Wednesday, July 15, 2020

गोधडी

गोधडी

गोधडी....मायेची ऊब. आईच्या किंवा आजीच्या साडीची, लुगड्याची हाताने शिवलेली गोधडी.त्यांच्या मायेसारखीच मऊसूत व तलम.आपल्या महाराष्ट्राच्या मातीच्या मायेचे वैभव.माझ्याकडे पण एक गोधडी आहे जी घेऊन मी झोपतो.माझी गोधडी तर माझ्या पणजीच्या लुगड्यापासून बनवली आहे.म्हणून ती माझ्यासाठी खास आहे.मी शाळेत आठवीत असेंन तेव्हा माझी पणजी गेली.त्यावेळेस फक्त तिची आठवण म्हणून मी तिच्या लुगड्याची गोधडी शिवून घेतली.त्या गोधडीमध्ये आजही माझी पणजी तिच्या मऊ मऊ हाताने मला गोंजारते आहे असा भास होतो.तिचा स्पर्श मला त्या गोधडीमध्ये होतो.मध्यंतरी माझी ती गोधडी फार जीर्ण झाल्याने फाटू लागली होती तर मी ती गोधडी तशीच ठेवून त्यावर माझ्या आजीची सुती साडी घालून परत शिवून घेतली.आत्ता तर माझ्यासाठी त्या गोधडीचा फायदा दुप्पट झाला आहे कारण आत्ता पणजी व आजी दोघींची माया त्या गोधडीतून मला अनुभवता येते तेही एकाचवेळी.

वस्तूंचा वापर कमी करणे(Reduce),त्यांचा पुनर्वापर करणे(Reuse)आणि पुनर्यप्रक्रिया करणे(Recycle). महाराष्ट्रामध्ये जतन करण्यात आलेली गोधडी ही या त्रिसूत्रीचे उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते.जुने ते सोने ह्या उपक्रमाचे ही गोधडी उत्तम उदाहरण आहे.तिला बनविण्यासाठी पण खर्च फार कमी असतो.

मूळ फक्त साड्यांपासून,लुगड्यांपासून तयार होणारी गोधडी आत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या कापड्यापासून शिवली जाते.त्यावर विविध भरतकाम ,विणकाम केले जाते.शोभेसाठी काचा , शिंपल्या,विविध कपड्यांचे तुकडे(patch work)त्यावर बसविले जातात.उबेसाठी आत कृत्रिम कापूस भरला जातो. त्यातून तिचे स्वरूप अजून बदलून ती रजई,दुलईच्या रुपात येते.आत्ता तर गोधडीची ख्याती जागतिक पातळीवर पसरली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गोधडीला खूप मागणी आहे.तिला इंग्रजीमध्ये क्लिट(Quilt) म्हणतात.गोधडी शिवण्याचे तंत्र शिकून घेण्यासाठी गावाकडच्या बायकाना प्रचंड मागणी आहे.गोधडी शिवणे ही एक कला आहे.

गोधडी हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक प्रकार आहे.आजही गावाकडे स्त्रिया आपली दैनंदिन कामे झाली की गोधडी शिवतात.सोलापूरमध्ये तर गोधडी शिवताना स्त्रिया ओव्या गातात. अलीकडे तर गोधडी शिलाई मशीनवर पण शिवता येते.
पण जो आपलेपणा,मायेची उब आपल्या या पारंपरिक
गोधडीमध्ये आहे तो त्या आधुनिक रजई,दुलाईमध्ये नाही असे मला स्पष्ट वाटते.

मला ही गोधडी आपल्यावर माया करणाऱ्या आई, आजी ह्यांचे प्रतीक वाटते.त्या सुती साडीच्या,लुगडाच्या स्पर्शातून या जेष्ठांची माया आपल्या अंगात झिरपत राहते अशी माझी ठाम भावना आहे.गोधडी वरचे मोठे मोठे टाके घरातील माणसांची मन जोडणारी असतात,अगदी कायमची.कारण ते टाके मायेच्या धाग्याने एकमेकात गुंफलेले असतात.सुती साड्या व लुगड्यांपासून केलेली गोधडी म्हणजे साध्या व सात्विक सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण वाटते.गोधडीबद्दल कवी डॉ.कैलास दौंड ह्यांच्या शब्दात सांगायचे तर..

गोधडी म्हणजेच
नसतो फक्त चिंध्यांचा बोचका
गोधडी म्हणजेच गोधडी असते.
मायेलाही मिळणारी ऊब असते.

माझ्यासाठी गोधडी हा जिव्हाळाचा विषय आहे कारण त्यात माझ्या पणजीची व आजीची माया दडली आहे.रोज रात्री झोपताना ती गोधडी अंगावर घेतली की माझी पणजी व आजी मला अंगाई गाऊन थोपटत आहे असाच भास होतो आणि शांत झोप लागते.

- सुयश गावड

   माझी गोधडी

2 comments:

  1. खुप छान अनुभव

    फुलांचा सुगंध पण अशा आठवणींपुढे खुजा ठरेल!

    ReplyDelete
  2. Khar aahe godhadi mhanje mayechi ub aste. Tichyamule aai aaji panji sarvanche premache pratik aahe ashi hi godhadi.😍 Shriram Ambadnya Naathsamvidh 🙏

    ReplyDelete