Saturday, July 11, 2020

लगोरी


लगोरी

लगोरी ... हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. मी दुसरी-तिसरीत असेन, जेव्हा उन्हाळयाच्या सुट्टीत गावी जात असू तेव्हा हा लगोरी खेळ खेळायचो.आमच्या गावच्या घराजवळच शशिकांत नानांचा वाडा(त्यांची छोटी मोकळी जागा होती)होता. तिथे उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये राष्ट्र सेवादलातर्फे रोज संध्याकाळी ४ ते ६ शाखा भरायची.आणि ह्या शाखेमध्ये अनेक विविध खेळ खेळले जायचे.आम्ही सर्व भांवड रोज न चुकता ह्या शाखेत खेळ खेळायला जात असू.उदा. कब्बडी,खो-खो लंगडी,कोंबड्यांची झुंज,लेझीम, लगोरी ,घड्याळ विषामृत,आबाधुभी इत्यादी आणि असे अनेक.माझ्या मते प्रथम लगोरी हा खेळ मी तिथेच शिकलो आणि खेळलो. आणि हा खेळ मला खूप आवडू लागला.आमचे हे सर्व खेळ आमचा पप्पू दादा (उपेंद्र मोरे) हा शिकवायचा.मला आजही स्पष्ट आठवते खूप मन लावून तो आम्हाला ते खेळ आणि त्याचे नियम समजावून सांगायचा.

या खेळात दोन संघ असतात. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगो-या एकावर एक ठेवणे. त्या चेंडूने विस्कळीत करणे (म्हणजेच फोडणे) व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगो-या रचणा-या संघास बाद करणे. असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिकवेळा लावील, तो संघ विजयी होतो.

या खेळात वापरल्या जाणा-या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. ही लगोरी पारंपरिक, विनासंयोजित खेळामध्ये फरशीच्या वा विटांच्या तुकड्यांची असे.आम्ही मात्र जवळच उपलब्ध होणारे सपाट दगड वापरायचो. मात्र आता बाजारात, एकापेक्षा एक होत लहान जाणा-या देवळाच्या शिखराप्रमाणे किंवा शंकूच्या आकारासारखा निमुळत्या होत गेलेल्या सात वर्तुळाकार, रंगीत, गोल आकारांचा लगोरी संच मिळतो. त्या फोडण्यासाठी टेनिसचा चेंडू वापरतात.लगो-या व चेंडू एवढेच साहित्य, साधे-सोपे नियम आणि छोटे मैदान यामुळे हा खेळ खेळण्यास सुलभ ठरतो.(हम दिल दे चुके सनम ह्या चित्रपटामध्ये आपण बघितले असेल हा लगोरी खेळ खेळताना ऐश्वर्या रायला)

या खेळासाठी १८.२८ मी. ते ३०.४८ मी (६० ते १०० फूट) व्यासाचे एक वर्तुळ आखून घेतात. त्याची परीघरेषा ही अंतिम मर्यादा मानतात. या मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखतात. लावताना लगोरी ही येथे रचावी लागते. सात वा अकरा खेळाडूंचे असे दोन संघ असतात. प्रत्येक संघातील एक-एक खेळाडू लगोरी फोडण्यास येतो. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडणारा लागोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी एक क्षेत्ररक्षक मागे उभा असतो. इतर १० क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणा-या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.

लगोरी फोडणारा लगोरी फोडताना बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याला जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लगोरीमागील किंवा शेजारील खेळाडूने वरचेवर झेलला, तर तो बाद होतो. लगोरी फोडणारा लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणा-या खेळाडूंपैकी एकानेच, एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, ते लगोरी लावणे. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगो-या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकाचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणा-यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी त्या संघास एक गुण मिळतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगो-या होतात, म्हणजेच अधिक गुण होतात, तो संघ विजयी घोषित केला जातो.

आणि आपली लगोरी लावून झाल्यावर आम्ही इतक्या मोठाने ओरड्यायचो लगोरी,लगोरी,लगोरी असे.खूप मज्जा यायची.जीव तोडून त्या चेंडूने ती लगोरी फोडायची आणि जीव मुठीत घेऊन धावायचे दुसऱ्या संघापासून वाचण्यासाठी.त्यावेळेस मनामध्ये एकच विचार असायचा की लवकरात लवकर आपली लगोरी लावून तयार कशी करायची.ती लगोरी फोडण्यासाठी अचूक नेमाची गरज असायची.पायाने ती दुसऱ्या संघाची लगोरी फोडण्यात एक असुरी आनंद होता.

त्यानंतर अनेकवेळेस सुट्टीमध्ये गावी गेलो असताना हा लगोरी खेळ खेळलो. पण मुंबईमध्ये किंवा शाळेमध्ये कधी हा खेळ खेळलो नाही ह्याची खंत आहे.त्यामळे लगोरी हा माझ्या आवडत्या आठवणींच्या खजिनेतला खेळ आहे.

विटी-दांडू,सुरपारंब्या,आटा-पाट्या, गोट्या, सागरगोटी लगोरी असे पारंपरिक खेळ आत्ता लोप पावत चालले आहेत.आपली जीवनसरणी बदलली आणि आपण हे खेळ खेळायचे थांबलो. फारसे काही साहित्य न लागणार्‍या अशा या खेळांमधून उत्तम व्यायाम तर होतोच पण आपल्यातले उपजत कला-कौशल्य पणाला लागते. सध्याच्या मोबाइल आणि कॉम्प्युटर 'गेम्स' च्या युगात लोकांनी एकत्र येऊन खेळायला अनन्यसाधारण महत्व आहे.तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दुसरी बाजू ही की लोकांमधील तुटत चालेला संवाद… या खेळांमुळे रोजच्या कामांमधून वेळ काढून लोक एकत्र येतात, खेळतात, करमणूक होते, संवाद वाढतो आणि मन प्रसन्न राहते. आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून आपण येत्या पिढीला हे खेळ शिकवायला हवे असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

- सुयश गावड

2 comments: