Sunday, August 30, 2020

शिवरायांचा आठवावा प्रताप


शिवरायांचा आठवावा प्रताप...

माझा मित्र केतन सावंत लिखित शिवरायांचा आठवावा प्रताप हे पुस्तक नुकतेच वाचले.केतन आणि माझी ओळख आम्ही सदगुरु श्री.अनिरुद्ध बापूंचे श्रद्धावान म्हणून झाली होती. बरीच वर्षे आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. आम्हा दोघांमध्ये एक सामायिक छंद होता तो म्हणजे वाचन.गुरुवारी बापूंच्या इथे भेटलो की आम्ही पुस्तके , शिवाजी महाराज ह्यावर बरीच चर्चा करीत असू. भेटला की नेहमी तो शिवाजी महाराजांवर भरभरून बोलत असे.त्यामुळे त्याचे शिवाजी महाराजांवरील प्रेम मला चांगलेच ठाऊक होते.

काही दिवसापूर्वी त्याने फेसबुकवर प्रसिद्ध केले की त्याने शिवाजी महारांजावर एक कादंबरी लिहिली आहे आणि त्या कादंबरीमधील छोटे छोटे लिखाणाचे तुकडे तो फेसबुकवर प्रसिद्ध करीत होता अगदी त्यावेळेपासून ह्या कादंबरीबद्दल उत्सुकता मनाला लागून राहिली होती आणि दिवसेंदिवस केतन ती उत्सुकता आणखीन ताणत होता रोज वेगवेगळी पोस्ट फेसबुकवर अपलोड करून. आणि अखेर प्रतीक्षा संपली. १२ ऑगस्ट २०२० ला दुपारी १२ वाजता पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन झाले(लोकडोउन होते म्हणून ऑनलाइन ).

नक्की काय असेल ह्या पुस्तकामध्ये त्याची उत्कंठा होती.एवढे ठाऊक होते की छत्रपती शिवाजी महाराजांची अफजलखानाशी झालेली ऐतिहासिक भेट आणि महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध ह्याचे वर्णन ह्या कादंबरीमध्ये वाचनास मिळणार आहे.ज्यादिवशी पुस्तक प्रकाशित झाले त्याच दिवशी मी अमेझॉनवर पुस्तकाची प्रत बुक केली.साधारण ८-१०दिवसांनी पुस्तक माझ्या हाती आले आणि त्याच्या पुढच्या २ दिवसात मी संपूर्ण वाचून काढले अगदी अधाशासारखे.

खरच छान पुस्तक लिहिले आहे केतनने.ह्या पुस्तकासाठी घेतलेली मेहनत त्याच्या लिखाणातून दिसून येते.केतनची साधी सरळ आणि सोपी पण थेट काळजाला हात घालणारी लेखनशैली मनाला भावली.त्याने लिहिलेल्या अनेक प्रसंगाचे सुंदर वर्णन व चित्रण ही ह्या कादंबरीची जमेची बाजू आहे असे मला वाटते.त्या सर्व प्रसंगाचे चित्र अगदी तंतोतंत आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.

मला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानशी झालेली भेट व महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध एवढेच माहीत होते परंतु ह्या केतनने लिहिलेल्या कादंबरीमुळे समजले की जावळी खोऱ्याचे महत्त्व, जावळीचे वर्णन, जावळीचा इतिहास, अफझलखानला महाराजांनी जावळीमध्ये येणास कसे भाग पाडले आणि का भाग पाडले,खानास भेटण्यासाठी महाराजांनी केलेली पूर्वतयारी , त्यामागील रणनीती ,अफजल खानाने स्वराजात मांडलेला उच्छाद आणि असे अनेक पैलू मला ह्या कादंबरीमार्फत उलगडत गेले.खानाला ठार मारून जेव्हा महाराज राजगडी आऊसाहेब जिजाउना भेटतात त्याचे खूप सुंदर वर्णन ह्या कादंबरीमध्ये केले आहे.आणि आऊसाहेब शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या सैनाच्या पराक्रमाचे वर्णन करण्यासाठी शाहीर अज्ञानतदास ह्यांना स्वतः बोलावून एक पोवाडा लिहून घेतला होता हे ह्या पुस्तकाद्वारे मला प्रथमच समजत होते.एकंदरीत काय ह्या पुस्तकाला दिलेले नाव अगदी समर्पक आहे शिवरायांचा आठवावा प्रताप... प्रत्येकाने आवर्जून वाचावे असेच आहे हे पुस्तक.आपल्या महाराजांचा पराक्रम आणि प्रताप वर्णन करणारे पुस्तक.

केतन मित्रा खूप खूप धन्यवाद आणि अंबज्ञ हे पुस्तक लिहिण्यासाठी.अशीच छान छान आणि दर्जेदार पुस्तके लिहीत राहा आणि आम्हा वाचकप्रेमींसाठी अशीच मेजवानी देत राहा.

तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप अनिरुद्ध शुभेच्छा!!!

                    ।। जय जगदंब जय दुर्गे ।।

- सुयश गावड

3 comments: