दिल दोस्ती दुनियादारी
एक तरुण मालिका झी मराठीने प्रेक्षकांसमोर आणली होती. ती मालिका म्हणजे- ‘दिल दोस्ती दुनियादारी’! खास तरुणांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या या मालिकेने तरुणांची मने तर जिंकलीच सोबतच इतर वयोगटातील प्रेक्षकांना देखील आपलेसे केले होते.
मुंबई ....स्वप्नाची नगरी.इथे अनेक तरुण-तरुणी आपली स्वप्न घेऊन येतात स्वतःचे घरदार सोडून.स्वप्नाचा पाठलाग करणारे हे बॅचलर मग हक्काचे घर शोधू लागतात परंतु बॅचलरना घर सहजासहजी कोणी देत नाही.मग त्यांनाच एकत्र येऊन स्वतःचे कुटुंब,स्वतःचे माजघर तयार करावे लागते आणि मालिकेची सुरवात ह्याच टप्यावर होते.आणि मग आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अँँना एकत्र येऊन माजघर(माझं घर) तयार करतात.आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अँँना ही मालिकेतील सर्वच पात्रे प्रत्येकाच्या ओळखीची झाली होती, जणू कुटुंबातील सदस्यचं झाली होती म्हणा ना! करियरची स्वप्ने मनात घेऊन घरापासून दूर येत स्वतंत्रपणे राहणाऱ्या या मित्रांची कहाणी प्रत्येक प्रेक्षकाला भावली.घरच्या घरपणाला व कुटुंब प्रेमाला मुकलेलं हे सर्वजण आपले एक कुटुंब निर्माण करतात.आणि आनंदाने राहतात.
त्यांचे खोडकर किस्से, लहान सहान प्रसंगातून निर्माण होणारे हास्याचे फवारे आणि कधी कधी अंतर्मुख करायला लावणारे विचार या सर्वांची एक अविस्मरणीय मेजवानी या मालिकेने दिली होती. ही मालिका अशीच अविरत सुरु राहावी असे चाहत्यांना वाटत असताना लिमिटेड एपिसोडसमुळे(२९८) अचानक मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अल्पावधीतच ही मालिका तरुणाच्या गळ्यातील ताईत झाली.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून, वेगवेगळी स्वप्ने घेऊन मुंबईत पोचलेले हे सहा जण आणि त्यांच्या सहजीवनातून निर्माण होणारे प्रसंग असे या मालिकेचे स्वरूप होते.आपल्या प्रश्नांवर मित्रांच्या मदतीने सदैव तोडगा काढणारे हे सहा जण नेहमीच आपल्या मनाला भावले. हया सहा जणांच्या मैत्रीचा नेहमीच हेवा वाटला.दिग्दर्शकाने मालिकेचा केलेला शेवट अगदी समर्पक वाटला. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले.मालिकेची कथा संजय जाधव व आशिष पाथरे ह्यानी उत्तम लिहिली होती.
असे रूममेट्स किंवा असे मित्र सर्वांनाच मिळाले पाहिजे असे वाटते ही मालिका बघितल्यावर.ही मालिका जेवढी आपल्याला हसवते तितकीच रडवते सुद्धा.अंतर्मुख करायला लावते ही मालिका.बॅचलर मुले व मुली एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना बघून मनाला खूप समाधान लाभले.मालिकेतून सतत उत्तम संदेश देण्याचा दिग्दर्शकचा कल दिसून आला.मालिकेतून हाताळलेले विविध विषय उत्तमच होते.
सुव्रत जोशी - सुजय साठे (स्कॉलर,एक मिनिट काका)
अमेय वाघ - कैवल्य कारखानीस (सायको,गब्बू)
पुष्कराज चिरपूटकर - आशुतोष शिवलकर (आशू,उधारी किंग)
पूजा ठोंबरे - ॲना मॅथ्यूज (ससा,इनोसंट फुल्ल)
स्वानंदी टिकेकर - मीनल शेवाळे (लेडीडॉन,अभिनेत्री)
सखी गोखले - रेश्मा पाटील-इनामदार (जगतजननी,अन्नपूर्णा)
ह्या सर्वांचा अभिनय उत्तम होताच परंतु राकेश, प्रगल्भा,किंजल, नागावकर,सॅम,निकम आजी ह्यांचा अभिनयसुद्धा उत्तम होता.
दिल दोस्ती दुनियदारी मालिकेच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आम्हा प्रेक्षकांना निखळ आनंद दिल्याबद्दल!!!
- सुयश गावड
दिल दोस्ती दुनियादारी शीर्षकगीत
दुनिया ही रंगबिरंगी आपल्या वेड्या स्वप्नांची
मैत्रीत ह्या… मैत्री ह्या..
बंधन नाही नात्यांचे
तरी बंध हे जन्मभराचे
मैत्रीत ह्या… मैत्रीत ह्या..
जगण्याची रीत ही भारी
दोस्ताना सावरणारी
जोडणारी.. जोडणारी..
दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियदारी
- अमोल पाठारे
क्षण हे सोनेरी आठवणी चंदेरी
जगणे सुंदर हे वेचुया चला
गाणे मैत्रीचे रंगीत नात्याचे
पडता मी सावरा चला
रडता मी आवरा मला
नसता तू दे होश साथिया
असता तू बेहोष साथिया
घडले ते विसरून जाऊया
स्वप्न नवी ही बिनधास पाहूया
चढू दे यारीची आगळी नशा
ढळला तोल तरी शोधूया दिशा
जीवास लाभली साथ ही तुझी
जगणे झाले जल्लोष साथिया
- आशिष पाथरे