बळ
झोकून देताच ट्रेनसमोर
झाला सावलीचाही चेंदा-मेंदा,
चढला रुळांवर
विखुरलेल्या स्वप्नांचा थर
छतावरून मारली उडी
भिनला अस्तित्वाचा वारा
करुन चिंध्या-चिंध्या
देहाचा पारा
कोंडला श्वास,
पंख्यासोबत राहिलो नुस्ताच भिरभिरत
ठरला निव्वळ भास
पिऊन किटकनाशक
पडलो पालथा
झाडले हातपाय झुरळासारखे
केली असहाय्य धडपड,
नाही थांबली पडझड
झोपेच्या गोळ्यांची बाटली
केली झोपेतच उपडी
तेव्हाही केला स्पर्श जीवनाला
खेळत मृत्युशी लंगडी
कापली शीर मनगटाची
उसळलंच नाही रक्त
उघडा झाला
मनावरील व्रण फक्त
राहिलो उभा काठाशी
तिथेही अधिकच भासला
तुझ्या आठवणींचा तळ
नाही होत माझ्यातल्या तुला
संपवण्याचं बळ
- गीतेश गजानन शिंदे
No comments:
Post a Comment