Friday, September 4, 2020

आईचा जन्म

आईचा जन्म

रखरखत्या उन्हात
काळया रानात
चक्कर येऊन पडलेल्या आईला
बाया घरी आणतात
पोराच्या हवाली करून
निघून जातात

सरकारी दवाखान्याच्या गोळीवर
सुरू होतो तिचा उपचार

तसं नेहमीच दुखत असतं तिचं
डोकं, पाय अथवा गुडघा
प्रत्येकवेळी ती सांगतेच
असं नाही

सताड डोळं उघडं ठेऊन
पोरगं दाबतं तिचं डोकं

कूस बदलताना
ती कण्हते
शक्य तितक्या कमी आवाजात

तरी त्याला आवाज जातोच
कुठल्यातरी कोपऱ्यात
गुडघ्यात पाय घालून
तो धुसफूसत राहतो
तासनतास

हल्ली
तिनं जेवण केल्याशिवाय
तो घासाला धक्का सुद्धा लावत नाही
तिच्या गोळ्या - औषधं
याकडं लक्ष असतं त्याचं
मिनिटामिनिटाला
तो तिला समजावाय लागलाय
तो तिची काळजी कराय लागलाय

त्या सारवलेल्या भुईवर
कोपऱ्यात
एका आई शेजारी
' काळजाच्या गर्भाशयातून '
दुसऱ्या आईचा जन्म होतोय...

- नितीन जाधव 

No comments:

Post a Comment