Friday, July 17, 2020

ओटा

ओटा

ओटा म्हणजे आमच्या गावच्या बोलीभाषेत घराची ओसरी.गावी आमच्या घरासमोरच टांगेवाल्या राजू काकांचे घर होते.सुट्टीत गावी गेल्यावर आम्ही त्यांच्याच ओट्यावर पडीक असू . आमच्यासाठी हा ओटा कट्टा होता.जिथे आम्ही सर्वजण भेटत असू,गप्पा मारत असू,खेळत असू.जणू आमच्यासाठी सार्वजनिक मैदान.आमच्या काकींचे नाव शमा आहे म्हणून आम्ही "शमाचा ओटा" असे त्याचे नामांतर केले होते.

आई आम्हाला सांगायची आम्ही लहान असताना ती ह्याच ओट्यावर आम्हाला ठेवून खेळवायची.एकंदरीत काय आम्ही लहानाचे मोठे ह्याच ओट्यावर झालो असे बोलणे काही वावगे ठरणार नाही.सुट्टीत ह्याच ओट्यावर बसून आम्ही सर्व भावंडे जेवत असू.म्हणजे आम्ही सर्व भावंडे आपापली जेवणाची ताटे घेऊन ह्याच ओट्यावर येत.ओट्यावर कोण कुठे बसून जेवणार हे ठरलेले होते म्हणजे सर्वांची जागा ठरलेली होती.मी तर त्या ओटीच्या पायरीवर बसून जेवायचो.

ह्याच ओट्यावर बसून आम्ही मेंढीकोट,पाच-तीन-दोन , गुलामचोर,चँलेंज ह्यासारखे पत्त्यांचे खेळ खेळत असू.एवढेच काय तर तीन पत्येसुद्धा आम्ही इथेच खेळत असू(गोट्या आणि पंगाराच्या बिया लावून).ह्याच ओट्यावर बसून आम्ही आंबे,पेरू,आवळे,करवंदे, कच्च्या कैरीच्या फोडी,कच्च्या पपईच्या फोडी,कच्च्या चिंचेची चटणी ह्या सर्व पदार्थाचा आस्वाद घेतला आहे.रोज संध्याकाळी आणले जाणारे वडेपाव व भजी ह्यांची लज्जतसुद्धा ह्याच ओट्यावर बसून घेतली आहे.

वीज गेल्यावर आम्ही भूताच्या केलेल्या गोष्टी ह्या ओट्याने ऐकल्या आहेत.आम्ही गायलेली अंताक्षरीमधली बेसूर गाणी व आम्ही केलेले नृत्य हे सर्व ह्या ओट्याने अनुभवले आहे.त्या गर्मीच्या दिवसांमध्ये शितलतेची शांत झोप आम्ही ह्याच ओट्यावर अनुभवली.

आमच्या ताईचा(अस्मि) साखरपुडा सोहळा,तिच्या हळदीचा सोहळा ह्या ओट्याने जवळून अनुभवले आहे.तिच्या पाठवणीच्या वेळेस आम्ही सर्व भावंडे तिला बिलगून खूप रडलो होतो कारण ती आमच्या ह्या ओटा गॅंगमधली मेंबर होती,त्यावेळेस हा निर्जीव ओटासुद्धा आमच्याबरोबर रडला असणार हे नक्की.

मराठीमध्ये एक म्हण आहे"भटाला दिली ओसरी(ओटा) भट हात पाय पसरी" ही म्हण आमच्याबाबतीत तंतोतंत लागू होते कारण फक्त खेळण्यासाठी दिलेला हा ओटा आम्ही सर्व इतर गोष्टींसाठी वापरत असू. असा हा ओटा आमच्या सुख दुःखाचा साक्षीदार व कायम लक्ष्यात राहणारा...

- सुयश गावड

No comments:

Post a Comment