समुद्र
मी दहावीला असताना आमच्या शाळेचे हिरक महोत्सवी वर्ष होते.त्यानिमित्ताने शाळेत एका कार्यक्रमात लेखक मिलिंद बोकील ह्यांना बोलावले होते. नुकतीच त्यांची शाळा ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यांचे भाषण ऐकून मी संपूर्ण भारावून गेलो होतो.त्यानंतर माझ्या दहावीच्या परीक्षेनंतर असलेल्या सुट्टीत त्यांची शाळा ही कादंबरी वाचली.मला खूप आवडली. अगदी त्यावेळेपासून मी त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात आहे. पुढे त्या कादंबरीवर आधारित नाटक व चित्रपट दोन्ही आले.तेसुद्धा मी बघितले.
बऱ्याच वर्षानंतर त्यांची समुद्र ही लघुकादंबरी नुकताच वाचली.अवघी ९० पानांची ही कादंबरी आहे.परंतु खूप सुंदर विषय लेखक मिलिंद बोकील ह्यानी हाताळला आहे.ह्या कादंबरीमधील नायक भास्कर व नायिका नंदिनी या समृद्ध जीवन व्यतीत करणाऱ्या आनंदी दाम्पत्याची ही कथा आहे.दोन दिवस सुट्टीसाठी म्हणून समुद्रकिनारी राहायला येतात.आणि नायिका नंदिनी आपल्या हातून झालेल्या चुकीची कबुली नायक भास्करला देते.
त्यानंतर नायक व नायिका ह्यांच्या मनातील भावांचे वर्णन लेखक मिलिंद बोकील ह्यानी खूप सुंदररीत्या केले आहे.समुद्राच्या सानिध्यात विलक्षणपणे उलगडत जाणाऱ्या त्यांच्या भावबंधाचा उत्कट प्रत्यय ह्या पुस्तकात दिसून येतो.जसे समुद्र आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये सामावून घेतो तसे नायक भास्कर आपल्या पत्नीला म्हणजे नायिका नंदिनीला आपल्यामध्ये सामावून घेतो. म्हणून लेखक मिलिंद बोकील ह्यानी ह्या पुस्तकाला दिलेले समुद्र हे शीर्षक अगदी समर्पक आहे असे मला वाटते.
लेखक मिलिंद बोकील ह्यानी ह्या कथेमध्ये खूप सूक्ष्म बारकावांचे
वर्णन केले आहे जसे की नायक व नायिका सुट्टीसाठी आलेल्या रिसॉर्टचे,त्याबाजूलील असलेल्या समुद्र, त्याचा किनारा,डोंगर इत्यादी.हे वर्णन अनुभवण्यासाठी एकदा जरुर समुद्र ही लघुकादंबरी वाचा.शॉर्ट न स्वीट ह्या उक्तीप्रमाणेच आहे ही लघुकादंबरी.जमल्यास जरूर वाचा समुद्र.
- सुयश गावड
No comments:
Post a Comment