Sunday, July 5, 2020

समुद्र




समुद्र

समुद्र...हे नाव ऐकले की मनातच आनंदाची भरती येते.आणि त्याच्या लाटा पायांना गुदगुदल्या करू लागतात.माझे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील वडराई.नावावरूनच कळले असेल की येथे वडाची गर्द राई आहे.नारळी पोफळीच्या बागेतून वळणदार रस्त्याने आमचे गाव येते.समुद्रकिनारी वसलेले सुंदर गाव.पालघर स्थानकापासून केवळ ११ किमी.मला आमचे गाव आवडते त्याच्या निसर्गयरम्य सौंदर्यामुळे.परंतु मला गावचे विशेष आकर्षण त्याला लाभलेल्या सुंदर आणि स्वच्छ समुद्राचे.

लहानपणी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो तेव्हा रोज संध्याकाळी समुद्रावर खेळायला जायचो.क्रिकेट,लगोरी,घड्याळ असे विविध खेळ खेळायचो.तिथेच समुद्रकिनारी बसून लाडू,किल्ले,डोंगर बनवायचो वाळूने.तर कधी ओहोटी असली की समुद्रातील खडकांवर बसून सूर्यास्त पाहायचो.आमच्या गावाच्या समुद्रात एक हत्तीच्या आकाराचा काळा मोठा खडक आहे.सर्व त्याला हत्ती दगड म्हणतात.त्या हत्ती दगडावर बसून सूर्यास्त बघणे म्हणजे नेत्रदीपक सुख.ह्याच दगडावर बसून पालघरच्या पूर्व दिशेकडील डोंगर दिसत.ह्याच समुद्रकिनारी आम्ही शंख शिंपले वेचत असू.शंख शिंपले वेचणे हा तर माझा आवडता छंद.समुद्रकिनारी ओल्या वाळूत आपल्या पायांचे ठसे बघायला मज्जा यायची.आपली नावे त्या मातीत कोरायला खूप आवडायचे. फेसाळणाऱ्या लाटांशी पकडापकडीचा खेळ खेळणे म्हणजे तारेवरची कसरत. 


समुद्र भव्य तरीही शांत आणि प्रेमळ.नदी,नाले,ओहळ खूप असतात परंतु ह्या सर्वाना मिठीत सामावून घेणारा समुद्र हा एकच असतो.त्याची निरव शांतता मनाला विचार करायला भाग पाडते. त्याच्या शांततेमध्ये आपल्याला पडलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे सापडू शकतात.त्याच्या शांततेमध्ये आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते.त्याच्या लहरण्यारा लाटा आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात.समुद्र...आपण ज्या गोष्टी देऊ ते तो आपल्यामध्ये सामावून घेतो. ह्या समुद्रासारखे आपल्याला होता आले पाहिजे सर्वांना सामावून घेता आले पाहिजे.

लहानपण माझे समुद्रकिनारी गेले असल्याने मला इतर ठिकाणच्या समुद्राचे तेवढे विशेष अप्रूप नाही.काही वर्षांपूर्वी ऑफिस मित्रांसोबत गोवाला गेलो होतो पण तेथील समुद्राने तितकेसे आकर्षित नाही झालो मी.आई आणि पपा काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले आणि त्यानी त्यांचे उर्वरित आयुष्य गावी व्यतीत करायचे असे आम्हाला सांगितले व त्यांनी ह्याच आमच्या गावच्या समुद्रकिनारी घर बांधले.समुद्राच्या भरतीचे पाणी आत्ता आमच्या कुंपणाला लागते. जे कोणी घरी येते त्यांना घर व घरामागील अथांग समुद्र फार आवडतो. मला लोक म्हणतात तू फार भाग्यवान आहेस की तुझे समुद्रकिनारी घर आहे.

ह्या लोकडावूनमध्ये मी गावीच असल्याने रोज संध्याकाळी समुद्रावर फिरायला जायचो.तेव्हा ह्या समुद्राची परत नव्याने ओळख झाली.किनाऱ्यावर वाळूत बसून अस्ताला जाणार सूर्य पाहणे.त्याने पसरविले विविध रंगाच्या छटा आसमंतात बघणे म्हणजे एक दिव्य अनुभूती.

समुद्रकिनारी सूर्य अस्ताला जाताना त्या सांजवेळी कोणाच्या तरी आठवणीने मन कातरले जायचे.आजही रोज समुद्रावर फिरायला जाताना संपूर्ण बालपणीचा काळ डोळ्यासमोरून तरुलून जातो.आणि पुन्हा एकदा मनात विचार येतो की ह्याच तो समुद्र का जिथे आपण खेळायचो?ओळखतो का हा आपल्याला?आणि पुन्हा मन आठवणींच्या डोहात सूर मारतो.


-सुयश गावड

7 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. 1 number saheb. I was not aware about this hidden talent of yours. Gr8. Keep it up.

    ReplyDelete
  3. छान लेख छान सुरुवात.

    ReplyDelete
  4. मस्त आपला समुद्र खरच खूप छान आहे. मन प्रसन्न करणारा.

    ReplyDelete