Wednesday, July 8, 2020

बर्फाचा गोळा


बर्फाचा गोळा...

बर्फाचा गोळा ...नाव काढताक्षणीच त्याचा थंडावा मनाला तर त्याचे विविध इंद्रधनू रंग डोळ्यांना सुखावून जातात.मला लहानपणापासूनच बर्फाचा गोळा खूप आवडायचा.शाळेत असताना शाळा सुटल्यावर शाळेच्या बाहेर खायचो तर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर खायचो.कॉलेजला असताना शिवाजी पार्कच्या परिसरात खायचो हा गोळा...माझ्यासाठी ठिकाण महत्त्वाचे नाही तर मिळणारा हा गोळा महत्त्वाचा आहे.

तो गोळेवाला बर्फाचा तुकडा त्या लाकडी फळीला ब्लेड लावलेले असयाचे त्यावर बर्फाचा किस करून मग एका ग्लासमध्ये तो बर्फाचा किस गच्च दाबून त्यात एक छोटी लाकडी काठी टाकून तो गोळा बनवत असे मग आपल्याला कोणता रंग हवा तो ते विचारून त्यावर लिंबू रस व काळ मीठ लावून आपल्याला देत असे.आम्ही शाळेत असू तेव्हा हा गोळा १ रुपयाला मिळत असे.शाळेत असताना गोळा आईपासून लपवून खायचो.कारण तिला आम्ही गोळा खाल्लेले नाही आवडायचे.तिचे म्हणणे असे होते की कुठल्या आणि कोणत्या पाण्यापासून तो बर्फ बनत असेल आणि बर्फ खाल्याने सर्दी  खोकलाहोईल,ताप येईल,घसा खराब होईल असे बरेच काही ती सांगत असे.सुर सुर असा आवाज करत तो बर्फाचा गोळा चोखायचो आणि त्याची मनमुराद चव घ्यायची.मग त्या रंगाने तोंड आणि हात दोन्ही रंगून जायचे.कधी कधी तर तो रंग शाळेच्या गणवेश असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र  शर्टावर पडत असे आणि घरी गेल्यावर आई पटकन ओळखत असे की स्वारी आज बर्फाचा गोळा खाऊन आली आहे.मग तिची बडबड चालू असे की किती वेळा सांगितले तो बर्फाचा गोळा खाऊ नकोस तो कसा आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि बरेच काही.पण तिच्या त्या बोलण्याकडे लक्ष असायाचे कुठे.मी तर रममाण झालेलो असायचो ते आज गोळा खाताना किती मज्जा आली ह्याकडे.

तसे तर गोळ्याचे बरेच प्रकार आहेत जसे की बर्फाचा लकडी गोळा,बर्फाचा चमच गोळा, दुधाचा गोळा ,मलई गोळा इत्यादी.मला बर्फाचा लकडी गोळा जास्त आवडतो कारण त्या काठीवरील तो बर्फाचा गोळा पडू नये म्हणून केली जाणारी कसरत, ते विविध रंगाने रंगणारे हात व तोंड. आमच्या लहानपणी काही मोजकेच रंग आणि चवीमध्ये उपलब्ध असणारे हे गोळे आत्ता इंद्रधनूच्या रंगाप्रमाणे आणि विविध चवीमध्ये उपलब्ध झाले आहेत.आमच्या लहानपणी ओरेंज,काला खट्टा,कच्ची कैरी ह्या चवीच्या गोळ्यांना जास्त मागणी होती.

उन्हाळी सुट्टीत गावी जायचो तेव्हा दुपारी दोनच्या सुमारास सायकल घेऊन एक गोळेवाला भैया यायचा.ह्या गोळेवाल्याकडे दुधापासून बनवलेले गोळे मिळायचे.आम्ही सर्व भावंडे रोज गोळा खायचो.त्याच्या सायकलला एक छोटी घंटा होती ती वाजवत तो यायचा.रोज त्या घंटेची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. आणि तो गोळेवाला भैया आला की त्याच्या सायकलसकट त्याला घेराव घालून कल्ला करत असू.आमच्या काकीला एक सवय होती घर खर्चातील उरलेले पैसे ती भांडांच्या मांडणीतील एकदम वरती असलेल्या स्टीलच्या तांब्यामध्ये ठेवत असे.त्यातील पैसे घेऊन (चोरून) आम्ही गोळ खात असू.आम्ही त्यातील पैसे घेऊन गोळा खातो हे तिला नक्कीच माहीत होते कारण ती त्यात सुट्टे पैसे जास्त ठेवत असे जेणेकरून आम्हाला गोळा खाता यावा त्यावेळेस त्या भैयाकडे गोळा १,२ आणि ५ रुपयाला मिळत असे.पण आम्ही १रुपयाचा गोळा रोज खात होतो.समजा मुंबईहून आईपपा आले किंवा कोणी काका आले आणि आम्हाला तगडे प्रायोजकत्व मिळाले तर त्या दिवशी ५ रुपयाचा गोळा मिळायचा. ज्या गोळ्यामध्ये बदाम व बेदाणे असत.मग तर आमच्या आनंदाला उधाण आलेले असायचे.

माझा मोठा काका उत्तम क्रिकेट खेळत असे.त्याचे क्रिकेटचे सामने बघायला आम्ही पालघर आणि आजूबाजूच्या गावामध्ये जात असू.त्याचे पालघरला सामने असले की आम्हाला विशेष आनंद व्ह्यायचा कारण तिथे मिळणारा गोळा. आर्यन शाळेच्या मैदानावर त्याचे सामने असायचे आणि त्या मैदानाबाहेर गोळेवाला. त्या गोळेवाल्याचे वैशिष्ट्यं म्हणजे तो प्रत्येक गोळा मधामध्ये घोळवून दयायचा.त्यामुळे त्या गोळ्याची चव अप्रतिम लागायची.ती चव एवढ्या वर्षानंतर आजही जिभेवर रेंगाळते.

पुढे कॉलेजला गेल्यावर येता-जाताना मध्ये शिवाजी पार्क लागायचे आणि तिथे तर वर्ष्याच्या बाराही महिने गोळेवाला असतो मग कधीतरी पॉकेटमनीमधून साचलेल्या पैशातून जमेल तसे आणि जमेल तसा गोळा खायचो. मी कॉलेजला होतो तेव्हा गोळा १० रुपयाला मिळायचा.आत्ता मी मोठा होऊन ऑफिसला जातो तेव्हापण गोळेवाला दिसला आणि मला वेळ असेल तर मी आवर्जून गोळा खातो.रीतसर गोळा खातो मी अजूनही म्हणजे शर्टच्या बाह्या दुमडून वरती करून,आपल्याला कोण बघत आहे कोणी नाही ह्याची पर्वा न करता.माझे ऑफिसचे मित्र मला म्हणतात ना वय विसरून अगदी लहान मुलासारखा गोळा खातोस तेही सुरसुर असा आवाज काढत. आजही मी गोळ्याचा तितकाच आस्वाद घेतो जेवढा लहानपणी असताना घायचो तसा.गोळा खायला वय नाही लागत तर आपल्यातील लहान मूल जपता आले पाहिजे.त्याचा मनमुराद आस्वाद घेता आला पाहिजे.

आत्ता कधीतरी गिरगाव किंवा जुहू चौपाटीला जातो तेव्हा तेथील अनेक गोळ्याची दुकाने पाहतो.त्यांच्याकडे तर विविध रंग आणि चवीचे गोळे आत्ता उपलब्ध आहेत.त्या विविध रंगाच्या बाटल्या पाहून बालपणीचा रम्य काळ आठवतो.आत्ता तर गोळा ४० रुपयाला मिळतो आणि मग आठवतो तो शाळा सुटल्यावर १ रुपयात खालेला गोळा आणि मन भूतकाळामध्ये रममाण होते.ह्या गोळ्याने त्याच्या इंद्रधनू रंगासारखे माझे बालपण रंगून टाकले होते.

हा गोळा मला खूप आवडायचा,आवडतो आणि आवडत राहील हेच सत्य आहे.आणि हे सत्य कधीही बदलणार नाही ह्याची जबाबदारी माझी असेल.

- सुयश गावड


5 comments:

  1. खूपच सुंदर

    ReplyDelete
  2. भारीच की चला lockdown नंतर गोळा पार्टी नाकी मग☺️

    ReplyDelete
  3. Superb.... malahi shivaji park la gola khallyachi aathvan zali

    ReplyDelete
  4. छान, बर्फाचा गोळा हा माझाही विक पाँईंट मलाही तो फार आवडतो त्यातही गोळा खाताना गोड चवीचा रंग संपल्यावर उरलेल्या बर्फावर पून्हा रंग टाकून मिळण्यासाठी त्या गोळेवाल्या बरोबर चालणे आजही आठवते आणि त्यावर टाकला जाणारा साखरेचा पाक अप्रतिमच

    ReplyDelete