सावळबाधा
अलवार वाजवित वेणू
तो स्वप्नफुलांवर आला
अन रंग सावळा माझ्या
डोळ्यांवर सोडून गेला. .
क्षितिजावर निळसर रेघा
गोंदून जराश्या हलक्या
सांजेचे लेऊन पंख
तो कृष्ण किनारी आला. . .
मी तिथेच होते तेंव्हा
थांबले मंदिरापाशी
तो सोनखुणांचे पाऊल
वाळूवर उमटत आला. . .
भरजरी शुभ्र वस्त्रांवर
नाजूक कशिदा त्याच्या
हातात कडे सोन्याचे
मनमोहन लेऊन आला. .
बैसला जरा बाजूला
मंदिरी पायरीपाशी
डोळ्यात पाहुनी माझ्या
डोळ्यात हरवुनी गेला. . .
हातात घेऊन हात
मज म्हणे, सखे जाऊया. !
मी लाजून हसता गाली
गालांवर उमटत गेला. . .
मज झाली सावळबाधा
मी झाले ना रे राधा. . ?
तो ऋतू जीवघेणा पण,
स्पर्शात शहारून गेला. . .
ती शामनिळाई ल्याली
वेगळीच होती सांज
तो कातरवेळी ऐसा
मोरपीस फिरवून गेला. . .
मी ओढून घ्यावा म्हणून
जाताना माझ्यासाठी
कालिंदीच्या काठावर
तो शेला विसरून गेला. . .
- पूजा जगदीश भडांगे लगदिवे
No comments:
Post a Comment