गावची जत्रा
माझे गाव पालघर जिल्हातील वडराई.आमच्या गावचे ग्रामदैवत कालिका माता आहे.तिला मोठी बाय(म्हणजे मोठी बाई किंवा मोठी आई)असे म्हणतात.तिचे जुने व नवीन अशी दोन मंदिरे आहेत बाजूबाजूला. खूप जागरूक देवस्थान म्हणून तिची पंचक्रोशीत प्रसिद्धी आहे.सर्वच जातीतील लोकांसाठी ही देवी खास आहे.ह्या देवीचा वार्षिक जत्रोत्सव चैत्र महिन्याच्या अमावस्येला दोन दिवस असतो. पहिल्या दिवशी देवीची षोडोपचार पद्धतीने पूजा करून होम प्रज्वलीत केला जातो व जत्रेला सुरुवात होते.लहानपणीपासूनच जत्रेचे विशेष आकर्षण असल्यामुळे दरवर्षी जत्रेला जाणे होतेच पण एखाद्या वर्षी जत्रेला जाणे नाही झाले तर खूप वाईट वाटायचे.नोकरीधंदयाच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेली माणसे जत्रेसाठी येतात, त्यामुळे घरोघरीही माणसांची वर्दळ असते. त्यामुळे अनेकांनी नोकरी-व्यवसायासाठी गाव सोडले तरी मोठी बायवरचा त्यांचा विश्वास मात्र कमी झालेला नाही. हे सारे गावकरी देवीच्या उत्सवाला वेळात वेळ काढून उपस्थित राहतात. मीही त्याला अपवाद नाही.ह्या जत्रेच्या काळात लहान असताना खूपजण पैसे दयायचे आम्हाला, त्यातूनच आम्ही जत्रेत खर्च करत असू. खूप मज्जा यायची.जत्रा’ हा शब्द नुसता उच्चारला ना तरी अजूनही माझं मन फुग्यासारखं होऊन जातं. हलकं हलकं पाय जमिनीवरून निसटतात आणि आभाळाच्या दिशेने धावू लागतात.फक्त ‘जत्रा’ या दोन अक्षरी शब्दात ही किमया आहे.आमच्या गावची जत्रा उन्हाळ्याच्या सुट्टीत येत असल्याने परीक्षा संपलेल्या असायच्या.
जत्रेच्या काळात नव्याने रंगरंगोटी करून नटूनथटून देवालय आपल्या भक्तजनांसाठी उभे असते. रात्रीच्या वेळी मंदिरावरील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश दूरवर पसरतो. गावातील उत्साही तरुण देवालय आणि त्याचा परिसर पताकांनी सुशोभित करतात. बघता बघता त्या आवारात दुकानांच्या राहुट्या पडतात. मानवी जीवनातील विविध अंगांचे दर्शन ही दुकानेच घडवीत असतात.जत्रेच्या माध्यमातून आपल्याला त्या गावची व त्या गावातील लोकांच्या संस्कृतीचे दर्शन घडते असे मला वाटते.
देवीच्या ओटीसाठी खण, नारळ, फूले, हळदकुंकू विकणारी दुकाने, प्रसादाचे विविध पदार्थ असणारी मिठाईवाल्यांची दुकाने ती देवालयाला चिकटून असतात. त्यांच्या शेजारी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू, बांगड्या, शोभेच्या वस्तू, तयार कपडे, झटपट फोटो काढून देणारी अशी अनेक दुकाने रांगेत बसलेली असतात. जत्रेच्या दिवसांत रात्रंदिवस ती दुकाने माणसांनी फुललेली असतात. त्यात आकड्यावर बाण मारण्याचा जुगार शिकविणारी दुकानेही असतात लाकडी रिंगा फेकून आपले नशीब आजमावणारी अनेक दुकाने असतात. तसेच फुग्यावर नेम धरणारे नेमबाज पण खूप असतात. जत्रेच्या निमित्ताने पाळणे, गोल फिरणारी चक्रे,छोटी झुक झुक गाडी येतात व अनेक हॉटेलेही उघडतात,जिथे आपल्याला उसाचा रस,अनेक प्रकारची आईसक्रीम (जत्रा फेमस चोकोबार, कुल्फी),भुजिंग(चिकन तंदुरी),खिमा पाव,कबाब,जिलेबी अश्या अनेक पदार्थावर ताव मारता येतो.
हलवाईची अनेक दुकाने जत्रेमध्ये असतात त्यांच्याकडे मिळणारी शेव बुंदी,खाजा, मक्याचा चिवडा, पेढे, बर्फी, सुतारफेणी, चणे,फुटाणे, हलवा,सोनपापडी ह्या सर्व पदार्थांची चव अप्रतिम असते.खूप सुंदर पद्धतीने ही मिठाई मांडली जाते.ह्या हलवाईच्या दुकानात खूप मोठाले आरसे लावले जातात त्यात आपल्याला स्वतःला न्याहाळाणात वेगळी गम्मत वाटते.जत्रेत मिळणारी प्लास्टिकची व कागदाची फुले मन मोहून घेतात.लहान मुलांसाठी जत्रेत विविध प्रकारच्या खेळण्याची दुकाने असतात.आमच्या लहानपणी जत्रेत पिपाणी,रंगीबेरंगी पिसांची टोपी आणि पाण्याचे फुगे मिळत असे.लहान असताना जत्रेत मी न चुकता ह्या सर्व गोष्टी आवर्जून घेत असे.
कालिका मातेची जत्रा असल्यामुळे बळी हा प्रकार आलाच. देवीच्या जुन्या मंदिराशेजारी एक माडाचे झाड आहे(अजूनही आहे)त्या माडाखाली बोकड्याचा आणि कोंबड्याचा बळी दिल्या जायचा.आमच्या लहानपणी हे बळी देण्याचे प्रमाण खूप होते आत्ता त्यामानाने हे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे.नवस केलेल्या बोकडाची वाजत गाजत मिरवणूक काढून नंतर त्याचा बळी दिला जायचा हे आम्ही लहानपणी बघितले होते परंतु आत्ता समाजप्रबोधन करून हे प्रमाण कमी झाल्याचे बघून खूप बरे वाटते.
देवीचा होम प्रज्वलीत केल्यावर भाविक त्यामध्ये नारळ व सुट्टे पैसे टाकतात.लहानपणी आम्ही जत्रा संपल्यावर ह्या होमातील ते पैसे काढण्यासाठी जात असू.पुढे जत्रा संपली तरी होम ३-४ दिवस पेटत असे.एकेवर्षी असेच पैसे काढताना ५० पैश्याचे नाणे माझ्या उजव्या हाताच्या तळभागावर चिकटले होते व मला खूप जबरदस्त चटका बसला होता.पुढे किती तरी दिवस ती जखम बरी झाली नव्हती ते चांगलेच माझ्या लक्षात आहे. ही आठवण कायम माझ्या मन पटलावर चांगलीच ठासली गेली आणि प्रत्येक वर्षी होणाऱ्या जत्रेच्या वेळेस ती परत ताजी होते आठवण.
लहान असताना दर दोन तासांनी आम्ही सर्व भावंडे जत्रेत जात असू.किती दुकाने आली आहेत,जत्रा किती भरली आहे,मंदिरात भाविकांची गर्दी आहे का,कोणते दुकान कुठे आहे,आपल्याला कोणती कोणती खेळणी घ्यायची आहेत,आपल्याला काय काय खायचे आहे हे सर्व पाहण्यासाठी.आणि रात्री आम्ही सर्व भावंडे आई-पपा ,काका-काकी बरोबर जात असू.आज आठवले तरी हसू येते.केवढे ते जत्रेचे आकर्षण होते.काळानुरूप जत्रेचे स्वरूप बदलले परंतु जत्रेची ओढ आजही मनी तितकीच आहे जेवढी लहानपणी होती.मंदिरावरील व जत्रेतील रोषणाई डोळे दिपवून टाकत असे.रात्री साधारण १० वाजता जत्रेत गेलो तर पहाटेच ३ किंवा ४ वाजताच घरी येत असू.जत्रेमध्ये सारख्या फेऱ्या मारून व फिरून पाय चांगलेच दुखत असत.
पूर्वी म्हणे आमच्या ह्या गावच्या जत्रेमध्ये गावातील मंडळी खूप छान छान नाटके करत असे.त्यानंतर काही वर्षे जत्रेमध्ये पडदावर चित्रपट दाखवले जायचे अशी आठवण माझे आई आणि पपा दोघेही सांगतात.खूप मज्जा यायची नाटके व चित्रपट बघायला असे ते सांगतात.तसेच गावकऱ्यांतर्फे जत्रेमध्ये चुलीवर मटण (बळी दिलेल्या बोकडाचे)केले जाते (अजूनही केले जाते)मग प्रत्येकाने आपल्या घरातील वाटी घेऊन जायचे मग ते प्रसाद स्वरूपात आपल्याला दिले जाते अशी आठवण माझी आई आवर्जून सांगते.नवीन लग्न झालेल्या जोडपांसाठी ही जत्रा खूप विशेष असते असे मानले जाते.
देवीच्या साक्षीनेच गावकरी जत्रेचा हा सारा रंग लुटतात व पुढच्या वर्षीही जत्रेला येण्याचा मनात संकल्प करून जत्रेतून घरी येतात.परंतु आपण घरी आलो तरी मन मात्र जत्रेमध्येच रेंगाळत असते कितीतरी वेळ.
- सुयश गावड
Kadak
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूप छान.
ReplyDeleteखूप सुंदर जत्रेचं वर्णन. मी कधीच जत्रा attend केली नाही पण सिनेमात पाहिली होती. पण मित्रा तू केलेल्या वर्णनात इतकी जादू आहे की ते सर्व चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले आणि त्याचा आनंद घेता आला. 💐💐💐💐💐
ReplyDeleteभगवंत नार्वेकर