टांगा
टांगा....माझ्या बालपणातील सुवर्ण क्षणांचा सोबती.गावी आमच्या घरासमोरच्या घरात राजूकाका आणि त्यांचे कुटुंब राहायचे.त्यांच्याकडे चार-पाच घोडे आणि घोडागाडी म्हणजे टांगा होता.त्यांच्या उदरनिर्वंहाचे साधन हा टांगाच होता.ह्या टांग्यातून ते पत्रे,सिमेंट,भाजीपाला ,नारळ ,शहाळी ,मासे, धान्यांच्या पोती पालघरहून गावात किंवा गावातून पालघरला असे नेत असत.व ह्या सामानाच्या ने-आण करण्याच्या बदल्यात मिळालेले टांग्याचे भाडे ही त्यांची कमाई. सुट्टीमध्ये गावी गेल्यावर त्यांचे हे काम व त्यांची मेहनत लहानपणापासून मी बघत आलो होतो.म्हणून मला त्यांचे व त्यांच्या त्या टांग्याचे भारी अप्रूप.त्यावेळेस गावात खूप टांगे होते.राजुकाकाच्या टांग्याचे नाव अश्व कृपा होते.
सुट्टीमध्ये गावी गेलो की आमच्या दिवसाची सुरुवात ह्या टांगा सफरीने व्हायची.सकाळी आंघोळ करून नाश्ता करून आम्ही सज्ज व्हायचो टांग्यात बसण्यासाठी. आम्ही सर्व भांवडे मग टांग्यात बसत असू आणि गावच्या बस स्टॉपपर्यंत जात असू. असा हा आमचा रोजचा दिनक्रम होता.ह्या दिनक्रमाची आम्हा सर्व भावंडे आणि राजू काकांसुद्धा सवय झाली होती.कधी आम्हा भावंडांपैकी कोणाला उठायला उशीर झाला किंवा आपली नित्यकर्मे उरकायला उशीर झाला की आम्ही घरातूनच ओरडून राजूकाकांना थांबायला सांगत असू.आणि राजूकाका पण सर्वांसाठी आनंदाने थांबत असत.कधी उशीर झाला की आम्ही नाश्ता न करताच जात असू टांग्यात. आम्ही भावंडे टांग्यात बसल्यावर खूप मस्ती करत असू पण राजूकाका कधी आम्हाला ओरडले नाही.टांगा चालू झाला की त्या घोड्यांच्या गळातील घुंगुरु मस्त वाजायचे. स्वतःचा तोल सांभाळून बसण्याची कसरत ह्या टांग्यामध्ये करावी लागे. मग टांग्यातून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाना हात दाखवणे,हाका मारणे असे आमचे वेडे चालू असायचे.आता आठवले की खूप हसू येते.मग आम्हाला सर्वाना बस स्टॉपवर उतरवून राजूकाका त्यांच्या कामाला पुढे जायचे.मग आम्ही घरी जाताना मध्येच घर असणाऱ्या विजूकाकाकडे जात असू. मग विजूकाका आम्हा सर्वांना प्रत्येकी १ रुपया देत असत मग त्यांच्याच घराजवळ असणाऱ्या एका दुकानात आम्ही गोळ्या किंवा चॉकलेट घेत असू व ते खात खात आम्ही घरी येत असू.हा आमचा रोजचा सुट्टीतील दिनक्रम.ह्यात कधीही खंड पडत नसे.
संध्याकाळी राजूकाका टांगा घेऊन परत येत असे त्याच्यानंतर ते घोड्यांची व टांग्याची साफसफाई करत असे त्यामध्ये आम्ही त्यांना मदत करत असू.ते घोड्यांची किंवा टांग्याची डागडुजी करताना आम्ही उगाचच त्यांच्या कामामध्ये लुडबुड करत असू.
त्याकाळी दळण-वळणाची साधने खूपच कमी होती म्हणजे आजच्यासारखी रिक्षा किंवा कोणाची गाडी नसे.तेव्हा हा टांगाच आमच्यासाठी गाडी होती. ह्याच टांग्यातून आम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये जत्रेला जात असू. जत्रेतून येताना त्या पिपाणीचा आवाज आमच्या ह्या टांग्यानेसुद्धा ऐकला होता. ह्याच टांग्यातून आम्ही कितीतरी जणांच्या लग्नाला गेलो आहोत. तेव्हा हा टांगाच आमच्या दळण-वळणाचे व आनंदाचे साधन होते.
मी तर आता आता पर्यंत म्हणजे कॉलेजला असेपर्यंत त्यांच्याबरोबर टांग्यामध्ये जात होतो. आत्ता राजूकाकाचे वय झाले म्हणून त्यांनी घोडे व टांगा दोन्ही विकून टाकले. राजूकाकाने ह्या टांग्याच्या जोरावर संपूर्ण संसाराचा डोलारा सांभाळला. त्यांनी खूप मेहनत केली त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये आणि ह्या टांग्याने खूप साथ दिली त्यांना.काळानुसार आत्ता गावामध्ये टांग्याची संख्या पण कमी झाली.
आजही कोणत्या चौपट्टीवर गेलो की घोडागाडी असतेच.त्या घोडागाडीमध्ये बसल्यावर राजूकाकाच्या टांग्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.त्यांच्या त्या टांग्याच्या आठवणी आजही आमच्या मनामध्ये ताज्या आहेत. आणि मग मनाच्या कोपर्यामध्ये डोकावतो राजूकाकांचा टांगा.
- सुयश गावड
लहानपनी टांगा वर बसने म्हणजे कसरत असे☺️☺️जुन्या आठवणी उजाळा दिला तू सुयश
ReplyDeleteहोय सुयश राजूकाकांचा अश्वकृपा टांगा चांगलाच लक्षात आहे माझ्या पूर्वी पालघरला जाऊन टांगा पासिंग केला जायचा अश्यावेळी टांगा व घोडे सजवून नेले जायचे त्यावेळी टांगा म्हणजे रथ वाटायचा अनेकदा सामान आणताना पालघर ते माहीम हा प्रवास टांग्यातून केला होता. ह्याची आठवण करून दिलीस धन्यवाद
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteटांगा पासिंग करायला नेताना मज्जा यायची.तेव्हा बरेच वेळा टांगा रंगविण्यासाठी आम्ही मदत केली आहे.विविध रंगीबेरंगी रिबिनिने घोड्याना आणि टांग्याला सजवले आहे.राजूकाका हे सर्व काम करत असताना वडापाव खायला दयायचे.खूपमज्जा यायची हे सर्व करताना आणि तुम्ही म्हणालात तसे खरच टांगा म्हणजे रथ वाटायचा.जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
ReplyDeleteKhupach sunder aahe. Ghodagadi aaj suddha havihavishi vatte
ReplyDelete