच म्हणावे लागेल कारण नुसतं खाणच नाही तर दुसऱ्याला खाण बनवून घालण्यात जास्त आनंद.माझे तर ठाम मत आहे अन्नपूर्णा मातेचं तुझ्यावर वरदहस्त आहे.खरेदी करणे हा तुझा दुसरा छंद पण ती खरेदी दुसऱ्यांची.आणि कपड्यांची तुझी निवड खूपच लाजवाब म्हणूनच आज ही मी तुझ्या निवडीची शर्टस घेतो....
तुझा लागवी आणि मनस्वी स्वभाव फार भावतो.तुझे आयुष्य खूप खडतर गेले,तू  खूप कष्ट केले .आज जरी सुखाचे क्षण जरी आले तरी तू आधी होती तशीच आहे.तसुभर पण फरक नाही झाला.तुझा सर्वात मला आवडणारा गुण म्हणजे तुझी दुर्दम्य इच्छाशक्ती .आपल्यामध्ये आणखीन एक समान गोष्ट म्हणजे भरपूर बोलणे.

मी नेहमी म्हणायचो प्लास्टिकचा चमचा घेऊन जन्माला आलो आहे पण मी खूप चुकीचा होतो कारण आई तू आणि पपानी मला सोन्याचा नाही तर हिरेजडीत चमचा दिला आहे.
मला हवे ते तुम्ही मला दिले .माझे भरपूर लाड केलेत, करत आहेत आणि करत राहणार हे मात्र नक्की...

माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल पुस्तक श्यामची आई हे वाचले होते ते पुस्तक मनाला खूप भावले होते तेव्हा वय लहान असल्याने पुस्तकाची व्याप्ती कळली नव्हती पण आज समजते त्या पुस्तकातील श्यामची आई.श्यामची आई  समजली तशीच तू आहेस पण मी तुझा श्याम काही होऊ शकलो नाही ह्याची खंत मात्र आहे...

मला दुसरीत असताना मराठीमध्ये  दिनूचे बिल नावाचा पाठ होता.तुला आठवत असेल आई कारण तूच शिकवलं होता तो. मी पण नेहमी त्या दिनूप्रमाणेच बिल करण्याचा अट्टाहास करतो आणि नेहमी माती खातो पण तू त्या दिनूच्या आईसारखे बिल करते नेहमी बाकी शून्य.....

मी नेहमी चुकत गेलो आणि तू नेहमी मोठ्या मनाने मला माफ करत गेलीस कारण तू आई आहेस..

वेड कोकरु वाट चुकलेले....तशी गत झाली आहे माझी...

दुसऱ्यांसाठी खूप जगलीस आत्ता तरी स्वतःसाठी जग....
एवढे एकच तुला सांगीन.

बापू तुला उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच चण्डिकाकुळाचरणी प्रार्थना

आई वाढदिवसाच्या अनिरुद्ध शुभेच्छा💐💐💐

🎂Happy birthday Aai🎂

-वाट चुकलेले तुझे कोकरू

सायकल


सायकल

सायकल...प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय.प्रत्येकाला सायकल म्हटली की लहानपणी सुट्टीत चालवलेली व शिकलेली सायकल आठवते.आपण किती ही मोठे झालो तरी मनाच्या एका कप्प्यात आपण ती सायकल जपलेली असते.लहान असताना प्रत्येकालाच आवडणारी व हवीहवीशी वाटणारी अशी ही सायकल.तसे मी सायकल चालवायला उशिराच शिकलो ते ही अचानकपणे म्हणजे अशी ठरवून मी सायकल चालवायला शिकलो नाही असे मला सांगायचे आहे.

शाळेत सहावीत असताना गणपतीच्या सुट्टीमध्ये सायकल चालवायला शिकलो.तेव्हा मी मच्छीमार नगरमध्ये राहत होतो.माझे सर्व बालपण मच्छीमार नगरमध्येच गेले.तेव्हा माझ्याच वयाचा माझा राजू नावाचा मित्र होता.(त्याचे खरे नाव हर्षल आहे पण आम्ही सर्व राजू म्हणूनच हाक मारायचो आणि अजूनही मारतो)त्याने मला सायकल चालवायला शिकवली.मी सायकल चालवायला शिकलो त्याची कथा जरा रंजकच आहे.

त्यावेळेस आम्हा कोणाकडे स्वतःची अशी सायकल नव्हती.तेव्हा सायकल भाड्याने मिळत असे व ती भाडयाने घेतलेली सायकलच सर्व चालवीत असे.१रुपया प्रति तास असे त्या छोटया  सायकलचे भाडे असे.ज्याच्याकडून आम्ही सायकल भाडयाने घेत असू त्याचे नाव अजगर होते. रंगाने काळाकुट्ट,कुरळे केस,सतत पानाच्या तोबाराने भरलेले तोंड,फूल पॅण्ट आणि त्यावर सफेद फुल बनियन आणि ग्रीसने भरलेले काळेकुट्ट हात असे त्याचे वर्णन असयाचे.त्या गणपतीच्या सुट्टीत मी रोज राजूबरोबर सायकल भाड्याने घ्यायाला जात असे आणि मग राजू मला डबलसीट घेऊन पूर्ण कॉलनी फिरवत असे.एक दिवस त्याने सायकल माझ्या हाती दिली आणि म्हणाला आज तू सायकल चालव.मी तुला आज सायकल चालवायला शिकवतो हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि थोडी भीती पण वाटली.

त्यावेळेस रहेजा रुग्णालयाची नवीन इमारत तयार झाली होती.त्याच्यासमोरील रस्त्यावर विशेष रहदारी नसे म्हणून राजूने
त्या रस्त्यावर मला सायकल चालवायला घेऊन गेला. जसे त्यांनी सायकल चालवायला सुरवात केली आणि वरूण राजाने हजेरी लावली.खूप जोराचा पाऊस आला आणि अर्थातच छत्री नसल्याने आम्ही दोघे चिंब भिजलो. आम्हाला थांबणे शक्य नव्हते कारण सायकल फक्त एकच तास भाड्याने घेतली होती. माग मी सायकलवर बसलो.त्याने सायकलची सीट आणि हँडल पकडले आणि म्हणाला समोर लक्ष दे आणि स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळत सायकलचे पँडेल मारायला सुरुवात कर.मला तर भीती वाटली होती परंतु त्याच्या सांगण्यावरून मी सायकल चालवायला सुरवात केली.असे तो दोन फेऱ्या माझ्याबरोबर सायकलला पकडून होता व तिसऱ्या फेरीला त्याने कधी सायकल सोडली व मी तोल सांभाळून कधी सायकल चालवू लागलो माझेच मला कळले नाही.

नंतर मी बऱ्याच फेऱ्या मारल्या परंतु मध्येच सायकलला ब्रेक नसल्याने आणि ब्रेक नसताना जमिनीला पाय लावून कशी थांबवायची हे ठाऊक नसल्याने मी एका आईसमान असणाऱ्या महिलेला धडकलो.तिच्या हाताला मी धडकलो आणि मी त्या सायकलीसकट खाली पडलो.त्या महिलेच्या हातातील काचेच्या काही बांगड्या फुटल्या. तिला नक्कीच खूप लागले असणार आणि मी मनातून खूप घाबरलो होतो की ती मला ओरडणार पण झाले भलतेच त्या महिलेने मला विचारले कुठे लागले का?पावसामुळे तो डांबरी रस्ता धुवून गेल्याने माझे पायांचे दोन्ही ढोपरे खरचटले होते.रक्ताबंबाळ झाले होते.मागून राजू पण हे दृश्य बघून धावतच माझ्यापाशी आला आणि मला व सायकलला उचलले.राजू बोलला त्या महीलेला, मावशी तो आजच सायकल चालवायला शिकला आहे त्यावर ती महिला हसून म्हणाली जरा जपून चालवत जा सायकल.नीट लक्षपूर्वक चालव  आणि मी व राजूने त्या मावशींची माफी मागून सायकल परत करून घरी आलो.राजू तर खूप हसत होता माझ्यावर.पूर्ण चिंब भिजल्याने घरी आल्यावर अंघोळ करायला गेल्यावर झालेली जखम खूप जास्त असल्याचे लक्ष्यात आले पण आपण आज सायकल चालवायला शिकलो ह्या आनंदापुढे त्या जखमांचे दुःख फारच नगण्य होते.सायकल चालविताना कोणी पडले किंवा धडकले नाही असे होणारच नाही.पडत पडतच सायकल शिकली जाते असे म्हणतात.जो पडत नाही तो सायकल शिकत नाही.

पुढे मी मग अनेक वेळा सायकल भाड्याने घेऊन चालवू लागलो. सायकल चालविताना जर त्याची चैन निघाली म्हणजे ती लावताना एकप्रकारचे अग्निदिव्य करावे लागे.मग त्या ग्रीसने होणारे काळेकुट्ट हात...खूप मज्जा यायची हे सर्व करताना.

नंतर तर माझे मित्र अभिजित आणि पराग ह्यानी स्वतःची सायकल घेतली मग त्यांच्याबरोबर सायकल घेऊन पतंग आणायला बांद्रा स्टेशनजवळ जात असू तर कधी शिवाजी पार्कला.रोज संध्याकाळी तर सायकल घेऊन पूर्ण कॉलनची रपेट असे.उन्हाळाच्या सुट्टीत तर सायकल घेऊन मोरी रोडला माहीम बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या ज्वेलस ह्या दुकानामध्ये सोलो नावाची आईस कँडी खायला जात असू .रहेजा रुग्णालयाच्या समोरील माहीम-सायन पुलावर तर सायकल चालवायला खूप मज्जा यायची.खूप जोर मारून सायकल त्या पुलावर चढवायचो आणि उतरताना त्या उतारावर नुसती सायकल सोडून दयायची आपल्या शरीराचा तोल सांभाळून.आपण हवेत आहोत असे वाटायचे तेव्हा. खूप धमाल यायची हे करताना.

नंतर पुढे कॉलेजला गेल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो तेव्हा दुपारी जेवण झाल्यावर आम्ही सर्व भावंडे सायकली घेऊन नवोदय विद्यालय रोडवर करवंद खायला जात असू तर कधी गोंधळी तळयाजवळ रांजण,तर कधी कोणाच्या तरी वाडीमध्ये आंबे खायला जात असू.आणि हा सर्व प्रवास आम्ही सायकलीवर करत असू .खूप मज्जा यायची.

ही सायकल जरी मला खूप आवडतं असली तरी मी शाळेत असतानासुद्धा किंवा आता मी स्वतः कमावता झालो तेव्हाही विकत नाही घेऊ शकलो. त्यामागे असे काही विशिष्ट कारण नाही पण का विकत घेऊ शकलो नाही हे मला नाही सांगता येणार.हा पण ही सायकल आपण विकत घेऊ शकलो नाही ह्याची खंत मात्र कायम मनाला लागून राहीली.आपण आज मोठे झाल्यावर भरमसाठ पैसे मोजून भारी दुचाकी किंवा चारचाकी घेऊ शकू तरीही सायकलची सर त्याना येणार नाहीं.शेवटी सायकल ती सायकल.

- सुयश गावड

Wednesday, July 8, 2020

बर्फाचा गोळा


बर्फाचा गोळा...

बर्फाचा गोळा ...नाव काढताक्षणीच त्याचा थंडावा मनाला तर त्याचे विविध इंद्रधनू रंग डोळ्यांना सुखावून जातात.मला लहानपणापासूनच बर्फाचा गोळा खूप आवडायचा.शाळेत असताना शाळा सुटल्यावर शाळेच्या बाहेर खायचो तर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर खायचो.कॉलेजला असताना शिवाजी पार्कच्या परिसरात खायचो हा गोळा...माझ्यासाठी ठिकाण महत्त्वाचे नाही तर मिळणारा हा गोळा महत्त्वाचा आहे.

तो गोळेवाला बर्फाचा तुकडा त्या लाकडी फळीला ब्लेड लावलेले असयाचे त्यावर बर्फाचा किस करून मग एका ग्लासमध्ये तो बर्फाचा किस गच्च दाबून त्यात एक छोटी लाकडी काठी टाकून तो गोळा बनवत असे मग आपल्याला कोणता रंग हवा तो ते विचारून त्यावर लिंबू रस व काळ मीठ लावून आपल्याला देत असे.आम्ही शाळेत असू तेव्हा हा गोळा १ रुपयाला मिळत असे.शाळेत असताना गोळा आईपासून लपवून खायचो.कारण तिला आम्ही गोळा खाल्लेले नाही आवडायचे.तिचे म्हणणे असे होते की कुठल्या आणि कोणत्या पाण्यापासून तो बर्फ बनत असेल आणि बर्फ खाल्याने सर्दी  खोकलाहोईल,ताप येईल,घसा खराब होईल असे बरेच काही ती सांगत असे.सुर सुर असा आवाज करत तो बर्फाचा गोळा चोखायचो आणि त्याची मनमुराद चव घ्यायची.मग त्या रंगाने तोंड आणि हात दोन्ही रंगून जायचे.कधी कधी तर तो रंग शाळेच्या गणवेश असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र  शर्टावर पडत असे आणि घरी गेल्यावर आई पटकन ओळखत असे की स्वारी आज बर्फाचा गोळा खाऊन आली आहे.मग तिची बडबड चालू असे की किती वेळा सांगितले तो बर्फाचा गोळा खाऊ नकोस तो कसा आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि बरेच काही.पण तिच्या त्या बोलण्याकडे लक्ष असायाचे कुठे.मी तर रममाण झालेलो असायचो ते आज गोळा खाताना किती मज्जा आली ह्याकडे.

तसे तर गोळ्याचे बरेच प्रकार आहेत जसे की बर्फाचा लकडी गोळा,बर्फाचा चमच गोळा, दुधाचा गोळा ,मलई गोळा इत्यादी.मला बर्फाचा लकडी गोळा जास्त आवडतो कारण त्या काठीवरील तो बर्फाचा गोळा पडू नये म्हणून केली जाणारी कसरत, ते विविध रंगाने रंगणारे हात व तोंड. आमच्या लहानपणी काही मोजकेच रंग आणि चवीमध्ये उपलब्ध असणारे हे गोळे आत्ता इंद्रधनूच्या रंगाप्रमाणे आणि विविध चवीमध्ये उपलब्ध झाले आहेत.आमच्या लहानपणी ओरेंज,काला खट्टा,कच्ची कैरी ह्या चवीच्या गोळ्यांना जास्त मागणी होती.

उन्हाळी सुट्टीत गावी जायचो तेव्हा दुपारी दोनच्या सुमारास सायकल घेऊन एक गोळेवाला भैया यायचा.ह्या गोळेवाल्याकडे दुधापासून बनवलेले गोळे मिळायचे.आम्ही सर्व भावंडे रोज गोळा खायचो.त्याच्या सायकलला एक छोटी घंटा होती ती वाजवत तो यायचा.रोज त्या घंटेची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. आणि तो गोळेवाला भैया आला की त्याच्या सायकलसकट त्याला घेराव घालून कल्ला करत असू.आमच्या काकीला एक सवय होती घर खर्चातील उरलेले पैसे ती भांडांच्या मांडणीतील एकदम वरती असलेल्या स्टीलच्या तांब्यामध्ये ठेवत असे.त्यातील पैसे घेऊन (चोरून) आम्ही गोळ खात असू.आम्ही त्यातील पैसे घेऊन गोळा खातो हे तिला नक्कीच माहीत होते कारण ती त्यात सुट्टे पैसे जास्त ठेवत असे जेणेकरून आम्हाला गोळा खाता यावा त्यावेळेस त्या भैयाकडे गोळा १,२ आणि ५ रुपयाला मिळत असे.पण आम्ही १रुपयाचा गोळा रोज खात होतो.समजा मुंबईहून आईपपा आले किंवा कोणी काका आले आणि आम्हाला तगडे प्रायोजकत्व मिळाले तर त्या दिवशी ५ रुपयाचा गोळा मिळायचा. ज्या गोळ्यामध्ये बदाम व बेदाणे असत.मग तर आमच्या आनंदाला उधाण आलेले असायचे.

माझा मोठा काका उत्तम क्रिकेट खेळत असे.त्याचे क्रिकेटचे सामने बघायला आम्ही पालघर आणि आजूबाजूच्या गावामध्ये जात असू.त्याचे पालघरला सामने असले की आम्हाला विशेष आनंद व्ह्यायचा कारण तिथे मिळणारा गोळा. आर्यन शाळेच्या मैदानावर त्याचे सामने असायचे आणि त्या मैदानाबाहेर गोळेवाला. त्या गोळेवाल्याचे वैशिष्ट्यं म्हणजे तो प्रत्येक गोळा मधामध्ये घोळवून दयायचा.त्यामुळे त्या गोळ्याची चव अप्रतिम लागायची.ती चव एवढ्या वर्षानंतर आजही जिभेवर रेंगाळते.

पुढे कॉलेजला गेल्यावर येता-जाताना मध्ये शिवाजी पार्क लागायचे आणि तिथे तर वर्ष्याच्या बाराही महिने गोळेवाला असतो मग कधीतरी पॉकेटमनीमधून साचलेल्या पैशातून जमेल तसे आणि जमेल तसा गोळा खायचो. मी कॉलेजला होतो तेव्हा गोळा १० रुपयाला मिळायचा.आत्ता मी मोठा होऊन ऑफिसला जातो तेव्हापण गोळेवाला दिसला आणि मला वेळ असेल तर मी आवर्जून गोळा खातो.रीतसर गोळा खातो मी अजूनही म्हणजे शर्टच्या बाह्या दुमडून वरती करून,आपल्याला कोण बघत आहे कोणी नाही ह्याची पर्वा न करता.माझे ऑफिसचे मित्र मला म्हणतात ना वय विसरून अगदी लहान मुलासारखा गोळा खातोस तेही सुरसुर असा आवाज काढत. आजही मी गोळ्याचा तितकाच आस्वाद घेतो जेवढा लहानपणी असताना घायचो तसा.गोळा खायला वय नाही लागत तर आपल्यातील लहान मूल जपता आले पाहिजे.त्याचा मनमुराद आस्वाद घेता आला पाहिजे.

आत्ता कधीतरी गिरगाव किंवा जुहू चौपाटीला जातो तेव्हा तेथील अनेक गोळ्याची दुकाने पाहतो.त्यांच्याकडे तर विविध रंग आणि चवीचे गोळे आत्ता उपलब्ध आहेत.त्या विविध रंगाच्या बाटल्या पाहून बालपणीचा रम्य काळ आठवतो.आत्ता तर गोळा ४० रुपयाला मिळतो आणि मग आठवतो तो शाळा सुटल्यावर १ रुपयात खालेला गोळा आणि मन भूतकाळामध्ये रममाण होते.ह्या गोळ्याने त्याच्या इंद्रधनू रंगासारखे माझे बालपण रंगून टाकले होते.

हा गोळा मला खूप आवडायचा,आवडतो आणि आवडत राहील हेच सत्य आहे.आणि हे सत्य कधीही बदलणार नाही ह्याची जबाबदारी माझी असेल.

- सुयश गावड


Tuesday, July 7, 2020

गर्द सभोवती....




गर्द सभोवती....

गर्द सभोवती....हे लोटस पब्लिकेशन प्रा.लि. आणि आशालता वाबगावकर लिखित पुस्तक वाचले. त्यातील अनेक लेख मी आधी दैनिक प्रत्यक्ष ह्या वृत्तपत्रांमध्ये त्या लिहीत होत्या त्यावेळी वाचले होते.त्यांचा प्रत्येक लेख वाचताना नेहमी कौतुक वाटायचे की ह्या इतक्या सुंदर आणि हृदयस्पर्शी कसे लिहितात.त्यांच्या प्रत्येक कथा मनाच्या ठाव घेणाऱ्या असतात.ह्या पुस्तकामध्ये एकूण ६७ कथा आहेत.सर्वच कथा खूप छान आहेत पण मला अवडलेल्यापैकी हो वाट पाहतोय,काचेच्या बांगड्या,तुम्ही मले नेणार नाय?,वेदना,अवलिया,येई हो विठ्ठले ह्या जास्त भावल्या.

आजपर्यंत आपल्याला आशालता वाबगावकर ह्यांची फक्त एक अभिनेत्री आणि गायिका एवढीच ओळख होती.पण त्यांच्यामध्ये एक संवेदनशील मनाची लेखिकासुद्धा दडलेली आहे हे अनिरुद्ध बापूंनी म्हणजेच आमच्या सद्गुरूंनी जाणले.आणि त्यांच्या हाती लेखणी धरण्याची ताकद व त्या लिहू शकतात ह्या विश्वास त्यांनी दिला.गर्द सभोवती रानसाजणी तू तर चाफेकळी बालकवींनी लिहिलेले आणि पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यानी स्वरबद्ध केलेले गीत आशालता वाबगावकर ह्या गायिका-अभिनेत्रीने अजरामर केले.ह्या कथेतील पात्र काही निसर्गाने दिली तर काही त्यांच्या सभोवती सापडली आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पुस्तकाला गर्द सभोवती हे नाव दिले असावे असे मला वाटते.

आशालता ताईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे साधे,सोपे विषय आणि ओघवती लेखनशैली. आजवरच्या कथेतील बरीच माणसे त्यांच्या आयुष्यात येऊन गेली काही,कुठेना कुठेतरी भेटली गेली.त्यांच्या व्यवसायानिमित्त त्या सतत बाहेर असत तिथे काही दिसले की त्या आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवीत.काही किस्से येता जाता घडत तेही टिपून ठेवीत.निसर्गाची ओढ असणाऱ्या आणि समुद्राची विशेष आवड असणाऱ्या आशालता ताईंनी लिहिल्याला ह्या कथा आपल्याला खूप काही शिकवून जातात.जसे की नात्यांची किंमत,जगण्याची उमेद,खचून न जाता परिस्थितीशी मुकाबला करणे,आपल्याला लाभलेले निसर्गाचे वरदान आणि बरच काही...

आशालता ताईंनी ज्याप्रमाणे ह्या कथा लिहिल्या तेव्हाचा तो त्यांचा नजरिया आपल्याला जगण्याकडे वेगळया पद्धतीने बघायला शिकवतो.त्यांच्या लिखाणात संवेदनशील मनाच्या व्यक्तीचे प्रतिबिंब जाणवते.त्यानी रोजच्या जगण्यातील कितीतरी संदर्भ इतक्या हळुवारपणे या कथामध्ये मांडले आहेत की ते वाचून थक्क वाहायला होते.

ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मला उपस्थित राहण्याचा योग आला.आयुष्यात पहिल्यांदा कोणत्यातरी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मला उपस्थित राहता आले.आणि ते केवळ शक्य झाले लोटस पब्लिकेशन प्रा.लि. ह्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा खूपच दिमाखदार झाला.

आशालता ताईंनी उत्तरोत्तर असे अनेक लेख आणि पुस्तकं लिहीत राहवी ही सदगुरुचरणी प्रार्थना!आणि त्यांना अनेक शुभेच्छा!

-  सुयश गावड

,

काय असते कविता

काय असते कविता

कविता म्हणजे हरवलेला श्वास
कविता म्हणजे त्याच्या आठवणींचा ध्यास

कविता म्हणजे तिच्या डोळ्यातलं काजळ
कविता म्हणजे त्याच्या मनातलं वादळ

कविता म्हणजे सावली मायेची
कविता म्हणजे गुलाबी थंडीत उब गोधडीची

कविता म्हणजे त्याच्या मनगटातल बळ
कविता म्हणजे पोरीसाठी हळळणार बापाचे मन

कविता म्हणजे गोळाबेरीज स्वप्नांची
कविता म्हणजे उसवलेल्या नात्याना वीण शब्दांची

- सुयश गावड

Monday, July 6, 2020

झोपाळा...


झोपाळा...

झोपाळा... सर्वांच्याच आवडीचे ठिकाण.लहानपणी मला पण आपल्या घरी एक झोपाळा असावा असे नेहमी वाटायचे.पण मुंबईसारख्या शहरामध्ये घरात झोपाळा लावायला आमचे घर तेवढे मोठे नव्हते.म्हणून ते कधी शक्य झाले नाही.पण सुट्टीत गावी गेल्यावर काही लोकांच्या घराच्या ओट्यावर(ओसरी)लाकडी झोपाळे असायचे.ते पाहून खूप अप्रुप वाटायचे आणि ज्यांच्याकडे झोपाळा आहे त्या लोकांचा हेवा.कोकणातील किंवा आमच्या गावच्या बहुतेक जुन्या घरात ओट्यावर लाकडी झोपाळे असयाचे. आमच्या गावच्या घराला ओटा होता पण त्यावर झोपाळा नव्हता.परंतु आमच्याच शेजारात राहणारे विलास नाना आणि बाबी ताई ह्यांच्या घरी ओटीवर झोपाळा होता आणि आजही आहे.रोज दुपारी किंवा संध्याकाळी ह्या ना त्या अनेक कारणांनी आम्ही त्यांच्याकडे जात असू व त्या झोपाळ्यावर बसत असू आणि झोके घेत असू.असे आम्ही संपूर्ण सुट्टीभर करत असू.अर्थात त्यांना ही हे माहीत होते की आम्ही झोपाळ्यावरच बसायला येत होतो.पण त्यांनी कधीच त्या झोपाळ्यावर बसण्यापासून अडवले नाही.

लहान असताना पाय जमीनीला टेकत नसतानासुद्धा त्या झोपाळ्यावर बसून झोके घ्यायची मज्जा काही औरच होती.त्या झोपाळ्यावर बसल्यावर एकदम शांत आणि निवांत वाटायचे.सगळी भ्रांत दूर झाल्यासारखी वाटायचे.झोके घेत असताना जाणवणारी वाऱ्याची झुळूक मनाला सुखावून जायची.त्या झोपाळ्यावर बसण्यासाठी आम्हा सर्व भावंडाची धडपड असे.त्या झोपाळ्यावरून आम्हा भावंडामध्ये अनेकदा भांडणे झाली.प्रत्येकाला १०-१० झोके असा नियम होता आपले १० झोके झाले की परत नंबर लावायचा.आज मोठें झाल्यावर हे सर्व आठवले की खूप हसू येते आणि हा सर्व अट्टाहास फक्त त्या झोपाळ्यावर बसण्यासाठी आम्ही करत असू.कोणाचा झोका उंच जातो ह्याच्यामध्ये चढाओढ असे.

आज गावी आम्ही स्वतःचे घर बांधले आणि जे स्वप्नं मी लहानपणापासून उराशी बाळगलं होते की आपल्या घरी झोपाळा हवा ते आज सत्यात उतरले आहे.त्याचा खूप आनंद होतो.आमच्या घरचा लाकडी झोपाळा माझ्या वडिलांनी थेट निर्मळ ह्या गावावरून आणला आहे.हे गाव लाकडी वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.आज मी त्या झोपाळ्यावर बसतो,झोके घेतो,झोपतो,खातो,पुस्तक वाचतो हे सर्व करताना खूप भारी वाटते.आणि मग आठवतात ते बालपणीचे दिवस.ह्याचसाठी केला होता अट्टाहास.आज कोणी मला विचारले की घरातील तुझी सर्वात आवडती जागा कोणती ?तर अर्थात माझे उत्तर असेल झोपाळा.त्याच्यावर बसले की एकदम निवांत वाटते.

झोक्यावर झोका घेई झोका उंच उंच जाई

तशी आज माझी गत आहे.माझ्या सुखाचे आणि विसाव्याचे ठिकाण झोपाळा.

- सुयश गावड

चौंडकं

चौंडकं

मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित राजन गवस लिखीत चौंडकं हे पुस्तक नुकताच वाचनात आले.जेव्हापासून जोगवा हा चित्रपट बघितला आहे तेव्हापासून हे पुस्तक वाचायचे होतें पण ते पुस्तक वाचण्याचा योग आत्ता ह्या लोकडोऊनमध्ये आला.अप्रतिम लेखनशैली असलेले असे हे पुस्तक आहे.ह्या पुस्तकातील कथा लेखक राजन गवस यांनी खूप सुंदररित्या वर्णन केली आहे.

आपल्या समाजातील देव,धर्म,अनिष्ट रूढी-परंपरा ह्यांचा बळी म्हणजे देवदासी.जोगतीण देवाची अन मालकी गावाची ही आपल्या बोलीभाषेतील म्हण जोगतिणीच्या जगणंच सार सांगते आणि हेच सार लेखक राजन गवस ह्यांनी ह्या पुस्तकामध्ये वर्णन केले आहे.

देवाच्या नावावर समजातील राक्षसीवृत्तीने निर्माण केलेल्या प्रथेचा बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ लेखकाने ह्या पुस्तकामार्फत वाचकांसमोर ठेवलेली आहे.ह्या कथेचे कथानक सुली एक ठसठशीत वेदना आपल्यासमोर ठेवते.देवदासीच्या जगण्यातील सर्व दुःख आणि तिच्या समस्यांचा वेध लेखकाने सुलीमार्फत ह्या पुस्तकामध्ये वर्णन केला आहे.हे समाज चित्र रंगविताना लेखकाची लेखनशैली ही इतकी साधी आहे की सत्याचे अनेक आशय सहजपणे सांगत ती अन्याय बोलका करते.देवदासीच्या कोंडलेल्या मनाचा भावनिक स्फोट ह्या पुस्तकामध्ये वर्णन केला आहे.देवदासीच्या मनाची कोंडी व होरपळ लेखकाने अचूक वर्णन केले आहे.

समाजावर देवदासी प्रथेचा असलेला पगडा व त्यामागील अंधश्रद्धा ह्यांचा अचूक वेध लेखकाने ह्या पुस्तकामध्ये घेतला आहे असे मला वाटते. खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन करणारे व देवदासींसारख्या अनिष्ट्य रूढी व परंपरेचे खंडन करणारे हे पुस्तक खरच वाचनीय आहे .

-सुयश गावड 

Sunday, July 5, 2020

व्यक्ती आणि वल्ली


व्यक्ती आणि वल्ली

२०१९ हे वर्ष पु.ल.देशपांडे- जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने मनात पु.ल.देशपांडेंच्या बऱ्याच आठवणी दाटून आल्या.जसे की त्यांनी लिहिली अनेक दर्जेदार पुस्तके, नाटके.तुझे आहे तुजपाशी,सुंदर मी होणार, ती फुलराणी ही नाटकं तर त्यांनी लिहिलेली बटाटयाची चाळ, अपूर्वाई,पूर्वरंग,व्यक्ती आणि वल्ली अशी अनेक पुस्तके. जवळ जवळ मी सर्वच पुस्तक त्यांची वाचली आहेत पण त्यात सर्वात भावलेले पुस्तक म्हणजे व्यक्ती आणि वल्ली.मी हे पुस्तक आधी पण वाचले होते पण ह्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने परत एकदा व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचायला घेतले.आणि परत एकदा ह्या सर्व व्यक्तीचा आणि त्यांच्यातील वल्लीचा मनमुराद आनंद लुटला.

मग तो नारायण असो की.... हरी तात्या असो की... नामू परिट असो की....सखाराम गटणे असो की.....अंतू बरवा असो की.... पेस्टन काका असो सर्वच व्यक्ती मस्त आहेत. पु ल देशपांड्याच्या लेखनशैलीबद्दल मी काय बोलणार ती तर सर्वांनाच माहीत आहे की.पण त्यांच्या लेखणीतून ही सर्व व्यक्ती आपल्याला भेटल्यासारखी वाटतात व आपल्या कायम लक्ष्यात राहतात .

पु.ल.देशपांड्याना अनेकांनी विचारले होते की तुम्हाला ह्या व्यक्ती खरोखरच भेटल्या आहेत का?तर पु.ल म्हणतात की.... म्हटल्या तर भेटल्या आहेत ,म्हटल्या तर नाहीत.ह्या पुस्तकाला नटवणारे चित्रकार गोडसेनी पु.ल ना विचारले होते की ही माणसं जर जिवंत होऊन तुम्हाला भेटली तर काय कराल?पु ल म्हणाले, -मी त्यांना कडकडून भेटेन!

खरंच मला पण असेच वाटायचे की मला अश्या व्यक्ती भेटल्या तर?पण नंतर मनात विचार येतो की अश्या व्यक्ती भेटील,भेटत राहतील पण त्यांच्यातील दडलेली वल्ली मी ओळखू शकेन?तर उत्तर आहे नाही कारण ते पु ल होते म्हणून ते त्यांच्यातील वल्लीपण ओळखू शकले.

ह्या सर्व व्यक्तीचे वल्लीपणा रंगवताना पु ल नी  त्यांच्यावर विनोद केले पण त्याला करुणेची किनार होती ,प्रत्येक व्यक्तीबद्दल असणारी पु ल ची आत्मीयता दिसून येते.हे पुस्तक वाचताना मनाला एक निर्मळ आनंद मिळतो.आणि जर पु.ल च्या ह्या व्यक्तींचे वल्लीपण जर पु ल च्या तोंडून ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरे नशीबवान.

आपल्याही आयुष्यात अशी अनेक माणसे/व्यक्ती आपल्याला भेटतात पण त्याच्यातील वल्लीपण जाणण्यासाठी पु.ल.सारखी शोधक नजर हवी. योग्य वेळी त्या व्यक्तितील वल्लीपण आपल्याला हेरता आले पाहिजे.

अश्या पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या व्यक्तीना मनापासून सलाम!!!

- सुयश गावड
 

प्रपंच


प्रपंच...
 
साधारण १९९८-१९९९ सालातील ही मालिका असेल तेव्हाचे अल्फा मराठी(आत्ताचे झी मराठी) त्यावर ही मालिका दाखवली जायची.आठवड्यातून एकदाच असायची ही मालिका. बुधवारी रात्री ९ वाजता.मी असेन तेव्हा शाळेत आठवी - नववीमध्ये. त्यावेळेस माझी सर्वात आवडती मालिका होती.

जुने जाणते कलाकार त्याबरोबरच नविन तरुण कलाकार ह्यांचा अभिनय उत्तम होता म्हणजे मालिकेतील अण्णा-आकापासून ते कलिकापर्यंत सर्वांचा अभिनय उत्तम होता.तरीही ह्या मालिकेचे मला विशेष अप्रूप वाटे ते त्याच्या वर्सोवाजवळील "आश्रय" बंगल्यामुळे, बंगल्यातील आतील बाग,बंगल्याच्यामागील फेसाळणारा समुद्र व तिथून दिसणारा सूर्यास्त,झोपाळा सर्वच अप्रतिम होते.

त्यावेळेस ही मालिका मज्जा म्हणून पाहणारा मी त्यादिवशी मोबाईलमध्ये युट्यूबवर काहीतरी शोधताना ह्या मालिकेचे ७८ भाग मिळाले आणि मी ते गेल्या ३-४ दिवसामध्ये बघितले.तेव्हा वय व विषयाची जाण कमी असल्यामुळे की काय मला त्या मालिकेचा विषय नीटसा समजू शकला नसावा.

एकत्र कुटुंब,जुना बंगला, कुटुंबामध्ये असणारा ओलावा,एकत्र कुटुंब पद्धतीमधील मज्जामस्ती कुटुंबातील छोटे छोटे वाद,आजी-आजोबांचे प्रेम, भांवंडांमधील मस्ती हे सर्वच खूप मनाला हेलावून टाकणारे होते.आजकालच्या दुनियेमध्ये एकत्र कुटुंब सहजा सहजी दिसत नाही म्हणूनच ह्या मालिकेचे विशेष कौतुक वाटते.

मालिका बघताना अचानक डोळे पाणाव्याचे तर कधी खूप हसू यायचे.हसू आणि आसू यांचे योग्य मिश्रण असणारी ही प्रपंच मालिका खूप काही शिकवून गेली.मालिकेचे उत्तम दिगदर्शन प्रतिमा कुलकर्णी ह्यांनी केले होते आणि मालिकेचे शिर्षकगीत सौमित्र ह्यानी लिहिले होते पण त्यामागील गायक रवींद्र साठे ह्यांचा आवाज  मनात घर करून जातो(माय बाप माय बाप....माणूस म्हणून जगणे थोडे जगून पहा).मालिकेचा शेवटचा भाग माझ्या अजून लक्ष्यात आहे.एका प्रेक्षकाने दिलेली मोठी दीपमाळ त्या शेवटच्या भागात प्रज्वलित करून आश्रय बंगलाला आणि मालिकेला मानवंदना दिली होती.एकंदरीत काय तर आटोपशीर मालिका आणि उत्तम सवांद ह्यामुळे ही मालिका कायमची लक्ष्यात राहीली

अशी दर्जेदार आणि आपल्यासारख्या प्रेक्षकवर्गाला अंतर्मुख करणारी मालिका खूप काही शिकवून जाते.

प्रपंच मालिकेच्या सर्व टीमचे मनापासून आभार....खूप सुंदर आठवणी दिल्याबद्दल....

- सुयश गावड

प्रपंच शीर्षक गीत

मायबाप.. मायबाप..
माणूस होऊन जगणे थोडे जगून पहा
देवपणा तू सोडून खाली उतर जरा
मायबाप.. मायबाप..
तू नसल्याचा भास पसरला चहुकडे
दगडमातीच्या भिंतींमधुनी विहर जरा
मायबाप.. मायबाप..
सुखदु:खाचे झाले आता गाव जुने
त्या हसण्या-रडण्यामाधुनी तू बहर जरा
मायबाप.. मायबाप..
या जगण्यातून काढून घे हे जहर जरा
उलट जरासा दु:खाचा हा प्रहर जरा
मायबाप.. मायबाप..
रडता रडता या ओठांवर कधितरी
हसण्याचाही कर जरासा कहर जरा
मायबाप.. मायबाप..
अंगण होईल देव्हार्‍यासम पावन हे
वेलिवरल्या पानाफुलातून डवर जरा
मायबाप.. मायबाप..

गीतकार- सौमित्र
संगीतकार- राहुल रानडे
गायक- रवींद्र साठे



आणि तुझ्या विश्वासाला तडा गेला.....


आणि तुझ्या विश्वासाला तडा गेला.....

काल सकाळपासून तुझ्याबद्दलची बातमी सोशल मीडियावर वाचतो आहे.बातमी आणि फोटो पाहून मन हेलावून गेले.फक्त पूर्ण दिवस तू दिसत होती देवीम्मा डोळ्यासमोर ,निश्चल आणि शांतपणे उभी असलेली. सायलेंट वेलीमधून तू अन्नाच्या शोधात पलकड जिल्ह्यात आलीस.तुला काय वाटले तुझ्यासारखा मुख असणाऱ्या गणपतीची पूजा करणारा हा मानव आणि त्या गणपतीला आवडणारा नैवद्य अर्पण करणारा हा मानव ,तुला ही भूक लागली म्हणून नैवद्य देईल का?हो नैवद्य त्याने दिला तुला पण कपटनीतीने.अननसामध्ये फटाके घालून .बुध्दीची देवता असणारा हा गणराज आम्हा मानवाला कधी सुबुद्धी देतो आहे बघूयात?

देवीम्मा आणि तू आमच्यावर विश्वास ठेवला आणि ते अननस खाल्ले. पण त्यामध्ये असलेल्या फटकामुळे तुझी काय अवस्था झाली असेल त्याची कल्पना पण करवत नाही.तुला किती वेदना झाल्या असतील ह्याचा विचारसुद्धा करता येत नाही.तुझ्या अंगाचा दाह होत असताना तू शांतपणे चालत राहिलीस आणि शेवटी वेल्लीयार नदीच्या पात्रात जाऊन उभी राहिलीस.

हे दुष्कृत्य करून आम्ही मानवजातीने पुन्हा एकदा सिद्ध केले की आम्ही माकडाच्या वंशाचे आहोत.आणि कधी थांबणार आमच्या अश्या टुकार मर्कटलीला?आमच्या अश्या मर्कटलिलेपायी  आम्ही तुझा तर जीव घेतला पण तुझ्या उदरात वाढणाऱ्या त्या निष्पाप जीवाचा पण जीव घेतला .

सुशिक्षित असण्यापेक्ष्या सुसंस्कृत असणे जास्त महत्वाचे असते हे केरळच्या लोकांनी परत एकदा सिद्ध केले आहे.देवीम्मा तू मानवाच्या खऱ्या चेहरामागचा राक्षसी आणि कपटी चेहरा कधीच बघितला नव्हतास का?आम्ही मानव एकमेकांवर विश्वास ठेवत नाही मग तू कसा आमच्यावर विश्वास ठेवलास. आणि  आमच्यावर विश्वास ठेवलास इथेच तू  खूप मोठी चूक केलीस.
आणि तुझ्या विश्वासला तडा गेला....

  - सुयश गावड

समुद्र




समुद्र

समुद्र...हे नाव ऐकले की मनातच आनंदाची भरती येते.आणि त्याच्या लाटा पायांना गुदगुदल्या करू लागतात.माझे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील वडराई.नावावरूनच कळले असेल की येथे वडाची गर्द राई आहे.नारळी पोफळीच्या बागेतून वळणदार रस्त्याने आमचे गाव येते.समुद्रकिनारी वसलेले सुंदर गाव.पालघर स्थानकापासून केवळ ११ किमी.मला आमचे गाव आवडते त्याच्या निसर्गयरम्य सौंदर्यामुळे.परंतु मला गावचे विशेष आकर्षण त्याला लाभलेल्या सुंदर आणि स्वच्छ समुद्राचे.

लहानपणी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो तेव्हा रोज संध्याकाळी समुद्रावर खेळायला जायचो.क्रिकेट,लगोरी,घड्याळ असे विविध खेळ खेळायचो.तिथेच समुद्रकिनारी बसून लाडू,किल्ले,डोंगर बनवायचो वाळूने.तर कधी ओहोटी असली की समुद्रातील खडकांवर बसून सूर्यास्त पाहायचो.आमच्या गावाच्या समुद्रात एक हत्तीच्या आकाराचा काळा मोठा खडक आहे.सर्व त्याला हत्ती दगड म्हणतात.त्या हत्ती दगडावर बसून सूर्यास्त बघणे म्हणजे नेत्रदीपक सुख.ह्याच दगडावर बसून पालघरच्या पूर्व दिशेकडील डोंगर दिसत.ह्याच समुद्रकिनारी आम्ही शंख शिंपले वेचत असू.शंख शिंपले वेचणे हा तर माझा आवडता छंद.समुद्रकिनारी ओल्या वाळूत आपल्या पायांचे ठसे बघायला मज्जा यायची.आपली नावे त्या मातीत कोरायला खूप आवडायचे. फेसाळणाऱ्या लाटांशी पकडापकडीचा खेळ खेळणे म्हणजे तारेवरची कसरत. 


समुद्र भव्य तरीही शांत आणि प्रेमळ.नदी,नाले,ओहळ खूप असतात परंतु ह्या सर्वाना मिठीत सामावून घेणारा समुद्र हा एकच असतो.त्याची निरव शांतता मनाला विचार करायला भाग पाडते. त्याच्या शांततेमध्ये आपल्याला पडलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे सापडू शकतात.त्याच्या शांततेमध्ये आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते.त्याच्या लहरण्यारा लाटा आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात.समुद्र...आपण ज्या गोष्टी देऊ ते तो आपल्यामध्ये सामावून घेतो. ह्या समुद्रासारखे आपल्याला होता आले पाहिजे सर्वांना सामावून घेता आले पाहिजे.

लहानपण माझे समुद्रकिनारी गेले असल्याने मला इतर ठिकाणच्या समुद्राचे तेवढे विशेष अप्रूप नाही.काही वर्षांपूर्वी ऑफिस मित्रांसोबत गोवाला गेलो होतो पण तेथील समुद्राने तितकेसे आकर्षित नाही झालो मी.आई आणि पपा काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले आणि त्यानी त्यांचे उर्वरित आयुष्य गावी व्यतीत करायचे असे आम्हाला सांगितले व त्यांनी ह्याच आमच्या गावच्या समुद्रकिनारी घर बांधले.समुद्राच्या भरतीचे पाणी आत्ता आमच्या कुंपणाला लागते. जे कोणी घरी येते त्यांना घर व घरामागील अथांग समुद्र फार आवडतो. मला लोक म्हणतात तू फार भाग्यवान आहेस की तुझे समुद्रकिनारी घर आहे.

ह्या लोकडावूनमध्ये मी गावीच असल्याने रोज संध्याकाळी समुद्रावर फिरायला जायचो.तेव्हा ह्या समुद्राची परत नव्याने ओळख झाली.किनाऱ्यावर वाळूत बसून अस्ताला जाणार सूर्य पाहणे.त्याने पसरविले विविध रंगाच्या छटा आसमंतात बघणे म्हणजे एक दिव्य अनुभूती.

समुद्रकिनारी सूर्य अस्ताला जाताना त्या सांजवेळी कोणाच्या तरी आठवणीने मन कातरले जायचे.आजही रोज समुद्रावर फिरायला जाताना संपूर्ण बालपणीचा काळ डोळ्यासमोरून तरुलून जातो.आणि पुन्हा एकदा मनात विचार येतो की ह्याच तो समुद्र का जिथे आपण खेळायचो?ओळखतो का हा आपल्याला?आणि पुन्हा मन आठवणींच्या डोहात सूर मारतो.


-सुयश गावड

तुझी आठवण....

तुझी आठवण....

तुझी आठवण म्हणजे
ओल्या मातीतील सुगंध,

तुझी आठवण म्हणजे
साथ न सोडणारी सावली,

तुझी आठवण म्हणजे
गुलाबी थंडीतील उब गोधडीची,

तुझी आठवण म्हणजे
हवी हवीशी वाटणारी साथ,

तुझी आठवण म्हणजे
सुखात हास्याची लकेर,

तुझी आठवण म्हणजे
दुखावरची अलगद फुंकर,

तुझी आठवण म्हणजे
मायेच्या ओलाव्याचा स्पर्श,

तुझी आठवण म्हणजे
प्रेमाचा खळखळता झरा,

जितकी सुखद तुझी आठवण
तितकीच माझ्या आयुष्याची साठवण

-सुयश गावड