Wednesday, August 12, 2020

पत्रास कारण की...



पत्रास कारण की...

ग्रंथाली प्रकाशन व अरविंद जगताप लिखित पत्रास कारण की..हे पुस्तक नुकताच वाचनात आले. अनेकांना व विविध विषयांवर लिहिलेल्या ह्या पत्रांचे एकत्रित करून तयार केलेले हे पुस्तक. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमात अरविंद जगतापानी लिहिलेली पत्रे सागर कारंडे ह्या पोस्टमन काकानी कार्यक्रमात जाहीरपणे वाचली.ह्या कार्यक्रमातच ऐकताना ही पत्रे मला खूप आवडली व अरविंद जगताप ह्यांची लेखानशैलीसुद्धा.धन्यवाद झी मराठी व अरविंद जगताप ह्यांचे की त्यांनी ह्या सर्व पत्रांचे एकत्रिकरण करून त्याचे पुस्तक प्रकाशित केले.

पत्र तर खाजगी गोष्ट असते.एकट्याने वाचण्याची पण ही पत्र झी मराठीसारख्या खाजगी वाहिनीवर एका कार्यक्रमात जाहीरपणे वाचली गेली व प्रेक्षकांना ती आवडली.प्रत्येक पत्रामध्ये काही तरी उपदेश असायचा,लपलेला बोध असायचा व ती सर्व पत्र मनाला भावून जायची.प्रिय आई , प्रिय इंडिया उर्फ भारत देशा , दाभोलकरांच्या मारेकऱ्यांनो , सोशिक स्त्रियांनो , महाराष्ट्र धर्म वाढवावा , सचिन पिळगावकर ही त्यातील मला आवडलेली निवडक पत्रे. ह्या पुस्तकात एकूण ४७ पत्रे आहेत आणि सर्वच पत्र खूप वाचनीय  व छान आहेत.

आजकालच्या ह्या ई-मेल व मोबाईल मेसेजच्या दुनियेत पत्र ही संकल्पना केव्हाच आऊट डेटेड झाल्यासारखी वाटते.पण स्वतःच्या हाताने कोणालातरी पत्र लिहायचे त्यामागील प्रेम व भावना व्यक्त करण्याची सर ह्या ई-मेल व मोबाईल मेसेजना नाही  हे मी ठामपणे सांगू शकतो.आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या मोबाइल इमोजीसाचा आधार घ्यावा लागतो ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.पत्र ही जोडणारी गोष्ट आहे.माझ्या मते पत्र ही प्रेम,भावना,दुःख,तक्रार,खंत,निषेध व्यक्त करण्याचे उत्तम साधन आहे.पत्र व पोस्टाची पेटी दोन्ही आपल्या मन पटलावरून गायब झाली आहेत.आणि ह्याच पत्रांना लेखक अरविंद जगतापानी नवं संजीवनी दिली असे मला वाटते. पत्र ही लोकांच्या सुख दुःखाचा दुवा होता जो आज इतिहास जमा झाला होता तो इतिहास अरविंद जगतापानी पुन्हा त्यांच्या ह्या पत्राद्व्यारे चालू केला.

अरविंद जगताप ह्यानी लिहिलेली ही पत्र वाचताना चेहऱ्यावर कधी हसू तर कधी डोळ्यांमध्ये आसू येतात.काही पत्रांमध्ये त्यांनी मारलेली कोपरखळी ह्याचा तर आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.कोणे एकेकाळी पत्र  जगण्याचे बळ होते.कारण एका नवऱ्याने आपल्या बायकोला लिहिलेले पत्र असो की,एका आई बापाने होस्टेलवर राहून शिकत असलेल्या आपल्या मुलाला लिहिलेले पत्र असो की, एका नवविवाहित मुलीने आपल्या माहेरी असलेल्या आईला लिहिलेले पत्र असो की,एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला लिहिलेले पत्र असो सर्वाच्या भावना जरी वेगळ्या असल्यातरी त्यातील एक सामायिक दुवा पत्र हा एकमेव होता.पत्र जगण्याचा आधार होता कितीतरी जीवांचा.

संदेशे आते हैं
हमें तड़पाते हैं
तो चिट्ठी आती है
वो पूछे जाती है
के घर कब आओगे
के घर कब आओगे
लिखो कब आओगे
के तुम बिन ये घर सूना सूना है

बॉर्डर ह्या चित्रपटातील हे गाणे पत्राचे महत्व अचूक अधोरेखित करते.पूर्वी कितीतरी सैनिक्यांच्या बायकाचे फक्त ह्या पत्राच्या भरवश्यावर आपल्या संसाराचे व जगण्याचे बळ निर्धारित असायचे.

लेखक अरविंद जगताप ह्यांचे आभार त्यांनी खूप सुंदर पत्रे व पत्रांचे महत्त्व आमच्या पिढीला पटवून दिल्याबद्दल. पत्रास कारण की....हे पुस्तक प्रत्येकाने जरुर वाचावे.

- सुयश गावड

No comments:

Post a Comment