सौरभ पाटील...ह्याला मी पहिल्यांदा कवितेवर प्रेम करण्याऱ्या मधुराणी गोखले-प्रभुलकर ह्यांच्या कवितेचे पान ह्या कार्यक्रमात पाहिले व त्याच्या कविता,गझल ऐकल्या.त्याच्या कविता व गझल ऐकून मी फारच भारावून गेलो.आजकालचे नवं कवी म्हणजे ते मुक्त छंदातच लिहिणार असा समज असलेल्याला मला पार चुकीचे ठरवले ह्याने.शिक्षणाने इंजिनियर असणारा हा छंदात,वृत्तात कविता करतो हे बघून फार अप्रूप वाटले ह्याचे. गझल, रुबाई हे काव्यप्रकार तर ह्याच्या विशेष आवडीचे.काय सुंदर गझल लिहितो हा.ह्याच्या कविता व गझल माझ्या मनाला फारच भावल्या म्हणून ह्या नवं कवीला फेसबुकवर हुडकून काढले आणि मेसेज करून सांगितले की तुझ्या कविता व गझल मला खूप आवडल्या.तर ह्या पठयाचा लगेच रिप्लाय आला मग आमच्यात खूप गप्पा झाल्या.मी त्याच्याकडे त्याचा मोबाइल नंबर मागितला आणि त्याने तो लगेच दिला मला.मी त्याला म्हंटले तुझा कवितासंग्रह वैगरे आहे का?तर तो लगेच उत्तरला नाही खूप वेळ आहे त्याला,एवढ्यात कुठे?अजून कविता, गझल शिकतो आहे.हे ऐकून तर माझी खात्रीच झाली की हा down to earth categoryमधला आहे.त्याच्या कवितेस ह्या कार्यक्रमाचा एकच प्रयोग झाला आणि पुढचे नियोजित प्रयोग लोकडोउनमुळे होऊ शकले नाही परंतु ह्या कार्यक्रमाबद्दल फेसबुकवर खूप चांगल्या प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या.आणि मी त्याला सांगितले की तुझ्या पुढच्या कार्यक्रमाचा प्रयोग कधी असेल ते सांग मला मी जरूर येईन बघायला.आणि पुण्यात कधी आलो तर आपण नक्की भेटू.अत्यंत साधा,लाघवी आणि तेवढाच innocent वाटला.आणि हेच सर्व प्रतिबिंब त्याच्या कविता व गझलमध्ये आपल्याला दिसून येते असे मला आवर्जून वाटले.
मित्रा अश्याच सुंदर आणि छान छान कविता,गझल लिहीत राहा.सदैव असाच हात लिहिता ठेव.तुझ्याकडून अजून खूप कविता,गझल ऐकायच्या आहेत.
तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
- सुयश गावड
उष:काल
क्षितिजावरती उजळून आल्या रविकिरणांच्या वाती
काळोखाने धरेस दिधले उष्ण नभाच्या हाती
स्थिरावलेले चक्र पुन्हा बघ वेगे लागे धावू
निर्माणाची पवित्र गीते एकमुखाने गाऊ
उठला चाफा, जुई,मोगरा, बदलून झाल्या कुशी
निजून उठल्या सुमनदलांनी पुन्हा उघडली शिशी
घराघरातून ऐकू येती ओव्या,अभंगवाणी
गृहलक्ष्मी मग उभी राहते सरसावूनिया पाणि
चंदनल्याल्या देवघरातून प्रसन्न भासे राम
क्षणभर वाटे त्वरे फिरूनी आलो चारीधाम
चराचरातील मांगल्याने बहरून आली वाट
प्रभा असे की सरस्वतीचा वात्सल्याचा हात!
- सौरभ पाटील
आरंभ दिसे ना दिसे कशाचा अंत
आक्रोश मनाचा निजून गेला शांत
ही पहाट कसली जिला न सुटते रात
का दिवस सांगतो रोज तमाची बात
पाऊल टाकता दिसे किर्रर काळोख
प्रत्येक दिशेची झाली येथे राख
पूर्वेस निघालो तिथे द्यायला हाका
जोरात हासली गूढ खिन्नता एक
हे भयाण आहे कसा सुटू मी सांग?
मेंदुत स्फोटके लावून बसली रांग
मी स्वतः पेटवुन देइन त्यांना म्हणतो
हे म्हणतो, कण्हतो, नुसता कण्हतो म्हणतो!
थांबून जरा मग पाहत बसलो वाट
पारावर झाली नशिबासोबत भेट
ते माझ्या हाती चाळून म्हणले काळा,
" मी तुझ्या नशिबी कधीच नव्हतो बाळा!"
- सौरभ पाटील
कुणा काय सांगू? कुणासाठी भांडू?
कुणावरती लावू मी पैजा आता?
नभालाच बरसायचे नाही इथे तर,
धरा काय सांगे बहाराची कथा?
जया ओढ ज्याची तो तिकडेच जातो
तरी जीव माझा तुझ्याशीच अडे,
मला उत्तराची जरा ना अपेक्षा
तुझी कारणे ठेव तुझियाकडे!
तुझे मौन प्यालो, दिल्या दुःखी न्हालो,
अजून काय सुख ते मला सांग ना?
तुझी तू किनाऱ्यास बिलगून होतीस
मला कोठला पैल अन थांग ना!
खलाशी कधी का दर्यास भ्याला
जरी नाव तुटली न फाटली शिडे?
मला उत्तराची जरा ना अपेक्षा,
तुझी कारणे ठेव तुझियाकडे!
- सौरभ पाटील
No comments:
Post a Comment