चाफामय दिवाळी पहाट
लॉकडाऊननंतर तब्बल २ वर्षांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाला जाण्याचा योग आला.शिवाजी पार्कला राजा बढे चौकामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाला गेलो होतो.कार्यक्रमाला जायला मला थोडा उशीरच झाला म्हणून मला थोडे मागेच बसायला मिळाले. खूप सुंदर सुंदर गाणी गायकवृंदाकडून गायली जात होती.कार्यक्रम रंगात आला होता.माझ्या समोरच्या रांगेमध्ये एक साधारण सत्तर पंचाहत्तर वयाच्या आजी बसल्या होत्या.अंगावर साधीच साडी,पांढऱ्या केसांचा अंबाडा आणि त्यावर एक चाफ्याचे फुल,कानात मोत्याच्या कुड्या,आणि गळ्यात छोटे पण ठसठशीत असे दिसणारे मंगळसूत्र,आणि चेहऱ्यावर एक सतेजपणा.एक थोड्या वेळाने आजीच्या शेजारी दोन बायका येऊन बसल्या. आजीने तिच्या हातात असलेल्या कापडी पिशवीतून टवटवीत अशी दोन चाफ्याची फुले काढली आणि त्या दोन बायकांना दिली आधी मला वाटले की त्या बायका आजीच्या ओळखीच्या असतील पण तसे नव्हते कारण आजीने त्यांना फुले दिल्यावर त्याचे चेहरे निर्विकार होते त्यावरून मला समजले की त्या ह्या आजींना ओळखत नाही. आणि त्यांनी आजीचे आभार मानले आणि त्या चाफ्याच्या फुलांचा सुगंध घेतला.परत थोड्या वेळाने आजीच्या पुढच्या रांगेमध्ये आणखीन काही बायका होत्या त्यांना पण चाफ्याची फुले दिली.मला थोडे आश्चर्य वाटले की आजी सर्वानाच चाफ्याची फुले देत होत्या.
माझ्या मते त्या चाफ्याच्या फुलांच्या सुगंधाप्रमाणे आजीचे आयुष्य पण सुंगधित असेल.ती चाफ्याची फुले नाही तर आनंद वाटत होती.परमेश्वराने अश्या लोकांना दुसऱ्याचे आयुष्य सुंगधीत करण्यासाठीच ह्या भूतलावर पाठवलेले असते.
त्या आजीची ती कृती बघून मला खूप भरून आले.ह्या जगात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता पण आनंद वाटणारी लोक आहेत ह्या गोष्टीवर विश्वास बसला.आणि आजींच्या त्या कृतीने माझी दिवाळी पहाट खऱ्या अर्थाने चाफामय झाली.
- सुयश गावड