Sunday, October 23, 2022

अशी ही एक दिवाळी

अशी ही एक दिवाळी

लॉकडाऊनमध्ये घरी वर्तमानपत्र येणे बंद झाले होते.आणि जेव्हा परत वर्तमानपत्र सुरळीत चालू झाले तेव्हा आमच्या आधीच्या वर्तमानपत्र विक्रेत्याने वर्तमानपत्र देणे बंद केले.मी साधारण सकाळी ७वाजता ऑफीसला जाण्यासाठी निघतो म्हणून वर्तमानपत्र त्या आधी देणारा विक्रेता मी शोधत होतो...पण काही केल्या मला सकाळी ७च्या आधी वर्तमानपत्र देणारा कोणी मिळत नव्हता.ह्या नवरात्रीमध्ये मी रोज सकाळी ६.३०वाजता मंदिरात जाण्यासाठी घरातून निघत होतो.पहिल्या दिवशी सकाळी मला जिन्यामध्ये एक साधारण १८-१९ वर्षाचा युवक हातात वर्तमानपत्र घेऊन दिसला..तसेच दुसऱ्या दिवशी ही दिसला. मी मनातच म्हटले हा वर्तमानपत्रवाला चालेल कारण तो ७च्या आधी येतो.तिसऱ्या दिवशी मी त्याला जिन्यातच गाठले आणि आमच्याकडे वर्तमानपत्र सुरू करण्याबद्दल सांगितले तर तो म्हणाला माझ्या शेठशी बोलावे लागेल तर मी त्याला म्हंटले बोलून घे म्हणून तर तो म्हणाला मी  त्यांचा मोबाईल नंबर घेऊन येतो आणि तुम्हाला देतो उद्या तर मी त्याला म्हंटले अरे तुझ्या मोबाईलमध्ये असेल ना तो उत्तराला नाही माझ्याकडे मोबाईल नाही.दुसऱ्या दिवशी तो त्याच्या शेठचा नंबर एका कागदावर लिहून घेऊन आला आणि मला दिला.मी त्याच्या शेठला फोन केला आणि आणि कोणते वर्तमानपत्र दयायचे ते सांगितले आणि रूम नंबर सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३०ला दारावरची बेल वाजली दार उघडले तर हा वर्तमानपत्र घेऊन दाराबाहेर उभा...आणि मग रोज घरी सकाळी वर्तमानपत्र देण्यासाठी हा येऊ लागला.का कोण जाणे पण ह्याला पाहिल्यापासून हा मनामध्ये भरला...दिसायला साधारण सावळा आणि अंगाला जाडा आणि त्याचा भारदस्त आवाज.वर्तमानपत्र देताना त्याचा गुड मॉर्निंग काका करणारा आवाज.कधी तरी सांगावेसे वाटते की खरच काका दिसतो का?त्याला दिवाळीसाठी काही तरी द्यावे असे सारखे मनात येत होते.त्या दिवशी सकाळी त्याला सांगितले उद्या घरी सकाळी घरी येऊन जा.त्याच्या राहाणीमानावरून तरी तो सर्वसाधारण कुटुंबातील असेल.त्याला बघिलतल्यावर मला माझीच लाज वाटली कारण ह्याच्या वयाचा मी होतो तेव्हा मी तर खूप मजा करत होतो.आणि हा रोज सकाळी उठून वर्तमानपत्र देण्याचे काम करतो आणि जमेल तसे त्याच्या कुटुंबाला मदत करतो.त्याला त्याच्या घरच्या परिस्थितीची पुरेपूर कल्पना होती.काल त्याला सांगितलेप्रमाणे तो घरी आला आणि मी ठरवल्याप्रमाणे एक पाकीट त्याच्या हाती दिले आणि त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्याने ते पाकीट घेतले आणि मला पण हॅपी दिवाळी काका अश्या शुभेच्छा दिल्या.

मी पाकीट दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बण्यासारखा होता.आपली एक छोटीशी कृती कोणाच्या तरी जीवनात एवढा आनंद देणासारखी असू शकते हे आज मला समजले.मलाही ह्या वर्षी वेगळी दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाला.असे म्हणतात की दुसऱ्याला आनंद दिला की परमेश्वर आपला आनंद द्विगुणित करतो.

- सुयश गावड

No comments:

Post a Comment