भोरप्याचा ईमानी बल्लाळ
माझा फेसबुक मित्र सूरज उतेकर ह्याचे भोरप्याचा ईमानी बल्लाळ हे पुस्तक नुकतेच वाचले.छोटेखानी पुस्तक मनाला खूपच भावले. ह्या कादंबरीतील जिवा व धोंड्या ही पात्र मनाला भावली.ही कादंबरी धोंड्या ह्या पात्रावर विशेष करून आधारित आहे.ही दोन्ही पात्र काल्पनिक असली तरी लेखक सूरज उतेकर म्हणतो की भोरप्याच्या सानिध्यात अनेकवेळा ही पात्र भेटली आहेत.२०१० साली जेव्हा लेखकाने पहिल्यांदा भोरप्या पाहिला होता अगदी त्याच रात्री लेखकाची आणि धोंड्याची भेट घडली होती असे लेखक आवर्जून सांगतो.आणि ह्याच टप्प्यावर लेखक धोंड्यावर कादंबरी लिहायचे निश्चित करतो आणि त्याला जसा भावला तसा धोंड्या आपल्यासमोर अश्यापद्धतीने त्याने साकारला.
निसर्गाच्या प्रत्येक घटकांकडे बघण्याची लेखकाची दृष्टी व निसर्गतःच लाभलेले कवी मन ह्यांमुळे लेखकाच्या नजरेतून किंवा त्याच्या सहज सुंदर लेखनशैलीतून धोंड्या हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे.शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली महाराष्ट्र भूमी. ही सहयाद्री भूमी. ज्यात हे गड कोट म्हणजे आपला सन्मान आपला सर्वोच्च अभिमान. लेखक मुळातच गिर्यारोहक असल्याकारणाने त्याने खूप सुंदर वर्णन केले आहे भोरप्याचे.
पालीच्या बल्लाळेश्वरावर अपार श्रद्धा असलेली रकमाई…(धोंड्याची आई)त्याचाच स्वराजाला लाभलेला प्रसाद म्हणून आपल्या पहिल्या मुलाचं नाव बल्लाळ ठेवते आणि प्रेमानं त्याला धोंड्या म्हणू लागते. धुंडीविनायकाची आपल्यावर अपार माया असल्याचे तिला वाटे म्हणून धोंड्या म्हणू लागली. यानंतर संपूर्ण ठाकूरवाडी त्याला धोंड्या म्हणूनच हाक मारू लागते.
असा हा धोंड्या..लहानपणापासूनच खूप प्रश्न विचारणारा,निसर्गाची आसक्ती असणारा,रानावनात बिनधास्त मोकाट बागडणार,निसर्गाशी कौतुकाने सवांद साधणारा,शिवाजी महाराजांबद्दल अपार प्रेम व आदर असणारा,त्यांच्या स्वराज्यात मावळा होण्याचं स्वप्नं उराशी बांधून असलेला,जिवाचा जिवलग असणारा, स्वप्नात पण शिवाजी राजाचं दर्शन घेणारा,दरोडेखोरांशी प्राणपणाने लढणारा,भोरप्याच्या मातीत चिरशांती घेणारा,भोरप्याच्या सानिध्यात स्वतःच्या पराक्रमाने वीरगळ घडवून घेणारा
धोंड्या...असा तसा धोंड्या नाही....सह्याद्रीचा धोंड्या..भोरप्याचा धोंड्या
लेखकाने खूप सुंदर अभंग व संस्कृत श्लोक ह्या कथेमध्ये वापरले आहेत त्यामुळे कथेचे सुशोभीकरण झाले आहे असे मला वाटते.धोंड्याच्या आईने म्हणजेच रकमाने धोंड्यासाठी यशोदेवर गायलेले गाणे मनाला स्पर्शून जाते.
माझ्या यशोदेचं जीनं
जीनं कुनाला कळेना
बाळ लुचतं छातीला
तिचा पाझरितो पान्हा.
सावलीत यशोदेच्या
वाढी देवकीचा तान्हा
माझ्या यसोदेचे जिन
जिंन कुनाला कळना.
असा हा धोंड्या आपल्या मनात घर करून राहतो कायमचा. सुधागडला आपण गेलो की आपल्याला धोंड्या भेटावा असे जर मनापासून वाटत असेल तर नक्की भोरप्याचा ईमानी बल्लाळ ही कादंबरी वाचा.
सूरज मित्रा खूप धन्यवाद !!!धोंड्याची ओळख करून दिल्याबद्दल.उत्तरोत्तर अश्याच छान छान कादंबऱ्या लिहीत राहा.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
- सुयश गावड
मी हा तुझा लेख कालच FB वर वाचला होता. आता परत वाचून तितकाच आवडला. खूपच सुंदर लिहितोस आणि अचूक आणि रंजक विवेचन करतोस. लिहीत रहा सुयश मित्रा ❤️❤️❤️
ReplyDeleteभगवंत नार्वेकर