साधारण १९९८-१९९९ सालातील ही मालिका असेल तेव्हाचे अल्फा मराठी(आत्ताचे झी मराठी) त्यावर ही मालिका दाखवली जायची.आठवड्यातून एकदाच असायची ही मालिका. बुधवारी रात्री ९ वाजता.मी असेन तेव्हा शाळेत आठवी - नववीमध्ये. त्यावेळेस माझी सर्वात आवडती मालिका होती.
जुने जाणते कलाकार त्याबरोबरच नविन तरुण कलाकार ह्यांचा अभिनय उत्तम होता म्हणजे मालिकेतील अण्णा-आकापासून ते कलिकापर्यंत सर्वांचा अभिनय उत्तम होता.तरीही ह्या मालिकेचे मला विशेष अप्रूप वाटे ते त्याच्या वर्सोवाजवळील "आश्रय" बंगल्यामुळे, बंगल्यातील आतील बाग,बंगल्याच्यामागील फेसाळणारा समुद्र व तिथून दिसणारा सूर्यास्त,झोपाळा सर्वच अप्रतिम होते.
त्यावेळेस ही मालिका मज्जा म्हणून पाहणारा मी त्यादिवशी मोबाईलमध्ये युट्यूबवर काहीतरी शोधताना ह्या मालिकेचे ७८ भाग मिळाले आणि मी ते गेल्या ३-४ दिवसामध्ये बघितले.तेव्हा वय व विषयाची जाण कमी असल्यामुळे की काय मला त्या मालिकेचा विषय नीटसा समजू शकला नसावा.
एकत्र कुटुंब,जुना बंगला, कुटुंबामध्ये असणारा ओलावा,एकत्र कुटुंब पद्धतीमधील मज्जामस्ती कुटुंबातील छोटे छोटे वाद,आजी-आजोबांचे प्रेम, भांवंडांमधील मस्ती हे सर्वच खूप मनाला हेलावून टाकणारे होते.आजकालच्या दुनियेमध्ये एकत्र कुटुंब सहजा सहजी दिसत नाही म्हणूनच ह्या मालिकेचे विशेष कौतुक वाटते.
मालिका बघताना अचानक डोळे पाणाव्याचे तर कधी खूप हसू यायचे.हसू आणि आसू यांचे योग्य मिश्रण असणारी ही प्रपंच मालिका खूप काही शिकवून गेली.मालिकेचे उत्तम दिगदर्शन प्रतिमा कुलकर्णी ह्यांनी केले होते आणि मालिकेचे शिर्षकगीत सौमित्र ह्यानी लिहिले होते पण त्यामागील गायक रवींद्र साठे ह्यांचा आवाज मनात घर करून जातो(माय बाप माय बाप....माणूस म्हणून जगणे थोडे जगून पहा).मालिकेचा शेवटचा भाग माझ्या अजून लक्ष्यात आहे.एका प्रेक्षकाने दिलेली मोठी दीपमाळ त्या शेवटच्या भागात प्रज्वलित करून आश्रय बंगलाला आणि मालिकेला मानवंदना दिली होती.एकंदरीत काय तर आटोपशीर मालिका आणि उत्तम सवांद ह्यामुळे ही मालिका कायमची लक्ष्यात राहीली
अशी दर्जेदार आणि आपल्यासारख्या प्रेक्षकवर्गाला अंतर्मुख करणारी मालिका खूप काही शिकवून जाते.
प्रपंच मालिकेच्या सर्व टीमचे मनापासून आभार....खूप सुंदर आठवणी दिल्याबद्दल....
- सुयश गावड
प्रपंच शीर्षक गीत
मायबाप.. मायबाप..
माणूस होऊन जगणे थोडे जगून पहा
देवपणा तू सोडून खाली उतर जरा
मायबाप.. मायबाप..
तू नसल्याचा भास पसरला चहुकडे
दगडमातीच्या भिंतींमधुनी विहर जरा
मायबाप.. मायबाप..
सुखदु:खाचे झाले आता गाव जुने
त्या हसण्या-रडण्यामाधुनी तू बहर जरा
मायबाप.. मायबाप..
या जगण्यातून काढून घे हे जहर जरा
उलट जरासा दु:खाचा हा प्रहर जरा
मायबाप.. मायबाप..
रडता रडता या ओठांवर कधितरी
हसण्याचाही कर जरासा कहर जरा
मायबाप.. मायबाप..
अंगण होईल देव्हार्यासम पावन हे
वेलिवरल्या पानाफुलातून डवर जरा
मायबाप.. मायबाप..
गीतकार- सौमित्र
संगीतकार- राहुल रानडे
गायक- रवींद्र साठे
No comments:
Post a Comment