Friday, September 4, 2020

श्राद्ध


श्राद्ध

स्वतःसाठी शर्ट घेऊ असं
बापाने मनाशी पक्कं केलं
लेकाच्या वाढदिवसाचं मनात येताच
शर्टाच्या विचारांचं *श्राद्ध* घातलं

आई दिवस रात्र राबताना
लेकरू तापाने फनफनलं
डोळ्यावरची झापड दूर सारून
आईने झोपेचं *श्राद्ध* घातलं

फाटकी बॅग पाठीला लावून
बाबाने नव्या बॅगेचं स्वप्न पाहिलं
लेकाच्या कॉलेजच्या खर्चापुढे
बाबाने बॅगेचं *श्राद्ध* घातलं

नेहमीच्या पाठदुखीने आई त्रस्त
मन वॉशिंग मशीन मध्ये रमून गेलं
लेकाच्या हट्टाच्या मोबाईलपुढे
आईने वॉशिंग मशीनचं *श्राद्ध* घातलं

बाबांची चप्पल पुरती झिजली
बुटांनी मनात घर केलं
लेकाच्या स्पोर्ट्स शूज साठी
बाबांनी बुटांचं *श्राद्ध* घातलं

आता बाप असतो वृद्धाश्रमात
आईने केव्हांच जग सोडलं
लेकरांच्या भविष्यासाठी
जीवनाचं असं *श्राद्ध* घातलं

एके दिवशी लेक असा
पिठाचे गोळे करीत होता
यातनेच्या जीवनाच्या पिंडाचे
रुबाबात *श्राद्ध* घालीत होता

पानाच्या तुकड्यावर घास ठेवून
का-का करीत तो उभाच होता
आई बापाच्या जगण्याचं *श्राद्ध*
मृत्यू नंतर घालीत होता

कुठूनशा दोन कावळ्यांनी
हासत हासत पिंडाला शिवलं
मृत्यूनंतरही लेकराच्या आनंदासाठी
आत्मसन्मानाचं त्यांनी *श्राद्ध* घातलं

- संतोष कृष्णा राणे

No comments:

Post a Comment