Thursday, July 23, 2020

मामाची वाडी

मामाची वाडी

झुकझुक झुकझुक आगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाच्या गावाला जाऊया

ह्या ग.दि.माडगूळकराच्या बालगीताप्रमाणे आम्हीसुद्धा उन्हाळाच्या सुट्टीत मामाच्या गावी जात असू. सुदैवाने आमचे गाव व मामाचे गाव एकच होते.त्यामुळे सुट्टीत मामाच्या गावाला जायला जास्त कष्ट होत नसे.

साधारण आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी आम्ही मामाच्या वाडीत जात असू. सकाळची नित्यकर्मे उरकून आम्ही मामाच्या वाडीत जायला सज्ज होत असे.माझ्या मामांच्या वाड्या एका सरळ रेषेत आहेत.(आधी सुहास मामाची मग नितीन मामाची व नंतर परेश मामाची)आम्ही परेश मामाच्या वाडीत म्हणजेच माणिक आजोबा व केसरी आजीच्या वाडीत जात असू. सकाळी
साधारण दहा वाजेपर्यंत आम्ही सर्व भावंडे तिथे पोहचत असू.मग त्यांच्या विहिरीपाशी एक पाण्याची टाकी होती त्या टाकीत आम्ही मनसोक्त डुंबत असू. संपूर्ण वाडीतील आमच्या सर्वांची ती आवडती जागा होती.आणि तिथेच आम्ही विविध झाडाची पाने व फुले एकत्र करून  त्याचे दगडाने ठेचून सरबत बनवत असू व ते काचेच्या बाटलीत भरून ठेवत असू.(आमचा एक बालिश खेळ म्हणू ह्याला).त्या रंगबेरंगी बाटल्या बघायला खूप मज्जा येत असे.

मामाचा बंगला खूप मोठा होता. त्याला अनेक खोल्या व अनेक दरवाजे होते. पकडा-पकडी,लपाछुपी खेळायला खूप धमाल यायची.दुपारी साधारण बारा वाजता समुद्राला भरती आल्यावर आम्ही सर्व भावंडे समुद्रात पोहायला जात असू.तिथे पोहता पोहता एकमेकांच्या अंगावर माती उडवत असू. रोज कोणाला तरी आम्ही लक्ष्य केलेले असायचे आणि त्याला मग आम्ही खूप त्रास देत असू.पोहण्यामुळे खूप सणकून भूक लागलेली असायची.मग मामीच्या हातचे लज्जतदार जेवण जेवत असू.आम्ही सर्व भावंडे त्यांच्या बंगल्याच्या गॅलरीमध्ये जेवायला बसत असू.सर्वांची जेवायला बसायची जागा ठरलेली असायची.त्यावेळी आम्ही दोघं दोघ मिळून एकाच ताटात जेवत असू जेणेकरून मामीला भांडी घासायचा त्रास कमी म्हणून.

दुपारी जेवून मग संपूर्ण वाडीची रपेट असे आवळे ,आंबे, चिकू जाम,पेरू,जांभळ खायला जात असू. ते रसभरीत जाम त्या झाडावर बसून खाण्यात एक न्यारी गंमत होती. आम्हा भावंडाना तर एवढा माज होता की आम्ही अर्धे जाम खाऊन टाकून देत असू.चिकू तर चक्क पिकण्यासाठी आम्ही जमिनीत एक खड्डा करून त्यात लपवून ठेवत असू जेणेकरून ते लवकर पिकतील (ही कला आम्हाला कशी अवगत झाली ठावूक नाही ) एवढेच कशाला कच्या फणसाला पण आम्ही खायच्या पानात जो चुना वापरतो तो लावून ठेवत असू म्हणजे तो फणस लवकर पिकेल आणि आम्ही लवकर त्याचा फडश्या पाडू शकू.

मग दुपारी मामाने आमराईमध्ये बांधून दिलेल्या जाळीच्या पाळण्यावर मज्जा करत असू.आम्ही सात आठ भावंडे एकाचवेळी त्या पाळण्यामध्ये बसत असू तो पाळणा किती भक्कम आहे ते पडताळून पाहण्यासाठी कोणीतरी एकाने झोका दयायचा.प्रत्येकाने आळीपाळीने झोका दयायचा हा नियम होता.त्यावरून आम्हा भावडांमध्ये खूप भांडणे होत असत पण ती तेवढ्यापुरता असत.झोका देणाऱ्याने झोका जलदगतीने द्यावा म्हणून केलेला आरडा-ओरड,तो गलका आजही आठवला की नकळत चेहऱ्यावर हसू येते. "फुकी फुस्स कायुस नय" हे आमचे घोषवाक्य होते.(म्हणजे आमच्या मांगेली बोलीभाषेमध्ये फुस्स हे काहीच नाही अजून जोरात झोका दे असा त्याचा अर्थ होता)

काही उन्हाळाच्या सुट्टीत आमच्या मावशींची एक विदेशी मैत्रिण "मे" आलेली असायची.स्विझेर्लंडवरून ती येत असे.तिचे नाव मे होते म्हणूनच की काय ती मे महिन्यामध्ये येत असे अशी माझी बालभावना होती त्यावेळेस. ती येताना आमच्यासाठी खूप चॉकलेट्स घेऊन यायची.पण मला तिने आणलेल्या हत्तीच्या गोळ्या(मेश मेलो) खूप आवडायचे.दुपारी तीपण आमच्यासोबत समुद्रात पोहायला येत असे.तिला हापूस आंबा खूप आवडायचा. तिला विशेषकरून चित्रांची आवड होती.कारण ती आम्हाला चित्रे काढण्यासाठी कागद व रंग दोन्ही देत असे आणि आमच्याकडून चित्रे काढून ती बहुतेक घेऊन जात होती.(माझी चित्रे म्हणजे पांढऱ्या कागदावर काही तरी रंगवलेले)आम्ही सर्व भावंडे मराठी माध्यमात शिकत असल्याने आम्हाला त्यावेळेस इंग्रजी येत नसे. मग तिच्याबरोबर सवांद साधताना साग्रसंगीत अभिनय करावा लागत असे तेव्हा कुठे जाऊन तिला समजत असे की आम्ही काय बोलत आहोत ते.

मग संध्याकाळी साधारण पाच वाजता चहापाणी करून आम्ही आमच्या घरी जायला निघत असू.बाजूचीच वाडी बाळू नानांची होती.लांबूनच त्यांचे घर दिसले की आम्ही सर्व भावंडे नाना नाना असे ओरडायला सुरवात करत असून जेणेकरून नानांना वर्दी की आमची वानरसेना आली आहे.मग नाना सर्वांना पैसे दयायचे.नाना बाकीच्यांना एक किंवा दोन रुपये देत असत पण मला व ताईला पाच रुपये देत असत कारण आम्ही मुंबईहून आलेलो असायचो म्हणून की काय देव जाणो.असो,पण नानांनी दिलेल्या पैश्याने आमच्या संध्याकाळच्या वडा-समोसा व भज्यांची सोय झालेली असायची.

हळूहळू मोठे झाल्यावर मामाच्या वाडीत जाणे थोडे कमी झाले. परंतु आजही त्या मामाच्या घरात गेले की आठवते ती आमच्या लहानपणी केलेली दंगा-मस्ती आणि मन आपोआप फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पोहचते(feeling nostalgic) आणि आता असेच म्हणावेसे वाटते, ते दिवस आता कुठे!कुठे कधी हरवले ते दिवस कसे कोण जाणे!

- सुयश गावड

1 comment:

  1. खुप छान बालपणीच्या आठवणी. अंबज्ञ नाथसंविध

    ReplyDelete