Thursday, July 9, 2020

सायकल


सायकल

सायकल...प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय.प्रत्येकाला सायकल म्हटली की लहानपणी सुट्टीत चालवलेली व शिकलेली सायकल आठवते.आपण किती ही मोठे झालो तरी मनाच्या एका कप्प्यात आपण ती सायकल जपलेली असते.लहान असताना प्रत्येकालाच आवडणारी व हवीहवीशी वाटणारी अशी ही सायकल.तसे मी सायकल चालवायला उशिराच शिकलो ते ही अचानकपणे म्हणजे अशी ठरवून मी सायकल चालवायला शिकलो नाही असे मला सांगायचे आहे.

शाळेत सहावीत असताना गणपतीच्या सुट्टीमध्ये सायकल चालवायला शिकलो.तेव्हा मी मच्छीमार नगरमध्ये राहत होतो.माझे सर्व बालपण मच्छीमार नगरमध्येच गेले.तेव्हा माझ्याच वयाचा माझा राजू नावाचा मित्र होता.(त्याचे खरे नाव हर्षल आहे पण आम्ही सर्व राजू म्हणूनच हाक मारायचो आणि अजूनही मारतो)त्याने मला सायकल चालवायला शिकवली.मी सायकल चालवायला शिकलो त्याची कथा जरा रंजकच आहे.

त्यावेळेस आम्हा कोणाकडे स्वतःची अशी सायकल नव्हती.तेव्हा सायकल भाड्याने मिळत असे व ती भाडयाने घेतलेली सायकलच सर्व चालवीत असे.१रुपया प्रति तास असे त्या छोटया  सायकलचे भाडे असे.ज्याच्याकडून आम्ही सायकल भाडयाने घेत असू त्याचे नाव अजगर होते. रंगाने काळाकुट्ट,कुरळे केस,सतत पानाच्या तोबाराने भरलेले तोंड,फूल पॅण्ट आणि त्यावर सफेद फुल बनियन आणि ग्रीसने भरलेले काळेकुट्ट हात असे त्याचे वर्णन असयाचे.त्या गणपतीच्या सुट्टीत मी रोज राजूबरोबर सायकल भाड्याने घ्यायाला जात असे आणि मग राजू मला डबलसीट घेऊन पूर्ण कॉलनी फिरवत असे.एक दिवस त्याने सायकल माझ्या हाती दिली आणि म्हणाला आज तू सायकल चालव.मी तुला आज सायकल चालवायला शिकवतो हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि थोडी भीती पण वाटली.

त्यावेळेस रहेजा रुग्णालयाची नवीन इमारत तयार झाली होती.त्याच्यासमोरील रस्त्यावर विशेष रहदारी नसे म्हणून राजूने
त्या रस्त्यावर मला सायकल चालवायला घेऊन गेला. जसे त्यांनी सायकल चालवायला सुरवात केली आणि वरूण राजाने हजेरी लावली.खूप जोराचा पाऊस आला आणि अर्थातच छत्री नसल्याने आम्ही दोघे चिंब भिजलो. आम्हाला थांबणे शक्य नव्हते कारण सायकल फक्त एकच तास भाड्याने घेतली होती. माग मी सायकलवर बसलो.त्याने सायकलची सीट आणि हँडल पकडले आणि म्हणाला समोर लक्ष दे आणि स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळत सायकलचे पँडेल मारायला सुरुवात कर.मला तर भीती वाटली होती परंतु त्याच्या सांगण्यावरून मी सायकल चालवायला सुरवात केली.असे तो दोन फेऱ्या माझ्याबरोबर सायकलला पकडून होता व तिसऱ्या फेरीला त्याने कधी सायकल सोडली व मी तोल सांभाळून कधी सायकल चालवू लागलो माझेच मला कळले नाही.

नंतर मी बऱ्याच फेऱ्या मारल्या परंतु मध्येच सायकलला ब्रेक नसल्याने आणि ब्रेक नसताना जमिनीला पाय लावून कशी थांबवायची हे ठाऊक नसल्याने मी एका आईसमान असणाऱ्या महिलेला धडकलो.तिच्या हाताला मी धडकलो आणि मी त्या सायकलीसकट खाली पडलो.त्या महिलेच्या हातातील काचेच्या काही बांगड्या फुटल्या. तिला नक्कीच खूप लागले असणार आणि मी मनातून खूप घाबरलो होतो की ती मला ओरडणार पण झाले भलतेच त्या महिलेने मला विचारले कुठे लागले का?पावसामुळे तो डांबरी रस्ता धुवून गेल्याने माझे पायांचे दोन्ही ढोपरे खरचटले होते.रक्ताबंबाळ झाले होते.मागून राजू पण हे दृश्य बघून धावतच माझ्यापाशी आला आणि मला व सायकलला उचलले.राजू बोलला त्या महीलेला, मावशी तो आजच सायकल चालवायला शिकला आहे त्यावर ती महिला हसून म्हणाली जरा जपून चालवत जा सायकल.नीट लक्षपूर्वक चालव  आणि मी व राजूने त्या मावशींची माफी मागून सायकल परत करून घरी आलो.राजू तर खूप हसत होता माझ्यावर.पूर्ण चिंब भिजल्याने घरी आल्यावर अंघोळ करायला गेल्यावर झालेली जखम खूप जास्त असल्याचे लक्ष्यात आले पण आपण आज सायकल चालवायला शिकलो ह्या आनंदापुढे त्या जखमांचे दुःख फारच नगण्य होते.सायकल चालविताना कोणी पडले किंवा धडकले नाही असे होणारच नाही.पडत पडतच सायकल शिकली जाते असे म्हणतात.जो पडत नाही तो सायकल शिकत नाही.

पुढे मी मग अनेक वेळा सायकल भाड्याने घेऊन चालवू लागलो. सायकल चालविताना जर त्याची चैन निघाली म्हणजे ती लावताना एकप्रकारचे अग्निदिव्य करावे लागे.मग त्या ग्रीसने होणारे काळेकुट्ट हात...खूप मज्जा यायची हे सर्व करताना.

नंतर तर माझे मित्र अभिजित आणि पराग ह्यानी स्वतःची सायकल घेतली मग त्यांच्याबरोबर सायकल घेऊन पतंग आणायला बांद्रा स्टेशनजवळ जात असू तर कधी शिवाजी पार्कला.रोज संध्याकाळी तर सायकल घेऊन पूर्ण कॉलनची रपेट असे.उन्हाळाच्या सुट्टीत तर सायकल घेऊन मोरी रोडला माहीम बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या ज्वेलस ह्या दुकानामध्ये सोलो नावाची आईस कँडी खायला जात असू .रहेजा रुग्णालयाच्या समोरील माहीम-सायन पुलावर तर सायकल चालवायला खूप मज्जा यायची.खूप जोर मारून सायकल त्या पुलावर चढवायचो आणि उतरताना त्या उतारावर नुसती सायकल सोडून दयायची आपल्या शरीराचा तोल सांभाळून.आपण हवेत आहोत असे वाटायचे तेव्हा. खूप धमाल यायची हे करताना.

नंतर पुढे कॉलेजला गेल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो तेव्हा दुपारी जेवण झाल्यावर आम्ही सर्व भावंडे सायकली घेऊन नवोदय विद्यालय रोडवर करवंद खायला जात असू तर कधी गोंधळी तळयाजवळ रांजण,तर कधी कोणाच्या तरी वाडीमध्ये आंबे खायला जात असू.आणि हा सर्व प्रवास आम्ही सायकलीवर करत असू .खूप मज्जा यायची.

ही सायकल जरी मला खूप आवडतं असली तरी मी शाळेत असतानासुद्धा किंवा आता मी स्वतः कमावता झालो तेव्हाही विकत नाही घेऊ शकलो. त्यामागे असे काही विशिष्ट कारण नाही पण का विकत घेऊ शकलो नाही हे मला नाही सांगता येणार.हा पण ही सायकल आपण विकत घेऊ शकलो नाही ह्याची खंत मात्र कायम मनाला लागून राहीली.आपण आज मोठे झाल्यावर भरमसाठ पैसे मोजून भारी दुचाकी किंवा चारचाकी घेऊ शकू तरीही सायकलची सर त्याना येणार नाहीं.शेवटी सायकल ती सायकल.

- सुयश गावड

5 comments:

  1. मस्त अनुभव😊 सायकल नेहमीच पाहिले प्रेम असते

    ReplyDelete
  2. मस्त सुयश☺️☺️☺️

    ReplyDelete
  3. Good one Suyash !
    प्रत्येकाच्या आयुष्यातील सायकल जरा वेगळीच आणि प्रतेकासाठी तेवढीच स्पेशल असतेच.

    ReplyDelete