Friday, September 4, 2020

बाईमाणूस

बाईमाणूस

आपण दोघांनी मिळून उठायचं
माझं तुझं न करता सारी काम करायची
मी स्वयंपाक करत जाईन
तू स्त्री असल्याचा "समाजआव" आणत
मधेमधे घुटमळायचं नाही ...
आपला एखादा बबडी-बबड्या असेल
त्याच अंघोळ ,धुणं, पाणी मीच करणार
तू धन्यवाद म्हणायचं नाही
वेडे! तो तुझा नाही
आपला आहे...
मी दमल्यावर तू माझे पाय दाबत जा
तू दमल्यावर मी तुझे पाय दाबत जाईन
पण तू ही दमत जा
सहनशीलता सोडून ...
लग्नानंतर तू तुझं नाव आडनाव बदलायचं नाही
तू सासरी राहायचं नाही
मी माहेरी राहणार नाही
तुझ्या आणि माझ्या आईवडिलांना घेऊन
आसरा असणाऱ्या घरी आपण राहायचं...
तू सुई हो
मी धागा होतो
तू धागा हो
मी सुई होतो
पितृसत्तेच्या साड्या फाडून
समतेची गोधडी आपण शिवू ...
तुझ्या मैत्रिणींसारखं तुझ्या मित्रांनाही
खुशाल घरी आण
आपला सोन्यासारखा संसार दाखवायला
मी चहा घेऊन तयार असेनच!
तेव्हा ते आपापसांत
मला बायकी,बायल्या
अशा बिरुदावल्या लावतील
आणि तुला पुरुषी,मर्दानी
अशा पदव्या देतील
भिऊ नकोस , घाबरू नकोस
तेव्हाच आपलं माणूसपण  सिद्ध होईल...

- नितीन जाधव
         

No comments:

Post a Comment