साहित्य फराळ - दिवाळी अंक
ह्यावर्षी मनाशी पक्के ठरवून ठेवले होते की दिवाळी अंक विकत घ्यायचा आणि वाचायचा.लहानपणी शाळेत असताना गम्मत- जम्मत,किशोर हे लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेले दिवाळी अंक वाचत होतो. झी मराठी चॅनेलवर येणारी उत्सव नात्यांचा ह्या दिवाळी अंकांची झी मराठी चॅनेलवर येणारी जाहिरात बघून तर ठरवलेच होते की ह्यावर्षी दिवाळी अंक वाचायाचा.एवढ्या वर्षानंतर आज आयडियल त्रिवेणी दुकानात जाऊन दिवाळी अंक विकत घेतले.कोणता दिवाळी अंक घेऊ आणि कोणता नको असे झाले होते.एक एक दिवाळी अंक चाळताना दिवाळीच्या एक एक फराळाची चव घेतल्यासारखे वाटत होते.लहानपणी आईबरोबर शाळेची पुस्तक घ्यायला म्हणून आयडियल बुक शॉपमध्ये जाणार मी आज दिवाळी अंक घ्यायला गेलो ह्याचे मला माझेच अप्रूप वाटते.
तिथे दिवाळी अंक चाळताना अधोरेखित ह्या दिवाळी अंकांचे कार्यकारी संपादक श्री. गीतेश शिंदे ह्याच्याशी झालेली भेट म्हणजे एक दुग्धशर्करा योग होता.ह्या अंकाचा ह्यावर्षीचा विषय आहे ' शोध सर्जनप्रेरणांचा '. ह्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे जेष्ठ कवी बा. भ. बोरकर ह्यांच्या सर्जनशीलतेचा शोध घेणारा 'अप्रकाशित बोरकर' हा साहित्य अकादमी विजेते जेष्ठ कोकणी कवी आणि अनुवादक माधव बोरकर ह्यांचा अप्रतिम लेख आणि त्यातील बोरकरांची 'नव्याने गा रे कुसुमग्रजा' ही कविता खूपच सुंदर आहे. तसेच आरती प्रभू ह्यांच्यावरील लेख ही खूप सुंदर आहे.रत्नाकर मतकरी ह्यांचा नाट्यप्रवास व लिखाणप्रवास खूप सुंदररित्या उलगडला आहे.आणि असे असंख्य लेख आणि कविता ह्यांची मेजवानी ह्या दिवाळी अंकात आहे. नावाप्रमाणेच अश्या असंख्य गोष्टी ह्या अंकाने "अधोरेखित" केल्या आहेत.
खरोखरच हे दिवाळी अंक वाचून समृद्ध झाल्यासारखे वाटते.ह्या मोबाईल आणि digitalization च्या जगात आजही ११० वर्षाची दिवाळी अंकाची असलेली परंपरा आज तितक्याच भक्कमपणे टिकून आहे आणि आज ही वाचकवर्ग त्याचा आस्वाद घेत आहे हे बघून खूप कृतार्थ झाल्यासारखे वाटते.
खूप खूप धन्यवाद सर्व दिवाळी अंकासाठी कारण ह्यावर्षीची माझी दिवाळी समृद्ध केल्याबद्दल
- सुयश गावड
No comments:
Post a Comment