शिवाजी पार्क
शिवाजी पार्क आणि माझे नाते अगदी माझ्या लहानपणापासूनचे म्हणजे साधारण १९९० सालापासून. जेव्हा मी शाळेत जायला लागलो अगदी तेव्हापासून कारण माझी शाळा शिवाजी पार्कच्या अगदी हाकेच्या अंतरावर.मी बालमोहन विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी असल्याने आम्हा सर्व बालमोहनकराना शिवाजी पार्क म्हणजे हक्काचे ठिकाण.अगदी माहेर असल्यासारखे आमच्या शाळेला स्वतःचे असे खेळण्यासाठी क्रीडांगण नव्हते त्यामुळे शारिरीक शिक्षणाच्या तासाला शिवाजी पार्कवरच खेळायला नेत असत . बहुदा हेच कारण असावे आम्हा बालमोहनकरांचे आणि शिवाजी पार्कचे नाते घट्ट होण्यामागे. आमच्या शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव व आमच्या सर्वांचा आवडता बालदिनसुद्धा आम्ही शिवाजी पार्कवरच साजरा करत असू आणि अजूनही तीच प्रथा चालू आहे.दर शनिवारी आम्हाला सामूहीक कवायतीसाठी शिवाजी पार्कवरच नेले जायचे.शनिवारची सकाळची शाळा आटपून आम्ही कित्येकदा शिवाजी पार्कवर क्रिकेटची मँच खेळायला गेल्याचे आठवते.आयुष्यातील ते सोनेरी दिवस होते ते.
शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर (पश्चिम) या भागामध्ये आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. शिवाजी पार्क इ.स. १९२५मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर एका बाजूला (शिवाजी महाराजांचा) पुतळा इ.स. १९६६मध्ये उभारण्यात आला.आणि तेंव्हापासून शिवाजी पार्क असे नामांतर झाले. हा शिवाजी महारांजाचा अश्वारूढ पुतळा फारच देखणा व रुबाबदार आहे .
शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.आबाल-वृद्धांना सर्वाना सामावून घेणारे असे हे शिवाजी पार्क.नियमितपणे शिवाजी पार्कला चालायला, धावायला,व्यायाम करायला, योगा करायला, क्रिकेट खेळायला येणारांची संख्या खूप आहे.
शिवाजी पार्कमध्ये एक गणपतीचे मंदिर आहे जे उद्यान गणेश मंदिर म्हणून ओळखले जाते.माझे फार आवडते मंदिर आहे कारण शनिवारी आई शाळेत घ्यायला यायची तेव्हा आवर्जून घेऊन जायची ह्या मंदिरात.तेव्हापासून ह्या मंदिरात जाण्याची आवड निर्माण झाली आहे ती आजतागायत कायम आहे.ते शिवाजी पार्कमधील लहान मुलांचे उद्यान जेथे आम्ही लहानपणी खेळत असू ते आजही आठवते.शिवाजी पार्कमधील नवरात्री उत्सवातील बंगाल्याची देवी फारच सुप्रसिद्ध आहे. शिवाजी पार्कमधील समर्थ व्यायाम मंदिराची ख्याती तर सर्वश्रुत आहे.मल्लखांब, जिम्नॅस्टिकस,कब्बडी, खोखो हया खेळासाठी हे समर्थ व्यायाम मंदिर खूपच प्रसिद्ध आहे आणि ह्या समर्थ व्यायाम मंदिराने अनेक खेळाडू ह्याच शिवाजी पार्कवर घडवले.
क्रिकेट आणि शिवाजी पार्क हे समीकरण तर जगजाहीर आहे. शिवाजी पार्क म्हणजे मुंबईतील लॉर्ड्स आहे.जणू क्रिकेटची पंढरी. आणि ह्या क्रिकेटच्या पंढरीने सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटचा देव तयार केला किंवा घडवला असे आपण ठामपणे सांगू शकतो. सचिन तेंडुलकर , विनोद कांबळी, सुनील गावसकर संदीप पाटील ,अजित आगरकर,दिलीप वेंगसरकर ,अजित वाडेकर असे अनेक दिग्गज खेळाडू घडले ह्या शिवाजी पार्कवर.
ह्या शिवाजी पार्कवर अनेक राजकीय आणि बिगर राजकीय सभा झाल्या आणि अनेक लोकांनी त्या सभा गाजवल्यासुद्धा.ह्याच शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी आपल्या पक्षाचा पहिला दसरा मेळावा आयोजित केला होता जो आजही चालू आहे.ह्याच शिवाजी पार्कने बाळासाहेबांचे पहिले भाषण ते त्यांचा इहलोकीचा प्रवास अनुभवला.बाळासाहेब ह्या शिवाजी पार्कचा उल्लेख शिवतीर्थ असा करत.अनेक राजकीय कार्यक्रम, सभा, निवडणुकीच्या आधीचे मेळावे,प्रचारसभा सर्व काही ह्या शिवाजी पार्कने अनुभवले.ह्या शिवाजी पार्कने अनेक राजकीय व बड्या दिग्गज नेत्यांची भाषणे ऐकली.काही वर्षांपूर्वी शिवाजी पार्क सायलेंट झोन म्हणून घोषित झाले आणि ही सर्व रेलचेल थांबली.
शिवाजी पार्कचा कट्टा म्हणजे आमच्यासाठी स्वर्गसुख.शाळेत असताना व आत्ता शाळा सोडून एवढ्या वर्षानंतरसुद्धा अनेकदा आम्ही शालेय मित्र ह्याच शिवाजी पार्कच्या कट्टयावर गप्पा मारायला भेटत असू.आणि भेटण्याचे ठिकाण ही एकदी ठरलेले मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याजवळ. शिवाजी पार्क आणि तिथे मिळणारा बर्फाचा गोळा हे माझ्यासाठी अतूट नाते असल्यासारखे.आजही कधी मी शिवाजी पार्कला गेलो की आवर्जून बर्फाचा गोळा खातो.आणि ह्याच शिवाजी पार्कवर मिळणारी भजीची चव म्हणजे एक नंबर.ह्याच शिवाजी पार्कवर मी अनेक संगीत मैफली ऐकल्या आहेत..अगदी दिवाळी पहाट ह्यासारखे कार्यक्रमसुद्धा एवढेच कशाला जाणता राजाचा प्रयोग प्रथम मी ह्याच शिवाजी पार्कवर अनुभवला ते ही अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमवेत.माझ्या आयुष्यातील पहिले साहित्य संमेलन मी ह्याच शिवाजी पार्कवर अनुभवले.नो युअर आर्मी हे भारतीय सैन्यदलाचे अफलातून प्रदर्शनं व त्यांच्या चित्तथरारक कसरती ह्याच शिवाजी पार्कवर बघितले.दरवर्षी होणारी २६ जानेवारी व १ मेची परेड ह्याच शिवाजी पार्कवर बघितली.
कित्येकदा कॉलेजला बुट्टी मारून आम्ही शिवाजी पार्कच्या कट्टयावर तासनतास सर्व मित्र गप्पा मारत असू ,कधी तरी जर्नल किंवा असायमेंटसुद्धा पूर्ण केले ह्याच शिवाजी पार्कच्या कट्टयावर बसून.मित्रांसोबत आपल्या भवितव्याविषयीच्या चर्चासुध्दा ह्याच कट्टयावर बसून केल्याचे आठवते.
आज जरी काळानुरूप शिवाजी पार्कचे रुपडे बदललेले असले तरी त्याविषयी वाटणारी भावना तसूभरही कमी झाली नाही ती आजही तशीच आहे आणि पुढेसुद्धा मनामध्ये तशीच कायम राहणार ह्यात काही तिळमात्र शंका नाही.मी तर असे म्हणेन की मला घडवण्यात कुठेतरी छोटा का होईना पण शिवाजी पार्कचा हातभार आहे हे नक्की!
- सुयश गावड
No comments:
Post a Comment