बंब....
सुट्टीमध्ये आजोळी जात असू तेव्हा सकाळी अंघोळीसाठी पाणी बंबामध्ये गरम करत असत.त्यांच्याकडे तांब्याचा मोठा बंब आहे.तो बंब पाहून मला नेहमीच कुतूहल वाटे.हल्ली आंघोळीसाठी लागणार गरम पाणी आणि त्यासाठीचा गीझर बॉयलर ,हीटर हे प्रत्येकाच्या बाथरूममधलं अत्यावश्यक उपकरण असत. बस्स फक्त बटन दाबायच, नळाला पाणी असेल तर दुसऱ्या मिनिटाला गरम पाण्याची धार / शॉवर सुरु.सगळं इतकं सोप्प झालय. पण पूर्वी अंघोळीला पाणी गरम करण्यासाठी एक तर चुलीवर तपेले ठेवून पाणी गरम करत असे नाहीतर ज्यांच्याकडे बंब आहे त्यांमध्ये पाणी गरम करत असे.
हा बंब माझ्या आजीला तिच्या वडिलांनी(माझे पणजोबा) तिच्या लग्नात कन्यादानामध्ये दिला होता.त्यामुळे अर्थातच आजीचा जास्त जीव आहे ह्या बंबावर. आजी मला नेहमी सांगते की ह्या बंबाची किंमत त्यावेळेस पाचशे रुपये होती(पासष्ट वर्षापूर्वी). आजही त्यांच्या गावच्या घरी हा बंब सांभाळून ठेवला आहे आणि अजूनही पाणी गरम करण्यासाठी वापरला जातो.
हा बंब तांब्याचा असतो. तांब्याची वस्तू लगेच गरम होते ना, म्हणून हा बंब पण तांब्याचा. यात पाणीही लगेच गरम होते. तर यात मागे एका झाकणातून कोळसा, गोवऱ्या किंवा जे काही जळण असेल ते घालतात. बंबाच्या आतमध्ये दोन भाग असतात. वरच्या भागात थंड पाणी ओततात. ते नळ्यांमधून येतं. ह्या नळ्या कोळशामुळे मस्त तापलेल्या असतात. त्यातून पाणी गेल्यावर ते लगेच गरम होतं. एकावेळी बरंच पाणी ह्या छोट्या छोट्या नळ्यांमधून आल्याने एकदम बरंच तापलेलं पाणी आपल्याला पटकन मिळतं. यातून बरीच वाफ तयार होते ती चिमणीमधून बाहेर येते.एक अलिखित नियम मात्र सर्वांसाठी असायचा तो म्हणजे एकदा आपल गरम पाणी काढून झाल कि बंबाच्या भांड्याला वरती एक झाकण असे त्यांतून पुन्हा थंड पाणी ओतून झाकण बंद करायच त्यामुळे बंब भरलेला राही आणि नंतर आंघोळ करणाऱ्यास गरम पाणी कमी पडत नसे. सकाळी सणसणीत तापलेल्या बंबात अगदी दुपारपर्यंत पाणी गरम रहात असे.
आम्ही भावंड मग वाडीत पडलेली सुकी पान, सुकलेल्या बारीक फांद्या, नारळाच्या शेंड्या, करवंटया अस जे जे कांही सुकलेल असेल ते आणून बंबाच्या वरच्या नळीतून आंत टाकायचो. तळाशी असलेल्या जळत्या निखाऱ्यावर हे सगळ पडलं की त्या उभ्या नळकांड्यात ते धडधडून पेटे. बंबाची रचनाच तशी केलेली असे. वायुवीजन व्यवस्थित होत असे आणि बघतां बघतां बंबाच ते उंच नळकांड आधी धूर नंतर आग ओकू लागे. सणसणीत तापलेल्या त्या तांब्याच्या नळकांड्याच्या भोवतालचं पाणी कडकडून तापलं की बादलीमध्ये बंबाचा नळ सोडायचा....... वाफाळेलेले पाणी बादलीत घेवून मग हव तितक थंड पाणी घेऊन बादलीत ओतायचं आणि मस्त आंघोळ करायची. ह्या बंबाच्या पाण्याला वाफाळलेला वास येतो हा वास खूप आवडतो मला. कधी कधी तर ह्या बंबाच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकत असू त्याने पाण्याला आणखीनच मस्त वास येत असे.
हा बंब साफ करणे हे जरा वैतागवाणे काम असते असे मला वाटते कारण बंबातील आग थंड झाल्यावर त्यातील राख बाहेर काढून तो स्वच्छ करावा लागतो. तो तांब्याचा बंब असल्याने लवकर काळा पडत असे म्हणून त्यावेळी तो चिंचेचा कोळ किंवा राखाडीने(चुलीतील राख)साफ करून त्याला चमकवावा लागत असे.पण आत्ता पितांबरीने हे काम अधिक सोपे केले आहे.धुवून स्वच्छ केलेला लख्ख बंब बघायला आणखीनच मज्जा येत असे.
काळाच्या ओघामध्ये बंब कुठे तरी लोप पावत चालला आहे.मी आमच्या आजीला सांगितले आहे हा बंब मला दे तुझी आठवण म्हणून.मी कायम जपीन त्याला जीवापाड.असा हा बंब माझ्या कायम आठवणीत राहिलेला.
- सुयश गावड
No comments:
Post a Comment