Thursday, July 16, 2020

शाईचं पेन


शाईचं पेन...

हल्ली बरेचदा असे जाणवते की काही गोष्टी नाहीशा होऊ लागल्या आहेत , पण या नाहीशा होऊ घातलेल्या गोष्टी अथवा विस्मृतीत जाणाऱ्या गोष्टी आठवल्या की मन थोड़सं हळवं होतं आणि आठवणीत रमतं . उदा. शाईचे पेन. स्मार्टफोन / टॅब / कॉम्पुटर/लॅपटॉपच्या जमान्यात कागदावर लिहायला तसं कोणी जातं नाही ,वेळ आलीच तर बॉलपेन असते.पण त्या महिन्या महिन्याला बदलणाऱ्या किंवा रिफील न होणाऱ्या पेनात काही आपलेपणा वाटतं नाही ,जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाई पेनामध्ये होता.

माझी शालेय जीवनाची सुरुवात पाटी आणि पेन्सिलीने झाली . पहिलीत गेल्यावर शिसपेन्सिल हातात आल्याचे आठवते.मी पहिलीत होतो तेव्हा माझी ताई चौथीला होती. त्यामुळे ती शाईचे पेन वापरायची. आमच्या शाळेमध्ये चौथीपासून शाईचे पेन बंधनकारक होते.त्यामुळे त्या शाईच्या पेनचे मला तेव्हापासूनच अप्रूप होते व आपण कधी एकदा मोठे होणार आणि शाई पेन वापरायला लागणार असा प्रश्न पडायचा.मी मग चौथीत गेल्यानंतर काळ्या रंग्याचे कॅम्लिनचे जाड मोठे निब असलेले पेन वापरू लागलो,ह्या पेनने लिहिणे म्हणजे कसरतच असायची.त्याच्या पोटापाशी पारदर्शी काच होती.यातून त्याच्या पोटातली शाई दिसायची. अजून किती काळ ती पुरेल याचा अंदाज यायचा. निब तुटले की ते आणून पुन्हा बसवणे हेही अवघड काम. त्यात हात खराब होणे ठरलेलं. मग एखादा शाईने माखलेला हात चुकून गणवेशाला(पांढऱ्या शर्टला) लागला तर झालंच. शिवाय शाई पेनाच्या टोकापर्यंत येण्यासाठी कितीतरी वेळा झटकावा लागायचा. असेच अनेकदा पेन झटकून शेजारच्या मुला-मुलींच्या अंगावर शाई उडाली आहे. निबच्या आजूबाजूला कधी घाण अडकत असे, (कदाचित कागदाची असावी, माहित नाही), तर ती काढण्यासाठी वडिलांच्या दाढीच्या ब्लेडचा वापर सर्रास व्हायचा. त्यात शाई भरणं एक सोहळा असायचा.त्या पेनात शाई हाताने भरणे , त्यात अर्धी पेनात , पाव हातावर व पाव जमिनीवर असे सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडले जायचे. सरळ शाईच्या बाटलीच्या झाकणातून पेनात शाई भरायचो.गुलाबजामूनमधनं पाक गळावा , तसे पेनाच्या बाॅडीवर शाईचे ओघळ यायचे.पेनाचं पोट भरल्याचं त्या खिडकीतून दिसायचं.मग ते ओघळ पुसायला, माझ्याकडं एक इतिहासकालीन फडकं होतं.मग ड्रॉपरचा उगम झाला आणि बरीचशी शाई पेनात जाऊ लागली.

प्रथम शाईचे पेन वापरताना त्रास होत असे. लिहिण्याचा वेग कमी होतोय असे वाटे पण हळूहळू सवय झाली , मग अक्षरही चांगले वाटू लागले. आमच्या शाळेत बाई सांगायच्या,शाईचा पेनच वापरायचा.त्यानं अक्षराला चांगलं वळण लागतं.माझ्या अक्षराच्या वळणाबाबत आनंदच होता.पण शाईचं पेन आवडलं.कागदावर लिहीताना ठळक वाटायचं.बखर लिहल्यासारखा आनंद व्हायचा.उगाचच आपल्या शब्दांना वजन आल्यासारखं वाटायचं.ते काळं शाईचे पेन फार आवडायचं मला.

पुढे ते कॅम्लिनच्या मोठ्या निबच्या पेनाच्या जागी एकदम फक्त टोक दिसणारे, बाहेरून छान चकचकीत असलेले हिरोचे शाईपेन आले.आम्ही सर्व मुले त्याला चायना पेन म्हणत असू.मग पुढे चायना पेनचीच क्रेझ आली.सोनेरी टोपण असायचं त्याला...मला तर ते सोन्याचंच वाटायचं.चकचकीत , गुळगुळीत.खालची बाॅडी डार्क मरून ,नाहीतर काळ्या रंगाची,नाहीतर हिरव्या रंगाची. ईनबिल्ट ड्राॅपर असायचा त्याला.नीबपण आत लपलेली.पण एकंदरीत लॅव्हिश काम होतं.बाकीची शाईची पेनं आठ दहा रूपयात मिळायची .पण हे तीस रूपयांना मिळायचे त्यावेळेस त्यात शाई भरणेही सोपं होतं. पेनाच्या आतली नळी फक्त शाईच्या बाटलीत घालून ड्रॉपरसारखी वापरायची.शाई भरायचे जिकरीचे काम ह्या पेनाने फारच सोपे केले.मराठीच्या पेपरला तर मी न चुकता हेच शाईपेन वापरत असे.

दररोज शाळेतून आल्यावर शाईने बरबटलेले हात, कपड्यांवर उडालेले शाईचे शिंतोडे बघून आईचा ओरडाही मिळायचा; पण शाईपेन वापरण्यात खूप मजा होती हे नक्की. शाळेत वर्गांच्या भिंतीवर नक्षी म्हणून शाईपेनान शिंतोडे उडवत असू. अर्थातच, अशा पराक्रमांसाठी शाळेत शिक्षाही व्हायची. दोरा शाईत बुडवून वहीच्या मागच्या पानांवर सुद्धा नक्षीकाम चाले.किंवा कागदावर  हाताच्या अंगाठाने,बोटाने शाईचे उमटलेले ठसे व त्याचे चित्र. अश्या असंख्य गोष्टी आम्ही शाई पेनाने करत असू.

शाई पेनाबरोबरच आपण बऱ्याच गोष्टी विसरून गेलो आहोत, याची जाणीव झाली.आता मागे बघताना वाटतं ते पाटी पेन्सिल , दुहेरी ओळींची वही , शिसपेन्सिल , पाढे लिहायची चौकटीची वही ,शाईचे पेन ह्या सर्वच वस्तू आपण विसरत चाललो आहोत .शाईच्या पेनाची शाई आता कधीच वाळलीय मनातून... आत्ता असेच म्हणावे लागेल.आणि आपण शालेय जीवनातील एक मौल्यवान वस्तू हरवून बसलो ह्याची हूरहूर  कायम मनाला लागून राहिली.


- सुयश गावड






No comments:

Post a Comment