Thursday, August 13, 2020

मनाच्या झरोक्यातून


मनाच्या झरोक्यातून...

माझा मित्र व कवी गणेश भाऊसाहेब पोटफोडे ह्यांचा मनाच्या झरोक्यातून हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. ह्या कवितासंग्रहात एकूण ५९ कविता आहेत आणि सर्वच कविता खूप भावपूर्ण व सुंदर आहेत.ह्या कवितासंग्रहावरून कवीच्या हळव्या मनाचे,माणूसकी जपणारा व निसर्गाची अनाम ओढ असणाऱ्या कवीचे दर्शन होते.मनाच्या झरोक्यातून,ओसरी वाडा,शाळेचे दप्तर,लेक आला माझ्या घरी,वाळवंटातील तुळस,वाळवंटातील श्रावण,मी खूप खूप शोधल तुम्हाला,प्रिय मित्रास,सोडला नसता गाव तर ह्या कविता माझ्या मनाला खूप भावल्या.

कवीची ओळख करून दयायची म्हणजे कवी गणेश भाऊसाहेब पोटफोडे मूळचे अहमदनगर जिल्यातील शेवगाव जवळच्या अमरापूर खेड्यातील.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम शिक्षण घेऊन कवी गणेश पोटफोडे सध्या दुबई येथे कामानिमित्त स्थित आहेत.कवीने ह्या कवितासंग्रहामध्ये सर्वच विषयांवर कविता लिहिल्या आहेत.त्यांच्या बालपणीच्या आठवणी अनेक कवितेत दिसून येतात व त्यांचे बालपण किती समृद्ध होते ते आपल्या त्यांच्या ह्या कवितांतून दिसून येते.त्यांच्या काही कवितेतून त्यांचे कवी मन मायदेशी ओढ घेत आहे ते दिसून येते.

कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये साहित्यिक डॉ.कैलास दौंड लिहितात की,ह्या कवितासंग्रहातील सर्वच कविता म्हणजे कवीचे भावचरित्र आहे.हे वाक्य कवी गणेश पोटफोडे ह्यांच्याबाबतीत तंतोतंत लागू होते.ह्या कवितासंग्रहातील सर्वच कविता वाचनीय व मनाला अनाम ओढ लावणाऱ्या आहेत असेही डॉ.कैलास दौंड म्हणतात ते अगदी आपल्या सामान्य मनाला पटण्यासारखे आहे.

शाळेचे दप्तर,चल जाऊ पोहायला ह्या कवितेतून तर अगदी हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभे राहते व कवीचे बालपण किती समृद्ध होते ह्याची प्रचिती येते.वाडा, ओसरी,मनाच्या झरोक्यातून ह्या कवितांतून तर कवीच्या अंतर्मनाच्या कप्प्याचे दर्शन होते . वाळवंटातील श्रावण,वाळवंटातील तुळस ह्या कवितेतून कवी वाळवंटातील व कवीच्या मनाला आलेला कोरडेपणा व रुक्षता दर्शवितो. आई व पैलतीरावरून ह्या कवितांतून कवी सातासमुद्रापार असणाऱ्या आपल्या आईबद्दल व आईसमान असणाऱ्या मातृभूमीबद्दल असणारी ओढ दिसून येते.कवी गणेश पोटफोडे ह्यानी निसर्गावरसुद्धा खूप छान कविता रचल्या. पहिला पाऊस,धबधबा,सूर्योदय,बगळा, धुके,चिऊताई ह्या त्यातील निवडक कविता.कोयता,फास,व्यथा शेतकऱ्याची ह्या कवितांतून कवीने शेतकरी व कष्टकरी ह्यांच्यावर पण प्रकाश टाकला आहे.मी खूप खूप शोधलं तुम्हाला ह्या कवितेत बाबांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या मुलाच्या मनाची घालमेल वर्णन केली आहे.चटके,वैशाख वणवा ह्यांसारख्या कवितेतून आपल्याला पण उन्हाची लाही अनुभवता येते.सोडला नसता गाव तर ह्या कवितेत कवी आपली बाजू मांडत आहे जर त्याने योग्यवेळी गाव नसता सोडला तर त्याची काय अवस्था असती आज.

माझ्या परम मित्रा आणि कवी मन असणाऱ्या गणेश पोटफोडे ह्यांच्या कवितेच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!अश्याच छान छान कविता लिहीत रहा आणि आम्हाला तुझ्या कवितांची मेजवानी अशीच कायम देत रहा.

जाता जाता एकच सांगीन तेही तुझ्या प्रिय मित्रास ह्या कवितेतील ओळीतून...

हे माझ्या प्रिय मित्रा
माझ्या जीवनाची मेणबत्ती
संपूर्ण वितळाण्यापूर्वी
तुझी भेट व्हावी हीच इच्छा
नाहीतर ही मेणबत्तीची ज्योत
वाऱ्याअभावीही फडफडत राहील

- सुयश गावड

शाळेचं दप्तर

माझं शाळेचं दप्तर
होतं फार मजेशीर
पांढर्‍या खताच्या गोणीला
दोन बंध लावून शिवलेलं

त्यातच कोंबलेली असत
वह्या, पुस्तकं, लाकडी पट्टी
कोरे कागद, पॅड, रंगपेटी
आणि जेवणाचा डब्बा

ओमेगाच्या कंपास पेटीला
शिवलेला होता एक खिसा
कारण कंपास पेटीत
माझा फार जीव होता

वर्षात वह्या पुस्तकं बदलायची
पण कंपासपेटी तीच असायची
कंपास पेटीला आतून चिकटवलेली होती
दरवर्षीच्या ध्वज दिनाची तिकीटं

दप्तरात होती अजुन एक
खताची मोकळी पांढरी गोणी
स्वच्छ धुतलेली आणि
दाबून घडी करून ठेवलेली

वर्गात नव्हती बाकं तेंव्हा
आम्ही गोणी अंथरूणच बसायचो
पावसाळ्यात हीच गोणी
घोंगता करून वापरायचो

स्वतःला पावसात भिजायला
फार फार आवडायचं
पण दप्तर भिजल्यावर
फार वाईट वाटायचं

दप्तर जरी मळकटलेलं होतं
पण मला ते प्रिय होतं
कितीतरी वस्तूंनी भरलेल आसलं
तरी त्याचं कधी ओझं नाही वाटलं

एक दिवस शाळा संपली
ते कुठेतरी अडगळीत पडलं
पण मला अजूनही आठवतं
माझं 'शाळेचं दप्तर'

- गणेश पोटफोडे

वाळवंटातील श्रावण

श्रावणमासी या वाळवंटी
सूर्य नभीचा आग ओकतो
पन्नाशीवर चढवून पारा
आम्हास तो उभा भाजतो

ए सी घरातून बाहेर पडता
सर घामाची येते धावून
अंगाखांद्यावर ओघळून ती
इकडून तिकडे जाते भिजवून

छत्री असे जरी डोक्यावर
ढग घामाचा तरी गाठतो
गुपचूप अंगातून तो पाझरत
पाण्यासाठी कंठास दाटतो

आकाश निरभ्र असे निरंतर
वाळूस असे रान मोकळे
मृगजळी त्या खेळती पिंगा
क्षणात वाळूचे धुके झाकळे

सरते शेवटी श्रावणमासी
दुसरे कशाचे कौतुक नसे
पिकल्या गाभोळ्या खजूराचे
तेवढेच काय ते भाग्य असे

- गणेश पोटफोडे

No comments:

Post a Comment