नवरा वारल्यावर
अकाली नवरा वारल्यावर
काय करावं त्याच्या वस्तूंचं,
सामाना-सुमानाचं ?
ठेवणीतले कपडे, शर्ट-पॅन्ट वगैरे
गरिबाला देऊन टाकावेत
किंवा घ्यावी भांडी बोवारणीकडून
तरी उरतोच प्रश्न त्याच्या अंडरविअरचा
मोबाईल येईल वापरता
सिमकार्ड बदलून
पण काँटॅक्ट लिस्टमधले
कलीग्जचे, मित्र-मैत्रिणींचे नंबर्रस्
करावे डिलीट की असू द्यावेत
तांदळातील गारीसारखे ?
त्याने फ्रिजमध्ये ठेवलेले
बिअरचे कॅन्स रिचवावेत एकटीने
उरलेल्या कडू आयुष्यासारखे
की ओतून कराव्यात फ्लश
सतत फेसाळणार्या आठवणी
गेल्या सात-आठ वर्षांत
डबलबेडवर एकाच बाजूला
लागलेली झोपायची सवय मोडता येईल
त्याची उशी नजरेआड करून ?
वर्षानुवर्ष त्याने लिहिलेल्या डायर्यांना
त्यात नोंदवलेल्या स्वप्नांना,
इच्छांना, आकांक्षांना
रद्दीत असा कितीसा मिळेल भाव ?
तो गेल्या दिवसाच्या आदल्याच रात्री
बंद पडलेलं रिस्ट वॉच
सांभाळावं उराशी
गरज नसलेल्या सहाव्या बोटासारखं ?
त्याच्या चपला द्याव्यात फेकून
की वाट पहावी
मुलाला त्या येतील याची ?
अर्धवट वाचून झालेल्या
कादंबरीच्या कुठल्याशा पानावरून
माझ्याकडे पाहणारा त्याचा चष्मा
ठेवावा मिटून
की सतत अनुभवावी जाणीव
तो पाहत असल्याची ?
हे मंगळसूत्र ठेवावं काढून
की ढाल म्हणून बाळगावं
परपुरूषांविरोधात
ओशटलेल्या नजरांपासून बचावाकरता ?
त्याच्याऐवजी मी जर गेले असते
तर त्याने दिले असते फेकून
हे शिल्लक राहिलेले काँडम्स ?
- गीतेश गजानन शिंदे
No comments:
Post a Comment